कृषीमंत्री डाॅ. बोंडे
कृषीमंत्री डाॅ. बोंडे

कंपनीचा ब्रॅंड तयार करा; केवळ अनुदानाची अपेक्षा नको : कृषिमंत्री डॉ. बोंडे

अकोला ः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करतानाच आपल्या डोक्यात तिचे उद्दिष्ट ठेवा. कंपनीचा ब्रॅंड तयार करा. कुठल्याही शासकीय अनुदानाची अपेक्षा ठेवून कंपनी स्थापन करू नका. शेतकरी कंपनी, गटांना भविष्यात अनेक चांगल्या संधी आहेत, असे मत राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता. २) आयोजित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अमरावती विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, कुलगुरू डॉ. विलास भाले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, मार्गदर्शक मनाली अनिल बोंडे, गोविंद हांडे, संजय पांढरे, कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक, गणेश कंडारकर, मोरेश्वर वानखेडे, अशोक अमानकर, डॉ. विलास खर्चे, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. पी. के. नागरे, डॉ. महेंद्र नागदेवे यांच्यासह इतर उपस्थित होते. डॉ. बोंडे पुढे म्हणाले, ‘‘शेतकरी कंपनी स्थापन करताना केवळ निर्यातच करावी, असे डोक्यात ठेवू नका. देशात गुणवत्तेचा माल विकत घेणारा एक मोठा वर्ग आहे. या ग्राहकाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे. या ग्राहकाला हवे असलेले उच्च दर्जाचे अन्नधान्य, फळे त्यासाठी आपल्याला पिकवावी लागतील. असे उत्पादन केले तर दोन पैसे अधिक मिळतील. आपली शेतकरी कंपनी नफ्यात आणण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांप्रमाणे व्यावसायिकता अंगी जोपासावी. प्रत्येकाला आपला ब्रँड तयार करता आला तर तुम्हाला या क्षेत्रात कोणीही रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले. उद्‍घाटन सत्रात कुलगुरू डॉ. विलास भाले, प्रकाश पोहरे, मनाली बोंडे, गोविंद हांडे, संजय पांढरे यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रास्ताविकात विदर्भ, मराठवाड्यात स्थापन झालेल्या शेतकरी कंपन्यांचा आढावा घेतानाच त्यांची सद्यःस्थिती नेमकी कशी आहे याचा ऊहापोह केला. डॉ. बोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बँकांबाबत नाराजी या कार्यशाळेत वाशीम जिल्ह्यातील एका शेतकरी कंपनीने घेतलेल्या थ्रेशरचे लोकार्पण डॉ. बोंडे यांनी केले. या वेळी हे यंत्र खरेदीसाठी खासगी फायनान्स कंपनीकडून १९ टक्के व्याजदराने पैसे घेतल्याचे संबंधितांनी मंत्र्यांना सांगितले. कुठल्याही बँकांनी या यंत्र खरेदीसाठी पैसे पुरविण्यास उत्सुकता दाखवली नाही, अशी माहितीही दिली. हाच धागा पकडून डॉ. बोंडे यांनी उद्‍घाटनाच्या भाषणात बँकांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या प्रकाराला सर्व यंत्रणा जबाबदार असल्याचे ते म्हणाले. एवढ्या महागड्या दराने कर्ज घेऊन कुठली कंपनी कर्ज परत फेडू शकेल, काय नफा कमावेल, असा प्रश्न उपस्थित केला. या विषयात वाशीमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे होते. बँका एवढी असूया कशी ठेवू शकतात, अशी खंत व्यक्त केली.  ‘ॲग्रोवन’ वाचा कृषिमंत्री बोंडे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना सल्ला देताना इतर राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला दिला. दैनिक ‘ॲग्रोवन’ वाचा, तुम्हाला त्यामुळे फायदा होईल, असे सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com