‘देर आए’ आता दुरुस्त करा 

केंद्रीय कृषी मंत्रालय राज्यांच्या कृषी सांख्यिकी अधिकारी आणि पीक हवामान निरीक्षण गट (क्रॉप वेदर वॉच ग्रुप) यांच्या सोबतच्या बैठकांमधून पुढे येणाऱ्या आकडेवारीच्या आधारे खरीप आणि रब्बी हंगामातील पीक उत्पादनांचा अंदाज जाहीर करते.
tur
tur

केंद्रीय कृषी मंत्रालय राज्यांच्या कृषी सांख्यिकी अधिकारी आणि पीक हवामान निरीक्षण गट (क्रॉप वेदर वॉच ग्रुप) यांच्या सोबतच्या बैठकांमधून पुढे येणाऱ्या आकडेवारीच्या आधारे खरीप आणि रब्बी हंगामातील पीक उत्पादनांचा अंदाज जाहीर करते. देशातील पीक उत्पादन अंतिम अहवालात प्रसिद्ध केले जाते. परंतु पहिला अंदाज आणि अंतिम, पाचव्या अहवाल यांच्या दरम्यान तब्बल १५ महिन्यांचा कालावधी जातो. खरिपाच्या बाबतीत पहिला अंदाज हा मॉन्सूनच्या शेवटी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केला जातो. दुसरा अंदाज फेब्रुवारीत म्हणजेच ५ महिन्यांनी प्रसिद्ध होतो. तिसरा अंदाज एप्रिलमध्ये आणि चौथा अंदाज हा जूनमध्ये येतो. तर हंगामातील पीक उत्पादनाचा अंतिम अहवाल हा पुढील वर्षात डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध होतो. पीक उत्पादनाचे अंदाज प्रसिद्ध करण्यामध्ये मोठा कालावधी जात असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यासाठी योग्य माहिती मिळत नाही. त्यातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पावसाने नुकसान झाल्यास उत्पादनात मोठी घट होते, तेव्हा मोठी समस्या निर्माण होते. कारण सरकारचा अंदाज हा जास्त उत्पादनाचा असतो. तसेच सरकारचा अंदाज आणि व्यापारी क्षेत्रातील अंदाज यात फरक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत नाही आणि त्यांना बाजारातील वाढणाऱ्या दराचा अंदाज येत नसल्याने विक्रीचा निर्णय घेता येत नाही. उत्पादनात घट झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो, विशेषतः अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. उत्पादनात घट झाल्याने नंतर दर वाढतात मात्र तोपर्यंत पीक काढणीनंतर शेतकऱ्यांनी कमी दराने माल विकलेला असतो.  यंदाच्या हंगामात तुरीचे उदाहरण घेता येईल. दुसरा सुधारित अंदाज २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. यात पहिल्या अंदाजाच्या तुलनेत दुसऱ्या अंदाजात उत्पादन कमी होणार असल्याचे जाहीर केले. परंतु त्यासाठी ५ महिन्यांचा कालावधी जावा लागला. शेतकऱ्यांना उत्पादनाचा आकडा उशिरा मिळाल्याने त्यांना शेतीमाल विक्रीसंदर्भात बाजाराविषयी माहिती वेळेवर मिळाली नाही. माहितीअभावी शेतकऱ्यांना माल लगेच विकायचा की ठेवायचा, याविषयी निर्णय घेता आला नाही.  लातूर बाजार समितीतील तुरीचे सरासरी दर (रुपये/क्विंटल) 

तारीख दर 
४ जुलै २०२० ५२४० 
४ ऑगस्ट २०२० ६०७६ 
४ ऑक्टोबर २०२० ७०५० 
 नोव्हेंबर २०२० ६२५० 
४ डिसेंबर २०२० ५३५० 
४ जानेवारी २०२१ ५७१३ 
४ फेब्रुवारी २०२१ ६६२६ 
४ मार्च २०२१ ६८०० 

