कृषी आयुक्त केंद्रेकर यांना राज्यभरातून समर्थन

कृषी खात्याला गावागावाशी जोडण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांना किमान तीन वर्षे काम करू द्यावे, असे आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी म्हटले आहे.
कृषी आयुक्त केंद्रेकर यांना राज्यभरातून समर्थन
कृषी आयुक्त केंद्रेकर यांना राज्यभरातून समर्थन

पुणे : कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या बदलीची अफवा, तसेच त्यांना हटविण्यासाठी भ्रष्ट कंपूकडून प्रयत्न होत असल्यामुळे राज्यभरातून श्री. केंद्रेकर यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कृषी खात्याला गावागावाशी जोडण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांना किमान तीन वर्षे काम करू द्यावे, असे आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी म्हटले आहे.  बदलीच्या अफवा आणि सरकारी कार्यालयांना सुटी असतानाही श्री. केंद्रेकर मात्र स्वतः सुटी न घेता काम करत आहेत. सध्या राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी उपाययोजना करण्याच्या अहवालावर ते काम करत असल्याचे सांगण्यात आले. 

नाम फाउंडेशनशी आयुक्तांची चर्चा   ‘‘आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर शासन किंवा शासनबाह्य पातळीवर काय करता येईल, याचा आराखडा तयार करण्यासाठी श्री. केंद्रेकर यांनी नाम फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्याशी चार तास चर्चा केली. नाम फाउंडेशनकडून शासनासमवेत काम करण्याची तयारी दर्शविली गेली आहे,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘‘बदली प्रकरणातील घडामोडींचा आयुक्तांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. शेतकरी योजनांचा तसेच प्रशासकीय कामांचा रोखठोक आढावा घेण्याचे आयुक्तांचे काम अथकपणे चालू आहे,’’ अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

केंद्रेकर यांना सधी द्या : पोपटराव पवार  पोपटराव पवार म्हणाले, ‘‘की ग्रामविकासाचा आत्मा ग्रामपंचायत आणि शेती हाच आहे; मात्र ग्रामपंचायतींशी कृषी यंत्रणेची सांगड घालण्यासाठी मी अनेक वर्षांपासून मुद्दे मांडतो आहे. सध्याचे कृषी आयुक्त मात्र तशी सांगड घालण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कृषी खात्याचा कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये जावा व त्याने तेथे योजनांची माहिती देण्यासाठी श्री. केंद्रेकर यांच्या काळात प्रयत्न होत आहेत. ही प्रक्रिया चालू राहिल्यास गावांमध्ये कृषी खात्याचे प्रतिबिंब उमटू शकते. त्यामुळे श्री. केंद्रेकर यांना तीन वर्षे काम करण्याची संधी दिली पाहिजे. शेतकरीवर्ग, त्यांचे नेते आणि संघटना अनेक कारणांसाठी आंदोलन करत असतात; मात्र शेतकऱ्यांसाठी शासनात राहून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे किंवा अशा अधिकाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचेदेखील शेतकऱ्यांनी शिकले पाहिजे.’’     दबावापुढे न झुकणारा अधिकारी : न्या. गायकवाड  उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व माजी लोकायुक्त श्री. पी. बी. गायकवाड म्हणाले, अधिकारी किंवा मंत्र्यांच्या दबावापुढे न झुकणारा अधिकारी म्हणून सुनील केंद्रेकर यांचा अनुभव जनतेला येत असतो. बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख केलेले काम मी पाहिले आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व पातळ्यांवर काम करण्याची संधी कृषी विभागाला आहे. कृषी आयुक्त म्हणून त्यांची सुरू असलेली धडपड योग्य असून, त्यांना तीन वर्षे तेथे संधी देणे शेतकऱ्यांच्या हिताचे राहील.

