आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास शेती भकास: परिषदेतील सुर
पाण्याची पातळी घटत असताना अधिक पिके घेण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी आयएसआय मार्क असलेल्या ठिबक सिंचन संचांचा वापर करणेच आवश्यक आहे. ड्रिप इंडिया इरिगेशनची उत्पादने त्या दृष्टीने आदर्श आहेत. कृषितज्ज्ञ आप्पासाहेब पवार यांची प्रेरणा घेऊन १९८७ मध्ये सुक्ष्म सिंचन उद्योग सुरू केला. ६ ते ७ राज्यांत काम सुरू आहे.
- झुंबरलाल भंडारी, संचालक, ड्रिप इंडिया इरिगेशन प्रा. लि
नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला.
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर व प्रगतिशील शेतकरी अंकुश पडवळे यांनी या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. परिषदेचे उद्घाटन राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांच्या हस्ते झाले. परिषदेचे प्रायोजक ड्रिप इंडिया इरिगेशन प्रा. लि.चे संचालक झुंबरलाल भंडारी व सपल ॲग्रोटेक प्रा, लि.चे केशव चव्हाण या वेळी प्रमुख उपस्थित होते.
वारंवार होणारे दुष्काळाचे आघात, घटते पर्जन्यमान, वाढती मागणी यामुळे राज्यात निर्माण झालेल्या गंभीर पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘अॅग्रोवन’ने २०१९ हे पाणी व्यवस्थापन वर्ष जाहीर केले आहे. त्याअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी पाणी व्यवस्थापन परिषदा आयोजित करण्यात येत आहेत. नाशिकमधील परिषदेने या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
प्रास्ताविकात ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, की जलसंधारण या विषयावर जनजागृती होत असली तरी, पिकांचे काटेकोर पाणी व्यवस्थापन हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. त्याचे गंभीर परिणाम शेतीत पाहावयास मिळत आहेत. म्हणून ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन या विषयावर काम सुरू आहे.
परिषदेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरीचे कृषी विद्यावेत्ता डॉ. कल्याण देवळाणकर, अखिल भारतीय जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत बोडके, द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, नाशिक आत्माचे प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाठ, वसुंधरा पाणलोट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक राकेश वाणी, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागांतील शेतकरी, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांमधून २५ भाग्यवान विजेते निवडण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना ॲड्स्लाइट कंपनीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. सुत्रसंचालन मुकुंद पिंगळे यांनी केले.
डॉ. आर. जी. सोमकुंवर म्हणाले...
- निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाची गरज लक्षात घेऊन योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये देणे गरजेचे
- त्यासाठी द्राक्षवेलींचे संतुलित व्यवस्थापन करण्याबरोबर पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे
- पाण्याच्या वितरणात उशीर झाला तर, यामुळे वाढीच्या अवस्था निघून जातात. त्यामुळे वेळेत व योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होणे महत्त्वाचे आहे
- गर्भधारणा, घडनिर्मिती या अवस्थेत विविध टप्प्यांवर नोंदी ठेवून त्यानुसार बागेचे नियोजन करावे
- माती पाणी परिक्षणातवून वाढीवर परिणाम करणारे घटक व जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिती समजल्यावर त्याचे निराकरण करावे.
- द्राक्षाची एकसारखी जाडी, ताजेपणा, गोडी, टिकाऊपणा, उर्वरित अंश नसणे म्हणजे गुणवत्तापूर्ण उत्पादन होय.
अंकुश पडवळे म्हणाले...
- पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब संरक्षित करून पाण्याचा वापर करताना योग्य पीक नियोजन करणे गरजेचे आहे
- संरक्षित पाण्यासाठी शेततळी करणे अत्यावश्यक आहे
- सेंद्रिय कर्बासह जमीन सुधारणा, संरक्षित पाणी व त्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे
- आपल्या शेतातील पर्जन्यमानाच्या नोंदी करणे व दीर्घकालीन नोंदीच्या आधारे पीक नियोजन आवश्यक आहे
- पाणी वाचवण्यासाठी फळबागांना सेंद्रिय पद्धतीने, तर भाजीपाल्याला प्लॅस्टिक मल्चिंग करावे
- पिकाला किती पाणी दिले याच्या नोंदी ठेवाव्यात
- शेतातील उत्पादन वाढविण्याची अघोरी स्पर्धा सुरू असून, यामध्ये रासायनिक खतांचा व कीडनाशकांचा वापर अधिक वाढला आहे. त्यावर नियंत्रण आणून जमिनीची सुपीकता टिकवावी लागेल.
- 1 of 5
- ››