कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना खीळ 

आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख असलेल्या जिल्ह्यात व्यावसायिकता रुजवत शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांना एका कृषी अधिकाऱ्यांकडूनच खीळ घातली जात आहे.
krushi vighag
krushi vighag

यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख असलेल्या जिल्ह्यात व्यावसायिकता रुजवत शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांना एका कृषी अधिकाऱ्यांकडूनच खीळ घातली जात आहे. शेतकऱ्यांकडून या अधिकाऱ्यांच्या अवास्तव गरजा पूर्ण केल्या जात नसल्याने हा प्रकार घडत असून राजकीय पाठबळामुळे त्याच्यावर कारवाईसाठी देखील कोणी जात नसल्याची चर्चा आहे. 

पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड हे वादग्रस्त म्हणून कृषी खात्यात प्रसिद्ध आहेत. यापूर्वीदेखील त्यांची बदली ‘वनामती’ येथे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वजिल्ह्यात बदली करुन घेतली. त्यानंतर राजकीय पाठबळावर कृषी उपसंचालकाचा पदभार मिळविण्यात ते यशस्वी ठरले. या माध्यमातून कृषी व्यावसायिक तसेच शेतकरी समूहांच्या छळवादाची मालिका त्यांनी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर भागातील विजय पाटील या युवकाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिकता रुजावी व आत्महत्या थांबाव्या याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. 

कळंब तालुक्यातील सावंगी डाफ येथे सावंगी फार्मर शेतकरी समूहाची स्थापना करण्यात आली. या समूहामार्फत कास्तकार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर कळंब तालुक्यातील सावरगाव, मेटिखेडा तसेच यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे कास्तकार सुविधा केंद्र उभे झाले आहेत. येत्या काळात बाभूळगाव, आर्णी तालुक्यातही कास्तकार सुविधा केंद्राची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. ५०० शेतकरी समूहांना या साखळीत जोडल्यानंतर त्याचे रूपांतर शेतकरी उत्पादक कंपनी केले जाणार आहे. या माध्यमातून या भागात उत्पादित मालावर प्रक्रिया त्याचे पॅकिंग आणि ब्रॅन्डींग करण्याचे नियोजित आहे. 

पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचा निविष्ठा खरेदीत होणारे शोषण रोखण्याकरता कृषी सेवा केंद्र समूहामार्फत सुरू करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या या प्रयत्नात कृषी उपसंचालक जगन राठोड जाणीवपूर्वक खीळ घालत असल्याचा आरोप समूहातील शेतकऱ्यांनी केला आहे. राठोड यांची युरियाची अवास्तव मागणी पूर्ण न केल्यामुळे सूड भावनेतून त्यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात आहे. युरिया खरेदीच्या निमित्ताने मर्जीतील लोकांना केंद्रावर पाठवून तसेच शेतकऱ्यांना फोनवर धमकावून दमदाटी करणे, महिला व्यवस्थापकाची हुज्जत घालणे असे प्रकार त्यांच्याद्वारे होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून या केंद्रास मेटीखेडा आदिवासी सोसायटीचे गोदाम भाडेकरारावर मिळू दिले नाही. 

पावसाळ्यात या केंद्राच्या परवाना नोंदणीकृत असलेल्या गोदामापर्यंत पर्यंत खताची अवजड वाहने नेण्यास अडचण होती. युरिया आणि खताची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खतांचा साठा सरपंच व शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थित नवीन गोदामात साठा करण्यात आला. त्याचवेळी गोदाम अटॅचमेंट करण्याकरिता ऑनलाइन चलन भरून तालुका कृषी अधिकारी कळंब यांच्यामार्फत प्रस्ताव देण्यात आला. त्यानंतरही जगन राठोड यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून या केंद्रावर कारवाई करण्याकरता भाग पडत आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भर होण्याच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न खुद्द कृषी उपसंचालकांकडून होत असल्याने हा अन्याय दूर करावा, अशी मागणी ५५ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.  कृषी सचिवांकडे तक्रार  कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली. कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यापर्यंत प्रकरण गेल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच संबंधितावर कारवाईचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. मात्र यामुळे जगन राठोड यांनी तक्रारकर्त्या शेतकऱ्यांवर तक्रार मागे घेण्यासाठी इतर माध्यमातून दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली. कृषिमंत्र्यांनी या प्रकरणात शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे जगन राठोड यांच्यावर आता कोणती आणि काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  प्रतिक्रिया कृषी उपसंचालक जगन राठोड यांच्या विरोधात जिल्ह्यात अनेक तक्रारी आहेत. त्याची दखल घेतली जाईल. त्यांच्याकडील उपसंचालक पदाचा प्रभार लवकरच काढण्यात येईल.  - सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com