कृषी विभागाने सप्टेंबर २०२० मध्ये जाहीर केलेल्या २०२०-२१ च्या पहिल्या आगाऊ अंदाजाप्रमाणे भारतात तुरीचे उत्पादन ४०.४ लाख टन, म्हणजेच २०१९-२० च्या शेवटच्या अनुमानापेक्षा ५.४८ टक्के जास्त होणार, असे म्हटले होते. तुरीचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये घेतले जाते. दोन्ही राज्यांमध्ये पाऊस व्यवस्थित झाल्यामुळे सरकारने दिलेल्या जास्त उत्पादनाच्या अंदाजामुळे आणि तुरीची आयात झाल्यामुळे २०२० डिसेंबरपर्यंत तुरीच्या किमती कमी राहिल्या. 

पण दोन्ही राज्यांमध्ये पाऊस ऑक्टोबर महिनाअखेरीपर्यंत चालल्यामुळे तुरीची उत्पादकता घटली. एकरी ६ ते ७ क्विंटल येणारे तुरीचे उत्पादन एकरी ३ ते ४ क्विंटल एवढेच झालेले दिसते आहे. साधारण जानेवारीपासून तुरीच्या किमती वाढू लागल्या. पण ज्या शेतकऱ्यांनी जानेवारीमध्येच पीक विकले, त्यांना वाढलेल्या किमतीचा फायदा मिळाला नाही. सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या आगाऊ अनुमानांमध्ये तुरीचे उत्पादन पहिल्या अनुमानापेक्षा कमी दिसते आहे. पहिल्या अंदाजात असलेला ४०.४ लाख टन हा तुरीच्या उत्पादनाचा आकडा दुसऱ्या अंदाजात ३८.८ लाख टन इतकाच झालेला आहे. तुरीचे उत्पादन यंदाच्या वर्षी कमी होऊ शकेल हा ‘मार्केट इंटेलिजन्स’ व्यापाऱ्यांकडे, डाळ मिलवाल्यांकडे, मोठ्या शेतकऱ्यांकडे असू शकतो, पण लहान शेतकऱ्यांना सरकारी आकडेवारी सोडून पर्याय नाही. त्यामुळे ५ महिन्यांनंतर येणाऱ्या दुसऱ्या अंदाजाऐवजी वेळोवेळी आकडेवारी सरकारने जाहीर केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल. 

अमेरिकेत युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचा (यूएसडीए) नॅशनल ॲग्रिकल्चर तुरे स्टॅटिस्टिक्स सर्व्हिस (एनएएसएस) दर महिन्याच्या १२ तारखेला पीक उत्पादन अहवाल जाहीर करते. या अहवालांमध्ये जाहीर होणारे अंदाज बांधण्याकरिता पेरणीखाली असलेले क्षेत्र, सरासरी अपेक्षित उत्पादन, त्या महिन्यात झालेला हवामानातील बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याची घटना इ. घटकांचा अभ्यास समाविष्ट असतो. पिकाखालील क्षेत्राचे तसेच उत्पन्नाचे आकडे जसे शेतांच्या पाहणीतून मिळतात, तसेच उपग्रहांच्या द्वारे निर्माण झालेल्या आकड्यांमधूनही मिळतात. आपल्याकडेही या पद्धतींचा वापर व्हायला हवा. एखाद्या तालुक्यामध्ये क्षेत्र पाहणीतून येणारा क्षेत्राचा अंदाज आणि उपग्रहांच्या आकड्यांपेक्षा फारच तफावत असल्यास क्षेत्रपाहणी पुन्हा वेगळ्या यंत्रणेकडून केली जाऊ शकते का, याचा विचार व्हायला हरकत नाही. तसेच पीक कापणी प्रयोगातून बांधला जाणारा पिकांच्या उत्पादनाच्या अंदाजाची उपग्रहांद्वारे मिळालेल्या आकड्यांबरोबर तुलना करून, हे अंदाज सुधारता येतील का, याचा विचार व्हायला हवा. तर रिमोट सेन्सिंग डेटा योग्य रीतीने वापरल्यास पीक उत्पादन अंदाजाच्या वारंवारितेत आणि गुणवत्तेत सुधारणा येऊ शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com