भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
बातम्या
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार ऑनलाइन
ऑनलाइन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्प व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या (व्हीएसटीएस) माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे जात शेतकऱ्यांना ऑनलाइन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्प व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या (व्हीएसटीएस) माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
राज्यातील चार कृषी उत्पादक कंपन्यांच्या शेतकऱ्यांशी नामांकित ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या (ई-कॉमर्स) कंपनी पदाधिकाऱ्यांशी थेट बैठक झाली. यामध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा घेण्याचा निर्णय झाला.
पहिल्या टप्प्यात वाघ्या घेवडा, तूरडाळ, आजरा घनसाळ व नॉन बासमती तांदळाच्या जातीचे उत्पादन घेणाऱ्या अशा एकूण चार कृषी उत्पादक कंपन्यांना पॅकिंग व इतर बाबींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून भविष्यात आणखी कंपन्या जोडता येतील का, याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यात सध्या ‘स्मार्ट’ प्रकल्प राबविला जात आहे. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर कृषी विभागाच्या वतीने काम सुरू आहे. या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान कक्षाचा विभाग ऑनलाइन खरेदी- विक्री करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांशी थेट कशा जोडल्या जातील यासाठी या कंपन्यांशी संपर्क साधत आहे. ई-कॉमर्सचा ट्रेंड सध्या वेग पकडत आहे. यामध्ये शेतकऱ्याला फायदा होईल यासाठी नियोजन सुरू आहे.
याअंतर्गत सोमवारी (ता. ११) स्मार्ट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये वाघ्या घेवड्याचे उत्पादन घेणारा देऊर, (जि. सातारा) येथील जय तुळजाभवानी शेतकरी बचत गट, तूरडाळ पिकविणारा सोलापूरचा यशस्विनी बचत गट, घनसाळ तांदळाचे उत्पादन घेणारा आजरा (जि.कोल्हपूर) येथील आजरा ॲग्रो फार्मस प्रोड्यूसर कंपनी, नॉन बासमती तांदळाच्या जातीचे उत्पादन घेणाऱ्या भंडाऱ्याच्या नवचैतन्य फार्मस प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली. यामध्ये प्राथमिक आराखड्याबाबत चर्चा झाली. यात ई-कॉमर्स कंपनीचे पदाधिकारी सहभागी झाले.
स्वत:च्या ब्रॅडनेमनेच होणार उत्पादनाची विक्री
या प्रणालीअंतर्गत उत्पादनाचे पॅकिंग, उपलब्धता शेतकरी उत्पादक कंपन्याच करणार आहेत. थेट त्यांच्या नावानेच ही उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील. ऑनलाइन खरेदी- विक्री करणारी कंपनी फक्त आपली सशुल्क सुविधा देईल, अशा बेताने हा प्रकल्प तयार होत आहे. यासाठी सहभागी शेतकरी कंपन्यांच्या शेतकऱ्यांना कोणते प्रशिक्षण द्यायचे याचा आराखडा बनवणे सुरू आहे. सहभागी घटकांकडून सूचना, तांत्रिक बाबींचे संकलन करून त्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रतिक्रिया
शेतकरी बदल स्वीकारायला तयार होत आहेत. ही समाधानाची बाब आहे. यामुळेच पहिल्यांदा निवडक चार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यातील अन्य शेतकरी कंपन्यांच्या शेतकऱ्यांनाही यात सामावून घेण्यात येईल.
- दशरथ तांबाळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक,‘स्मार्ट’ प्रकल्प
- 1 of 1540
- ››