नगर जिल्ह्यात यंदा हुमणी, बोंड अळीबाबत जागृती नाही

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : गेल्या दोन वर्षांत कापसावर बोंड अळी आणि उसासह अन्य पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या वर्षी बोंड अळी निर्मूलनात नगर जिल्‍हा राज्यात अग्रेसर असल्याचे सांगितले, मात्र यंदा नगरमध्येच हुमणी, बोंड अळीबाबत जागृती होताना दिसत नाही. कृषी विभागाचे त्याबाबत पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यात खरिपात कापसाचे क्षेत्र अधिक असते. अलीकडच्या काळात सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्टरपर्यंत कापसाचे क्षेत्र गेले होते. गेल्या दोन वर्षांत मात्र गुलाबी बोंड अळीने कापसाचे मोठे नुकसान झाले. दोन वर्षांपूर्वी जवळपास सगळेच क्षेत्र बोंड अळीने बाधित झाले होते. त्यामुळे शासनाला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागली होती. राज्यातील राजकारणही याच कारणाने तापले होते.

त्यामुळे गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी कापूस लागवडीच्या आधी चार महिने प्रभावीपणे बोंड आळीबाबत जागृती केली. कापसाची फरदड घेऊ नये यासह अनेक बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी पुस्तिका, पत्रके, शेतीशाळा, वृत्तपत्रातून जागृती यासह अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे देशात पहिल्यांदाच एका वर्षात बोंड अळी नियंत्रणात आल्याचा दावा कृषी विभागाने केला होता. 

नगर जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठे आहे. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त असताना गेल्या वर्षी उसावर हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. प्रशासनाने केलेल्या पाहणीनुसार सुमारे साठ ते सत्तर टक्के उसावर हुमणीने हल्ला केला होता. त्याचाही मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. मुळात कृषी विभागाने यावर या वर्षीही प्रभावीपणे जागृती करणे गरजेचे आहे.

आता खरिपाची पेरणी साधारण महिन्यावर आली आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे जोरात सुरु आहेत. अशा वेळी नेमके काम केले पाहिजे, याबाबत जागृती करणे आवश्यक असताना कृषी विभागाने यंदा बोंड अळी व हुमणी नियंत्रणासाठीच्या जागृतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com