पीक लागवड, उत्पादनाच्या आकड्यांचा गडबडगुंडा 

सरकारने नुकताच यंदाच्या पीक उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर करत जवळपास सर्वच शेतीमालाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढेल, असे म्हटले. परंतु बाजारातील आवक आणि दर बघता गोंधळ निर्माण होत आहे.
gram harvesting
gram harvesting

सरकारने नुकताच यंदाच्या पीक उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर करत जवळपास सर्वच शेतीमालाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढेल, असे म्हटले. परंतु बाजारातील आवक आणि दर बघता गोंधळ निर्माण होत आहे. त्यातच व्यापारी, उद्योग यांनी यंदा सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस आणि हळद उत्पादनात घट झाल्यानेच दरात वाढ होत असल्याचे म्हटले आहे. मात्र सरकार एकीकडे उत्पादन विक्रमी म्हणते आणि दुसरीकडे बाजार मात्र वेगळ्याच दिशेने चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता गोंधळ उडतो आणि त्यांना शेतीमाल विक्रीचा निर्णय घेता येत नाही. परिणामी, कमी दराने विक्री करावी लागते. शेतकऱ्यांना लागवड, उत्पादनाची वेळोवेळी आणि अचूक माहिती मिळाल्यास त्यांनाही बाजारातील वाढत्या दराचा फायदा मिळेल.  उत्पादन वाढीनंतर सोयाबीनमध्ये तेजी?  खरीप हंगामातील सोयाबीन पीक बाजारात येऊन गेले. मात्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या उत्पादनविषयक दुसऱ्या अंदाजात यंदा देशात विक्रमी १३७.११ लाख टन उत्पादन झाले असे म्हटले. गेल्या वर्षी ११२.२६ लाख टन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा जवळपास २५ लाख टनांनी उत्पादन वाढले, असेच म्हणावे लागेल. मात्र बाजारात यंदा सोयाबीन दराने विक्रम केला आहे. ५१०० रुपयांचा टप्पा गाठून आणखी वाढीकडे सोयाबीनची चाल सुरूच आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच बाजारात सुधारणा पाहायला मिळाली. त्यामुळे उत्पादनात एवढी मोठी वाढ होऊनही बाजारात दर वाढत आहेत, यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला. ‘सोपा’ या संघटनेच्या म्हणण्यानुसार यंदा देशात १०४.५० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले. त्यामुळे मागणी, पुरवठ्यात तफावत येऊन दर वाढले आहेत. तर आणखी खासगी संस्थेच्या मते यंदा देशात सोयाबीन उत्पादन ८५ ते ९५ लाख टनांच्या जवळपास राहिले. सोयाबीन काढणीच्या काळात झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसला. मालाची प्रत खालावली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उत्पादनात २० ते २५ टक्के घट आली. मात्र सोयाबीन उत्पादकांना यंदा बऱ्यापैकी दर मिळाला. 

सोयाबीन उत्पादनाचे अंदाज (लाख टनांत)  १३७.११  सरकार  १०४.५०  सोपा  ८५ ते ९५  खासगी संस्था  तूर उत्पादनात घट झाल्याचा दावा  गेल्या वर्षी ३८.९ लाख टन उत्पादन झाले होते. सप्टेंबर महिन्यात पहिल्या अंदाजात ४८.२ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज जाहीर करण्यात आला. तर दुसऱ्या सुधारित अंदाजात ३८.८ लाख टन उत्पादन होईल असे म्हटले आहे. परंतु पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे तूर पिकाला मोठा फटका बसला. उत्पादकतेत जवळपास १५ ते २० टक्के घट आली, अशी माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. यंदा तुरीचे भाव सुरुवातीच्या काळात हमीभावाच्या कमी होते. नंतर मात्र आवक जेमतेम होत असताना भाव हमीभावाच्या पुढे गेले. मात्र अनेक शेतकऱ्यांना नेमका पिकाचा अंदाज आला नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी ५२०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान तूर विकली.  हरभरा बाजाराचा उत्पादन वाढीच्या आकड्यांना ‘खो’  केंद्र सरकारने नुकतेच देशातील पीक उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज व्यक्त केला. या अहवालात केंद्राने देशात हरभरा उत्पादन ११६.२ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केला. मागील वर्षी ११०.८ लाख टन उत्पादन होते. म्हणजेच यंदा उत्पादनात ६.२ लाख टन वाढ होईल असे गृहीत धरण्यात आले. दराचा विचार करता मागील वर्षी याच काळात ३२०० ते ३६०० रुपये याप्रमाणे हरभरा विकला जात होता. यंदा जर उत्पादनात वाढ होणार असेल तर बाजाराच्या नियमाचा विचार करता दर याच पातळीवर असायला हवे होते. याचा अनुभव आपल्याला अनेक वेळा शेतीमाल बाजारात आला आहे. यंदा मात्र स्थिती उलटी आहे. एकीकडे सरकार म्हणते उत्पादन वाढणार आणि बाजार मात्र वरच्या पातळीवर पोहोचला आहे.  त्यातच नाफेडकडेही ९ ते ११ लाख टन हरभरा साठा असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सरकारच्या आकड्यांनी गोंधळच वाढला. मात्र व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात ७५ ते ९० लाख टनांच्या जवळपास उत्पादन होईल.  ‘‘देशात यंदा हरभरा उत्पादक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी बदलते हवामान आणि पावसाने फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज आहे. आमच्या अंदाजानुसार देशात ७० ते ७५ लाख टन उत्पादन होईल,’’ असे रायपूर (छत्तीसगड) येथील दीपक लेडवाणी यांनी सांगितले. 