ठिबकमधील लुटारूंना लगाम घातला : वाघधरे  कृषिभूषण सुरेश वाघधरे म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे ठिबक अनुदान हडप करणारी टोळी कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागात आहे. या टोळीचे सदस्य राज्यभर विखुरलेले आहेत. याच टोळीला लगाम घालण्याचे काम कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर करत होते. शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान लुटले जाऊ नये, म्हणून भ्रष्ट अधिकारी, वितरक, कंपन्यांना वेसण घालण्याचे काम श्री. केंद्रेकर यांनी सुरू केलेले असताना त्यांना सरकारने प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या घरात पोचविण्याची सरकारची मनापासून इच्छा असल्यास श्री. केंद्रेकर यांची बदली करू नये. 

 कृषिसेवक घोटाळ्यातील लॉबीचे काम : वानखेडे कृषी खात्यातील कृषिसेवक भरती घोटाळ्याचे धागेदोरे शोधून काढण्याचा प्रयत्न कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर करत असल्यामुळेच त्यांच्यावर बदलीचे हत्यार उगारले जात आहे, असे कृषिसेवक घोटाळ्याच्या विरोधात लढणारे परीक्षार्थी दत्ता वानखेडे यांनी म्हटले आहे. ‘‘कृषिसेवक घोटाळ्याच्या चौकशीचे काम आयुक्तांकडून पारदर्शकपणे सुरू आहे. त्यासाठी श्री. केंद्रेकर बैठका घेत असल्यामुळे पोलिस तपासालादेखील वेग आला आहे. गैरव्यवहाराची चौकशी सीआयडीकडून करण्याची शिफारस त्यांनी करावी, अशी आमची अपेक्षा आहे; मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यासाठीच आयुक्तांना हटविणाचे काम भ्रष्ट लॉबी करत आहे; मात्र सरकारने बदली रोखावी,’’ असेही श्री. वानखेडे यांनी नमूद केले. 

अनास्था थांबविणारा अधिकारी : देशमुख  नाम फाउंडेशनच्या शेती विभागाचे समन्वयके कृषिभूषण कांतराव देशमुख म्हणाले, की कृषी विभाग हा शेतकऱ्यांचा असून सुस्त होता. अधिकारी वर्गाची अनास्था दिसत होती. ती थांबविण्याचा प्रयत्न सुनील केंद्रेकर करत आहेत. ते शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत योजना पोचविण्याचा त्यांचा प्रयत्न असून, चांगला आयुक्त लाभलेला असताना त्यांना काम करू देण्याची जबाबदारी सरकारकडे जाते.  

केंद्रेकर यांच्या पाठीशी उभे राहा ः कांगणे शेतकऱ्यांना त्यांच्या योजना मिळवून देण्यासाठी कृषी विभागाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम सुनील केंद्रेकर करत आहेत. त्यामुळे काही उपद्रवी लोक त्यांच्या बदलीच्या अफवा पसरवत असल्यास त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे शेतमॉल शेतकरी उत्पादक कंपनीचे मधुकर कांगणे यांनी म्हटले आहे. ‘‘कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या; मात्र नेहमीच अपेक्षाभंग झाला आहे. कारण, हा विभाग पांढरा हत्ती बनला आहे. केंद्रेकर यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत आहेत,’’ असेही श्री. कांगणे म्हणाले. 

बदली नव्हे, तर मुदतवाढ द्या : मोरे  राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर चांगले काम करत आहेत. त्यांना तीन वर्ष पदावर काम करू द्यायला हवे. त्यानंतरदेखील त्यांना अजून दोन वर्षे मुदतवाढ द्यावी. कारण, तसे कामच ते करत आहेत, असे महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संघाचे सचिव विजय मोरे यांनी म्हटले आहे. चांगल्या अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या का केल्या जातात, हे जनतेला अजूनही कळालेले नाही. श्री. केंद्रेकर यांना मनमोकळेपणे काम करू द्यावे, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे, असे श्री. मोरे यांनी नमूद केले.   

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया.. आपल्या देशामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. केंद्रेकरांविरुद्धचे कटकारस्थान हा या क्षेत्रालाच देशाबाहेर काढण्याचा प्रकार आहे. - दिनेश चव्हाण कर्तव्यदक्ष अधिकारी सरकारच्या डोळ्यात खुपतात - रामभाऊ लंगे-पाटील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com