कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित; घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची भीती

कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित; घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची भीती
कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित; घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची भीती

पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्याची कृषी आयुक्तांनी सुरू केलेली प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील जवळपास १८५ बदल्या संशयास्पदरित्या थांबविण्यात आल्याने घोडेबाजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.  मंत्रालयीन संवर्ग तसेच राज्य शासकीय गट ‘अ’मधील अधिकारी वगळून आता गट ‘ब’मधील अधिकारी आणि गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना समुपदेश बदलीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. यामुळे कृषी आयुक्तांनी समुपदेशाने पारदर्शकरीत्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती.  ‘‘समुपदेशन बदल्यांमुळे आयुक्तांच्या कामकाजाबाबत कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. आयुक्तांनी वर्ग दोन कनिष्ठ गटातील जवळपास २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या घोडेबाजाराला थारा न देता केल्या होत्या. मात्र वरिष्ट गटाच्या बदल्यांमध्ये कोलदांडा आणला गेला आहे. या गटात तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा परिषदेमधील कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी आणि विभागीय गुणनियंत्रण अधिकाऱ्यांची पदे आहेत. ही मलईदार पदे असून त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी ‘टेंडर’ भरलेली आहेत. आयुक्तालयातील एक आणि मंत्रालयातील एक अधिकारी टेंडर पद्धतीत पुढाकार घेतो आहे. समुपदेशामुळे मलईदार पदे मिळत नसल्याचे पाहून टेंडरफेम अधिकाऱ्यांनी समुपदेशन प्रक्रियाच हाणून पाडली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  आस्थापना सहसंचालक सुधीर ननावरे यांनी समुपदेशन प्रक्रिया स्थगित करणारा आदेश शनिवारी जारी केला आहे. आदेशात स्थगितीचे कोणतेही कारण दाखविण्यात आलेले नाही. कृषी आयुक्तालयापासून ते तालुका कार्यालयात फक्त समन्वयाने बदल्या करून घेण्यात काही अधिकारी पटाईत झालेले आहेत. काही अधिकारी मलईदार जागा हेरून जिल्हा किंवा मुख्यालयाच्या ठिकाणीच बदली मागतात. यात प्रामाणिक कर्मचाऱ्याची कोंडी केली जाते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. समुपदेशाने बदल्या करताना प्रामाणिक कर्मचाऱ्याला घोडेबाजारापासून सुटका मिळणार होती. मात्र आस्थापना विभागात कोणतेही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला, की मंत्रालयातून ‘धपाटा’ बसतो, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. कृषी विभागातील वर्ग एकच्या जागादेखील समुपदेशाने भराव्यात. यामुळे बदल्यांमधील भ्रष्टाचार संपुष्टात येईल व त्यातून खात्यांतर्गत योजनांमधील गैरव्यवहार देखील काही प्रमाणात कमी होईल, असेही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com