निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला चालना मिळेल : डॉ. चिंताला

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) माध्यमातून साकारत असलेल्या ‘कृषी निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्रा’मुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला दिशा मिळेल.
agri export
agri export

पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) माध्यमातून साकारत असलेल्या ‘कृषी निर्यात माहिती व मार्गदर्शन केंद्रा’मुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला दिशा मिळेल. तसेच निर्यातीला १०० दशलक्ष डॉलर्सच्या पुढे नेण्याचे ध्येय गाठता येईल, असे प्रतिपादन नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांनी केले.  ‘एमसीसीआयए’ व ‘नाबार्ड’च्या संयुक्त प्रयत्नांतून पुण्यात सुरू झालेल्या कृषी निर्यात केंद्राचे उद्‌घाटन दूरदृश्‍यप्रणालीद्वारे करताना डॉ. चिंताला बोलत होते. या वेळी एमसीसीआयएच्या कृषी व्यवसाय समितीचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, कृषी आयुक्त धीरज कुमार, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता व महासंचालक प्रशांत गिरबाने तसेच इतर मान्यवर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे यानेही कार्यक्रमाला हजेरी लावत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी होत असलेल्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या.  ‘‘देशाच्या कृषी निर्यातीत या केंद्राची भूमिका मोठी राहील. जगात सध्या आपण निर्यातीत तेराव्या क्रमांकावर आहोत. यात राज्यातून होणारी कृषी निर्यात ३० दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे. मात्र अशा उपक्रमांमुळे निर्यातीत आता १०० दशलक्ष डॉलर्सची झेप घेण्याची ताकद मिळेल,’’ असे डॉ. चिंताला यांनी नमूद केले.  ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी या केंद्राच्या उभारणीत सहभागी झाल्याबद्दल नाबार्डचे आभार मानले. ‘‘सध्या राज्याची व्यवस्था एका चिंताजनक स्थितीतून जात आहे. मात्र कोरोनानंतरचे जग हे अतिशय वेगळे असेल. अशा स्थितीत नाबार्डच्या माध्यमातून कृषी निर्यातीच्या बळकटीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरू होत आहे. चेंबरसाठी कृषी क्षेत्र मोलाचे आहे. या क्षेत्राला निर्यातीच्या माध्यमातून भविष्य मिळेल,’’ असा आशावाद मेहता यांनी व्यक्त केला.  दरम्यान, राज्यातील शेतकरी, निर्यातदार व निर्यातीशी संबंधित सर्व घटकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या कृषी निर्यात माहिती केंद्राबाबत www.mcciapune.com या संकेतस्थळावर तपशील देण्यात आले आहेत, असे एमसीसीआयएच्या वतीने सांगण्यात आले.  प्रशिक्षणातून बळकटी देणार  गरजेनुसार नेमकी माहिती व मार्गदर्शन करून राज्याच्या कृषी व्यवस्थेला निर्यातवाढीच्या माध्यमातून बळकट करण्याचे ध्येय या केंद्राचे आहे. त्यासाठी आम्ही विविध घटकांना प्रशिक्षण देणार आहोत. फळबाग व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादन, ब्रॅंडिंग, पॅकहाउस व वाहतूक व्यवस्थापन तसेच जागतिक दर्जाचे निर्यात निकष याची माहिती या केंद्रातून दिली जाणार आहे, असे श्री. सरंगी यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com