बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान सप्ताह

अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट-बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव खुर्द व बायर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा ‘कृषिक २०२१ - कृषी तंत्रज्ञान सप्ताह’ सोमवार (ता. १८)पासून सुरू होत आहे.
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान सप्ताह
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान सप्ताह

माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट-बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव खुर्द व बायर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा ‘कृषिक २०२१ - कृषी तंत्रज्ञान सप्ताह’ सोमवार (ता. १८)पासून सुरू होत आहे.  शारदानगर कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केलेला या कृषी तंत्रज्ञान सप्ताहामध्ये सात दिवस (२४ जानेवारीपर्यंत) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळत शेतकऱ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. वैशिष्ट म्हणजे यंदा कृषी विज्ञान केंद्राबरोबर येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमधील सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावरील विविध शेतीप्रयोग, संशोधनात्मक प्रयोग शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत. विशेषतः माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री शंकरराव गडाख, दत्तात्रेय भरणे, विश्‍वजित कदम, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी सोमवारी भेट देणार आहेत.  याबाबत अधिक माहिती देताना अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार म्हणाले, की अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळावे, तसेच त्याचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात करावा व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खरेतर कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन केले. विशेषतः राज्यातील असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही संकल्पना राबविण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राची सरकारमार्फत स्टेट लेवल टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून निवड झाली आहे. 

कृषी सप्ताहामधील वैशिष्ट्य...!  २५० एकर क्षेत्रावरील अत्याधुनिक शेती व शेतीशी निगडित उद्योगांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत. ‘व्हीएसआय’ व ऊस संशोधन केंद्र- पाडेगाव येथील उसाच्या १० वाणांची प्रात्यक्षिके, तसेच कांदा व लसूण संशोधन केंद्र, ज्वारीच्या विकसित जाती, गहू व हरभरा पिकांच्या विविध जाती, मातीविना शेतातील फुले व भाजीपाला पिकांची प्रात्याक्षिके पाहायला मिळतील. तर हायड्रोजेल तंत्रज्ञान, मुरघास उत्पादन तंत्रज्ञान, गायी व म्हशींतील गर्भ प्रत्यारोपण तंत्रज्ञान, पशुखाद्य व चारा तपासणी प्रयोगशाळा, अत्याधुनिक गोठा व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. तसेच अॅग्रिकल्चर स्टार्टअप, इस्राईल व नेदरलॅंड येथील डच तंत्रज्ञानाचाही समावेश आहे.

शेतकऱ्यांना आवाहन...! कोरोनाच्या पार्श्‍वभमीवर शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. विशेषतः  सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक तापमान मोजून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून शेतकऱ्यांना प्रवेश असणार आहे. कृषिक २०२१ - कृषी तंत्रज्ञान सप्ताह दि १८ ते २४ जानेवारी २०२१  दरम्यान Agricultural Development Trust Baramati या Youtube Channel वर तसेच krushik (कृषिक)  या मोबाईल अॅपवर देखील पाहू शकता. सदर अॅप गूगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com