कृषी विद्यापीठाचे बियाणे सोलापुरातच मिळणार

कृषी विद्यापीठाचे बियाणे सोलापुरातच मिळणार
कृषी विद्यापीठाचे बियाणे सोलापुरातच मिळणार

सोलापूर : ‘‘कृषी विद्यापीठाच्या वाणासाठी शेतकऱ्यांचा राहुरीपर्यंतचा पाठपुरावा थांबण्यासाठी यापुढे ज्वारी, बाजरी, चवळी, तूर आदी खरीप आणि रब्बी हंगामात मागणी असणाऱ्या कृषी विद्यापीठाच्या सर्व बियाण्यांची विक्री सोलापुरातील संशोधन केंद्रावर कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल,''असे आश्‍वासन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी गुरुवारी (ता. ६) येथे दिले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे कृषी विभाग आणि आत्मा यांच्या सहकार्याने संशोधन केंद्राच्या मुळेगाव प्रक्षेत्रावर खरीप पीक प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गडाख बोलत होते. जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, सहयोगी संचालक डॉ. विजय अमृतसागर, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. के. के. शर्मा, माजी संचालक डॉ. एस. पी. काळे, सीताफळ संघाचे नवनाथ कसपटे, प्रगतिशील शेतकरी सुनील घाटुळे, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, प्रभारी समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, डॉ. आर.आर. कदम आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधन केले. उत्पादनवाढ हे तंत्र त्यामध्ये आहेच, पण शास्त्रशुद्ध आणि गुणवत्ता याचीही जोड त्याला दिली. त्यामुळेच कृषी विद्यापीठाच्या वाणांना मागणी वाढते आहे. ज्वारी, तूर, बाजरी ते अगदी चवळी, हुलगा या वाणांची मागणी शेतकऱ्यांकडून होते. सोलापूरच्या मालदांडी ज्वारीने तर यामध्ये फार पूर्वीपासूनच उच्चांक केला आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्राने यासाठी शेतकऱ्यांना पंचसूत्री देऊन ज्वारीचे उत्पादन वाढवले. अगदी मूलस्थानी जलसंधारण, बांधबंदिस्ती ते कोळपणी यासारख्या छोट्या-छोट्या तंत्राचा अवलंब त्यामध्ये आहे. त्यामुळे २५ ते ३५ टक्‍क्‍यांपर्यंतची उत्पादनवाढ या तंत्राने ज्वारीसाठी दिली.'' विद्यापीठाचे कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करा, कमी खर्चाची शेती करा, असे आवाहनही त्यांनी केले.

बिराजदार म्हणाले, ‘‘पावसाअभावी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून चढ-उतार आहे. खरीप, रब्बीतील पिकाखालील क्षेत्रात घट होते आहे. खरिपाचे एकूण ३ लाख हेक्‍टरवरील क्षेत्र २ लाखावर आले आहे, तर रब्बी ज्वारीचे ७ लाख हेक्‍टरचे क्षेत्र आज चार लाख हेक्‍टरवर आले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याबाबत जागरूक राहणे, पाणी साठवणे, पुनर्भरण यासारख्या विषयावर काम करण्याची गरज आहे.

'' पाऊसमान कमी असतानाही कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पिके जोमदार आहेत, यामागे तंत्रज्ञान कारणीभूत आहे, असे बरबडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com