कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा वापर टाळा

agriculture pump do not use auto switch
agriculture pump do not use auto switch

नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी, रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टाळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात, असे सांगण्यात आले आहे.

ऑटोस्विचचा वापर टाळा राज्यात सुमारे ४२ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी, रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवून ऑटो स्विचचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com