कृषी खाते देणार स्वतंत्र पास; पोलीस सहकार्य करीत नसल्याने काढला पर्याय

रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे वाहतूक जाळे लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले आहे. पोलीस देखील सहकार्य करीत नसल्याने हैराण झालेल्या कृषी खात्याने अत्यावश्यक सेवेचे स्वतंत्र पासेस वाटप सुरू केले आहे.
fertiliser_transport_1.jpg
fertiliser_transport_1.jpg

पुणे : तोंडावर आलेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हवे असलेल्या रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे वाहतूक जाळे लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले आहे. पोलीस देखील सहकार्य करीत नसल्याने हैराण झालेल्या कृषी खात्याने अत्यावश्यक सेवेचे स्वतंत्र पासेस वाटप सुरू केले आहे.

“लॉकडाऊनमध्ये निविष्ठा पुरवठ्यातील अडचणींकडे जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पहिल्या दिवसापासून लक्ष दिलेले नाही. त्यामुळे खतांची मालवाहतूक व पुरवठ्याची साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. ही साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी कृषी खाते धावपळ करीत आहे. मात्र, पोलीस अजूनही अटकाव करीत असल्याने स्वतंत्र पासेस देण्यात आले,”असे सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी येत्या खरिपात ४३ लाख टन खते उपलब्ध करून द्यायची आहेत. विविध कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये खते उपलब्ध आहेत. मात्र ती गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांच्या दारात जाण्यासाठी मनुष्यबळाची मोठी साखळी कार्यरत असते. ही साखळी विस्कळीत झाल्यास राज्यात भलत्याच समस्या उद्भवतात, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मनुष्यबळाच्या या साखळीत रेल्वे रेक, ट्रक्स, हमाल, माथाडी, चालक,क्लीनर, ट्रान्सपोर्टर्स कर्मचारी, खत कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि गावपातळीवरील विक्रेते यांचा समावेश होतो. यातील रेल्वे कर्मचारी सोडल्यास सर्व घटकांना विविध जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पोलिसांकडून अटकाव केला जातो आहे.

कृषी आयुक्तालयाकडे खत पुरवठ्याच्या समस्यांबाबत सातत्याने तक्रारी येऊ लागल्यानंतर आयुक्तालय देखील सजग झाले. “१८ एप्रिल रोजी आयुक्तालयाने सर्व खत कंपन्यांची व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे बैठक घेतली. लॉकडाऊनमध्ये खतांच्या रेक मालधक्यावर लागल्यानंतर लोडिंग-अनलोडिंगसाठी मजूर व माथाडी उपलब्ध नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले,” अशी माहिती कंपनी प्रतिनिधीने दिली.

मजूर, माथाडींना पोलिसांचा त्रास आहेच. पण, विविध खत कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी देखील त्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊ शकत नसल्याने कंपन्यांकडून खत वितरणाचे नियोजन कसे होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. याचा परिणाम राज्याच्या खत उत्पादन व वितरणावर होईल, असा निष्कर्ष आयुक्तालयाने काढला. त्यामुळेच पासेस वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.

लॉकडाऊन काळात कामासाठी कृषी खात्याकडून दिल्या जात असलेल्या पासेससाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, पासेसवर गुणनियंत्रण निरीक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पोलिसांनी पासेस मान्य करावेत “कृषी खात्याचे पासेस पोलिसांकडून सर्वत्र मान्य केले जातील की नाही याविषयी शंका आहे. तथापि, पोलिसांनी आता निविष्ठांबाबत जास्त छळ न करता परिस्थिती समजावून घ्यावी व पासेस मान्य करायला हवेत. खते, बियाणे, कीडनाशकांची ही निविष्ठा पुरवठ्याची विस्कळीत साखळी यंदा सरकारी यंत्रणेला त्रासदायक ठरू शकते. कारण, वेळेत खतांचा पुरवठा न झाल्यास त्यातून टंचाई होणे, ऐन खरिपात खतांसाठी रांगा लागणे, शेतकऱ्यांची आंदोलने होणे अशी समस्यांची मालिका सुरू होईल,” असा इशारा गुणनियंत्रण निरीक्षकाने दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com