कृषिमंत्र्यांनी घेतला कृषी विभागाचा ‘क्‍लास’

कृषिमंत्र्यांनी घेतला कृषी विभागाचा ‘क्‍लास’
कृषिमंत्र्यांनी घेतला कृषी विभागाचा ‘क्‍लास’

औरंगाबाद : तळागाळातला शेतकरी कृषी विभागाची यंत्रणा व शासनाकडे आशेने पाहतो आहे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये. नांगरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्याच्या जिवाला चैन नसते. तीच परिस्थिती आपलीही असायला हवी. प्रचंड संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फसविणारेही टपून बसलेले असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. जबाबदारी पार पाडली नाही तर गय केली जाणार नाही, ती वेळ येऊ देऊ नका, असे खडे बोल सुनावणारे राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी औरंगाबाद कृषी विभागातील यंत्रणेचा रविवारी (ता. ७) औरंगाबाद येथे झालेल्या आढावा बैठकीत चांगलाच क्‍लास घेतला. 

या आढावा बैठकीला विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर, आमदार नारायण कुचे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, जालनाचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिह कदम, औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदींची उपस्थिती होती. 

बैठकीला तीन ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, सहकार, महसूल, कृषी विभागाचे तालुका, उपविभाग पातळीवरील अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. 

या वेगवान बैठकीत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, विविध नैसर्गिक आपत्ती अनुदानवाटप, वीजटंचाई, पीक कर्जवाटप, खरीप हंगाम बियाणे, खते उपलब्धता, सर्व पीकविमा योजना, मनरेगा, भाऊसाहेब फूंडकर फळबाग योजना, कृषीच्या सर्व केंद्र व राज्य पुरस्कृत योजना आदींचा आढावा घेतला. औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा योजनानिहाय आढावा सादर करतानाच जालना व बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्याशी संबंधित योजनेविषयीची माहिती दिली. 

‘पोक्रा’चा ‘केम’ होऊ देणार नाही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला (पोक्रा) दिलेले नाव उगीच दिले नाही. त्यामागील कारण समजून घ्या. नानाजी देशमुखांच्या कार्याची माहिती अधिकाऱ्यांना विचारणाऱ्या कृषिमंत्र्यांनी या योजनेत सहभागी शेतकरी आर्थिक संपन्न व्हायलाच हवा. एकात्मिक मॉडेलच्या माध्यमातून त्यासाठी यंत्रणेने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. याआधी दिलेल्या डीपीआरचा रिव्हीव्ह घ्या. स्वातंत्र्यापासून कृषीविभागामार्फत विविध योजना आल्या पण त्या ज्या शेतकऱ्यांसाठी आल्या तो गरीबच राहिला. त्यामुळे यापुढे प्रत्येक योजनांची फलश्रुती होण्यासाठी ती एकात्मिक पद्धतीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

अन्नदात्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीत आपल्या कार्यकाळात निदान एका शेतकऱ्याची तरी यशोगाथा तयार होईल असं काम करा. तुमच्या अडचणी सोडवू, पुन्हा महिनाभराने भेटू तेव्हा चित्र बदललेलं असेल अशी आशा करतो. डॉ. अनिल बोंडे, कृषिमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com