नगरमध्ये कचऱ्याच्या धुरामुळे शेतीपिकांचे नुकसान

कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे डाळिंबाची फळे काळी पडली आहेत. काही पिकांवरील बहर गळून गेला आहे. यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्याची भरपाई महापालिकेने द्यावी. - अजय कराळे, शेतकरी शेतात कडवळ, मका, फ्लॉवर, भेंडी आदी पिके आहेत. डेपोला लागलेल्या आगीमुळे या पिकांवर परिणाम झाला. या नुकसानीला महापालिका जबाबदार आहे. - प्रवीण शेवाळे, शेतकरी
नगरमध्ये कचऱ्याच्या धुरामुळे शेतीपिकांचे नुकसान
नगरमध्ये कचऱ्याच्या धुरामुळे शेतीपिकांचे नुकसान

नगर : महापालिकेच्या सावेडी येथील कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. ती २४ तासांपासून धगधगत होती. अग्निशमन दलाच्या बंबांच्या १०० पेक्षा जास्त फेऱ्या झाल्या. या आगीतून उठलेल्या धुराचा डेपोच्या परिसरातील शेतीवर परिणाम झाला. रात्री वारा असल्यामुळे धुराचे लोट सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पसरले होते. धुरामुळे नागरिकांना श्वसनाचाही त्रास जाणवला. डेपोच्या परिसरातील शेतीत डाळिंब, मका, फ्लॉवर, भेंडी, कडवळ, ऊस अशी पिके आहेत. त्या पिकांना धुराचा मोठा फटका बसला.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी (ता. ४) रात्री उशिरा, तर आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी (ता. ५) आगीची पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक सागर बोरुडे आदी उपस्थित होते. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनीही घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, गणेश कवडे, संभाजी कदम आदी उपस्थित होते. 

सुमारे दीडशे टन कचरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून, हे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. आगीचे कारण समजले नसले, तरी मिथेन वायू व वाढलेले तापमान, यामुळे आग लागली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. महापालिकेच्या अग्निशमन पथकातील बंब कमी पडत असल्यामुळे नगरमधील एमआयडीसी, महापालिकेकडून राहुरी, देवळाली प्रवरा व श्रीगोंदे या नगरपालिकांचे बंब मागविण्यात आले. हे बंब अजूनही आग विझविण्याचे काम करीत आहेत. 

आग रात्री वाऱ्यामुळे अधिकच भडकली. डेपोत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेडवरही ती पोचली. त्यामुळे या प्रकल्पातील यंत्रसामग्री आगीच्या कचाट्यात काही वेळ सापडली. डेपोच्या परिसरातील शेतीत डाळिंब, मका, फ्लॉवर, भेंडी, कडवळ, ऊस अशी पिके आहेत. त्यात डाळिंबाचा बहर धुरामुळे गळाला. काही डाळिंबांची फळे काळी पडली. फ्लॉवर तांबूस होऊ लागला आहे. कडवळ, ऊस, मका यांची पाने काळी पडली. महापालिकेने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com