उत्पादनात घट येणार ः चौहान  नवी दिल्ली येथील आयग्रेन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल चौहान यांनी हरभरा उत्पादनाविषयी देशातील व्यापारी, डाळ मिल, स्टॉकिस्ट, निर्यातदार यांचा एक ‘ओपनिंग पोल’ घेतला. ‘‘देशात यंदा हरभरा उत्पादनावर बदलत्या हवामानाचा आणि पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यातच वाढत्या उन्हाचाही फटका पिकाला बसत आहे. त्यामुळे हरभऱ्याचा दाणा बारीक राहण्याचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे. आम्ही घेतलेल्या उत्पादनविषयक ‘पोल’मध्ये महत्त्वाच्या हरभरा व्यापारी, उद्योगांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार उत्पादन ८५ ते ९० लाख टन राहील,’’ असे चौहान म्हणाले. 

हळद लागवडीच्या आकड्यांविषयी गोंधळ  सध्या बाजारात हळदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. परंतु देशातील नेमकी लागवड किती याची माहिती उपलब्ध नाही. मसाले बोर्डाच्या माहितीनुसार देशपातळीवर २ लाख ४६ हजार हेक्टरवर लागवड आहे. मात्र व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार देशात लागवड तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर आहे. तर मसाले बोर्डाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १५ हजार ३४२ हेक्टरवर लागवड आहे. मात्र जिल्हा कृषी विभागांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ सहा जिल्ह्यांतच ७८ हजार हेक्टरवर लागवड आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरच या विषयी तफावत जाणवते. याचा मोठा फटका सहाजिकच शेतकऱ्यांना बसतो. 

कृषी विभागाच्या जिल्हानिहाय लागवड  ४१,३५८  हिंगोली  २५,३७०  नांदेड  ६,५००  परभणी  २,३९५  वाशीम  १३००  यवतमाळ  १,०२६  सांगली  ७८,०४९  एकूण 

फळपिकांच्या लागवडीच्या आकड्यांचा ‘खेळ’  द्राक्ष क्षेत्राची कमी नोंद  देशासह राज्यात अलीकडच्या काळात द्राक्ष पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या नोंदीनुसार देशात १ लाख ४० हजार हेक्टरवर द्राक्ष बागांची लागवड झाली आहे. मात्र द्राक्ष बागायतदार संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात जवळपास ५ लाख १० हेक्टरवर द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे. तर राज्यातच दोन लाख हेक्टरवर द्राक्ष बागांची लागवड असल्याचा अंदाज आहे. या आकड्यांमध्ये खूपच तफावत आहे. पिकाची नेमकी किती लागवड आहे याची अचूक माहितीच शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पिकांची लागवड, विक्री याविषयी निर्णय घेता येत नाही. बाजारात अंदाजापेक्षा अचानक आवक वाढते आणि माल मातीमोल दराने विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळणे आवश्‍यक आहे. 

लागवड क्षेत्र (लाख हेक्टर)  सरकारी माहिती  १.१४०  देशात  १.१० महाराष्ट्र  महासंघ माहिती  ५.१०  देशात  २  महाराष्ट्र  डाळिंब लागवडीविषयी गोंधळ  डाळिंब लागवडीच्या आकडेवारीबाबतही मोठी तफावत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या नोंदीनुसार देशात २ लाख ६१ हजार हेक्टरवर डाळिंब बागा आहेत. मात्र डाळिंब महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १ लाख ३० हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून डाळिंब बागा वाढल्या होत्या. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांत दुष्काळ, कीड-रोग, दराअभावी शेतकऱ्यांनी अनेक बागा काढल्या. मात्र नवीन लागवड आणि बागांची तोड याची वेळेवर नोंद होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याची नोंद वेळच्यावेळी झाल्यास शेतकऱ्यांना लागवडीविषयी निर्णय घेण्यास मदत होईल.  पेरू लागवडीची नोंद होत नसल्याची तक्रार  पेरूची लागवड अलीकडच्या काळात वाढली आहे. मात्र फलोत्पादन बोर्डाच्या नोंदीनुसार देशात २ लाख ८७ हजार हेक्टरवर पेरूची लागवड आहे. तर पेरू महासंघाच्या माहितीनुसार राज्यात ३५ हजार हेक्टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. त्यातच काही शेतकरी लागवडीची माहिती देत नसल्याने अचूक आकडा पुढे येत नाही. गेल्या वर्षी बाजारात पेरूची अचानक आवक वाढल्याने खरेदीही झाली नाही, दर मिळणे तर लांबच. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. ‘‘पेरूची लागवड कमी आहे आणि दरही चांगला मिळतो, अशी माहिती मिळाल्याने लागवड केली. मात्र बाजारात आवक खूपच वाढल्याने दर मिळाला नाही,’’ अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा निर्णय घेण्यासाठी अचूक माहिती खूपच गरजेची आहे.  सीताफळाची नोंद कमी  राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या नोंदीनुसार देशात केवळ ४१ हजार हेक्टरवर सीताफळ लागवडीची नोंद आहे. मात्र सीताफळ महासंघाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ७० हजार हेक्टरवर सीताफळाचे पीक घेतले जाते. तर देशात अंदाजे १ लाख ६० हजार हेक्टरवर सीताफळाची लागवड आहे. यावरून सीताफळ पिकाची नोंद अचूक होत नसल्याचे लक्षात येते. लागवड क्षेत्राची नोंदच चुकीची असल्याने उत्पादनाचे अंदाजही चुकतात. त्याचा परिणाम बाजारावर होतो. त्यामुळे अचूक माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांना बाजार आणि प्रक्रिया उद्योगांना उत्पादनाचे अंदाज बांधता येतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com