मराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर दुपटीने कडाडले
मराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर दुपटीने कडाडले

मराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर दुपटीने कडाडले

कापसाच्या वेचणीला मजूर मिळेना. ६ ते ८ रुपये प्रतिकिलो वेचणीला मोजावे लागतात. मजुरांचा मुकादम दहा मजुरांमागे ३०० रुपये घेतो. शिवाय मजूर ने-आण करण्यामुळे हजार ते बाराशे रुपये खर्चाचा भुर्दंड दरदिवशी बसतो. - ईश्‍वर पाटील, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद. यंदा मजुरांच्या टंचाईमुळे शहरातून मजूर आणण्याची येळ आली. ८ ते ९ रुपये प्रतिकिलो वेचणीला मोजावे लागतात. एकरी ४ ते ५ क्‍विंटलच कापूस निघतो. दरही २५०० ते ४७०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यानच आहेत. दर चांगले मिळावे म्हणून चांगल्या कापसाची प्रतवारी करण्याची वेळ आली. - निवृत्ती घुले, वखारी, ता. जि. जालना. यंदा २५ एकरावर कपाशी असून, पहिले फुटलेल्या बोंडांना पावसाने कोंब फोडले. आता एकाच वेळी सगळीकडे कापूस फुटल्याने मजूर मिळेना. दहा रुपये प्रतिकिलो वेचणीला मोजावे लागतात. दहा ते बारा क्‍विंटल पिकणारा कापूस यंदा ३ ते ५ क्‍विंटल एकरीच्या पुढे जाणार नाही. शिवाय उत्पादन खर्चही वाढून बसला आहे. - जयप्रकाश तोष्णीवाल, तेलगाव, ता. धारूर, जि. बीड. एरवी कापसाच्या पाच ते सात वेचण्या व्हायच्या. यंदा आधी व नंतर पावसाने मारले. त्यामुळे आमच्या भागात कोरडवाहू शेतकऱ्यांची कपाशी एकाच वेचणीत उलंगणार आहे. थोडी बहुत सोय असणाऱ्यांच्या दोन वेचण्या कशाबशा होतील. एकरी उत्पादनात कुठे निम्मा, तर कुठे जास्त फटका बसला. - सदाशिव गिते, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

औरंगाबाद : जोरदार पावसाने केलेल्या नुकसानीतून वाचलेला कापूस आता सर्वदूर एकाच वेळी फुटला आहे. वेचणीला मजुरांचा तुटवडा भासतो आहे. वेचणीचे दरही दुपटीपेक्षा जास्त झाले असून, उत्पादनातही ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत फटका बसण्याची शक्‍यता आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली. अवेळी व अतिवृष्टीमुळे ऐरवी दोन-अडीच महिने चालणारी कापसाची वेचणी बहुतांश भागात पंधरवड्यातच संपण्याचा अंदाज आहे.

पावसामुळे यंदा खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात यंदा जवळपास १५ लाख ६५ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. सोयाबीननंतर सर्वाधिक क्षेत्रावर असलेल्या या पिकाकडून शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या. परंतु ऑक्‍टोबरमध्ये ऐन पहिल्या वेचणीवेळी जोरदार पाऊस झाला.

सततच्या या पावसाने मराठवाड्यातील कापूस उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. कापूस पावसाच्या अतिरेकामुळे काळवंडला आहे. पाच ते सात होणाऱ्या वेचण्या यंदा तीन होतील की नाही हा प्रश्‍न आहे. कोरडवाहू कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची कपाशी एकाच वेचनीत ''उलंगवाडी''  होणार आहे. थोडीफार सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या दोन किंवा अपवादात्मक ठिकाणी तीसरी वेचणी होण्याची शक्‍यता आहे. 

सततच्या पावसाने खराब झालेला कापूस वेचणी करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. शिवाय एकाच वेळी सर्वच भागात कापूस फूटल्याने वेचणीसाठी मजूराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मिळेल तिथून मजूर आणत कापसाची वेचणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना ७ ते १० रूपये प्रतिकिलोपर्यंत वेचनीसाठी मोजावे लागत आहेत. टप्प्याटप्प्याने कापूस फूटला तर चार ते पाच रूपये प्रतिकिलो वेचनीसाठी मोजावे लागत होते. याशिवाय मजूर आणण्यासाठी लागणारा दरदिवसाचा वाहनभाड्याचा खर्च हजार ते बारशे रूपयांपर्यंत गेला आहे. आधारभूत किमतीचा विचार करता २० ते ३० टक्‍के कमी दर कापसाला मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. 

साधारणत: आठ ते दहा क्‍विंटल एकरी उत्पादन होते. मात्र यंदा पहिल्या वेचनीचा विचार करता तीन ते पाच क्‍विंटलपुढे उत्पादन मिळण्याची शक्यता नाही.  पावसाने यंदा १४ लाख ६० हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाचे ३३ टक्‍क्‍यांपुढे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कसाबसा हाती येणार कापूसही उत्पादन खर्च, त्याचा दर्जा, त्याला मिळणारे दर पाहता शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com