नागपूर : रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी विभागाची डोकेदुखी

रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी विभागाची डोकेदुखी
रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी विभागाची डोकेदुखी

नागपूर ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम उमरेड तालुक्‍यात कृषी सहायकांच्या रिक्‍त पदांमुळे प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. उमरेड तालुक्‍यात २४ पैकी केवळ १५ कृषी सहायक कार्यरत आहेत. 

मॉन्सूनोत्तर पावसामुळे उमरेड तालुक्‍यात कपाशी, सोयाबीन, धानपिकांचे नुकसान झाले. तालुक्‍यात धानाचे क्षेत्र १७५० हेक्‍टर असून यापैकी ५६६ हेक्‍टर क्षेत्रावरील धानाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६४७ शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. उमरेड तालुक्‍यात १९२ गावे आहेत. कृषी सहायकांच्या कामाचे नियोजन केल्यास एका कृषी सेवकाकडे १२ ते १५ गावांची जबाबदारी येते. 

कृषीसेवक हे शेतकरी आणि कृषी विभागातील दुवा असतात. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, समन्वय घडवून मार्गदर्शनाची जबाबदरी त्यांना पार पाडावी लागते. कृषी विभागात अन्य पदेही रिक्‍त आहेत. कार्यालयीन रिक्‍त पदांमुळे प्रभावित होणाऱ्या कामासोबतच शेतकऱ्यांच्या संपर्कातील कृषी सहायकांची संख्यादेखील अपेक्षित नसल्याने हा डोलारा सांभाळताना कृषी विभागाला कसरत करावी लागत आहे.

या हंगामात उमरेड तालुक्‍यात तीनदा सर्व्हेक्षणाचे काम झाले. सातत्याने सर्व्हेक्षणासाठी मनुष्यबळाची गरज भासते. परंतु ९ पदे रिक्‍त असल्याने हे कामदेखील अपेक्षेप्रमाणे आणि निर्धारित वेळेत होत नाही. त्यामुळे ही रिक्‍त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सरकारच्या काळात बहुतांश हेवीवेट मंत्रालय विदर्भाच्या वाट्याला आली होती. मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि अर्थमंत्रीदेखील याच भागातील होते. परंतु त्यानंतरही विदर्भातील रिक्‍त पदांचा अनुशेष दूर होऊ शकला नाही.

रबी क्षेत्रात होणार वाढ उमरेड तालुक्‍यात गेल्या वर्षी रबी क्षेत्र १४,३८२ हेक्‍टर होते. यामध्ये १०,२९४ हेक्‍टर हरभरा होता. २९७२ हेक्‍टर गहू लागवड होती. या वर्षी १,१०३ मिलिमीटर पाऊस तालुक्‍यात झाला. जमिनीत ओलसरपणा कायम असल्याने रबी पिकांच्या क्षेत्रात १० ते २० टक्‍के वाढीची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com