बदल्या समुपदेशनानेच...

बदल्या समुपदेशनानेच...
बदल्या समुपदेशनानेच...

पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या करण्यावर मंत्रालयातून आलेले गंडातर टळण्याची शक्यता आहे. राज्य कृषी सेवा गट ‘ब’मधील बदल्या समुपदेशनाने पुन्हा सुरू करण्यासाठी कृषी आयुक्तालयात हालचाली सुरू झाल्या आहेत.  कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी समुपदेशाने पारदर्शकरीत्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे घोडेबाजार व वशिलेबाजीला चाप बसून वर्ग दोन कनिष्ठ गटातील जवळपास ३२५ अधिकाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात झाल्या. मात्र, वरिष्ठ गटातील बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मंत्रालयातून अचानक आलेल्या आदेशामुळे समुपदेशाची फेरी रद्द करावी लागली.  ‘‘महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी संघटनेने समुपदेशन धोरणाला पाठिंबा दिला आहे. बदल्यांसाठी कृषी आयुक्तांकडून योग्य पावले टाकली जात आहेत. त्यातून पारदर्शक बदल्या होत असल्यामुळे अधिकाऱ्यांचा कामाचा हुरूप वाढणार आहे. त्यामुळे समुपदेशन स्थगित न करण्यासाठी आम्ही कृषिमंत्र्यांचीदेखील भेट घेणार आहोत,’’ अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली. 

मंत्रालयीन संवर्ग तसेच राज्य शासकीय गट ‘अ’-मधील अधिकारी वगळून आता गट ‘ब’मधील अधिकारी आणि गट ‘क’ व ‘ड’मधील कर्मचाऱ्यांना समुपदेश बदलीचे धोरण लागू करण्यात आलेले आहे. याच धोरणानुसार कृषी आयुक्तांनी पारदर्शकपणे बदल्यांना सुरवात केली होती. 

‘‘बदल्यांमध्ये नेहमी घोळ घालून मलई पळविणाऱ्या कंपूनेच समुपदेशन बंद पाडण्यासाठी मंत्रालयापर्यंत लॉबिंग केले. बदल्यांची पहिली फेरी कोणालाही रुपया न देता पारदर्शकपणे पार पडली. कृषी आयु्क्तालयाच्या इतिहासात प्रथमच इतक्या पारदर्शकपणे बदल्या होत असल्याचे पाहून कंपू अस्वस्थ झाला होता. त्यामुळेच मंत्रालयातील समुपदेशनावर स्थगिती आणली गेली आहे,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, कृषी आयुक्त श्री. सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की प्रशासकीय बाबींवर मी कोणतेही भाष्य करणार नाही. तथापि, राज्य शासनाच्या समुपदेशनाच्या धोरणानुसार बदल्या करण्याची आमची प्रक्रिया सुरू राहील. हा विषय लवकरात लवकर संपविण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com