'ॲग्रोव्हिजन' प्रदर्शनाला २३ नोव्‍हेंबरपासून प्रारंभ

'ॲग्रोव्हिजन' प्रदर्शनाला २३ नोव्‍हेंबरपासून प्रारंभ
'ॲग्रोव्हिजन' प्रदर्शनाला २३ नोव्‍हेंबरपासून प्रारंभ

नागपूर : गेल्या नऊ वर्षांपासून शेतकरी, नागरिकांची गर्दी खेचणाऱ्या ''ॲग्रोव्हिजन'' या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या दशकपूर्ती सोहळ्याला २३ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यंदा नाविन्यपूर्ण स्टॉल, उपक्रमांचा समावेश असल्याचे प्रदर्शनाचे प्रवर्तक व केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यंदा प्रथमच सीएनजी, बायोडिझेलवरील ट्रॅक्‍टर लॉँच केले जाणार आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत हे ट्रॅक्‍टर देण्यावर भर राहणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

रेशिमबाग येथील मैदानावर दुपारी चार वाजता ''ॲग्रोव्हिजन''चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री राधामोहन सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत होईल. २६ नोव्हेंबरला या प्रदर्शनाचा समारोप होईल. या चारदिवसीय प्रदर्शनात शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर कार्यशाळा, कृषी प्रदर्शन, तज्ज्ञांचे चर्चासत्र, सादरीकरण, यशोगाथा आदीचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच प्रदर्शनात पर्यावरणपूरक ट्रॅक्‍टरचे लॉंचिंग व चंदनाची शेती, सोशल मीडिया व मार्केटिंगचा समावेश करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले.

कापूस, भाजीपाला, हरितगृह, शेडनेट तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन, कृषी वित्तपुरवठा, शेतकरी उत्पादक कंपन्या, जैविक शेती, संत्रा प्रक्रिया, जलयुक्त शिवार, हळद, आले उत्पादन, फूलशेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, कुक्कुटपालन, ऊस उत्पादन यावर कार्यशाळा होणार आहे. २४ नोव्हेंबरला विदर्भातील दुग्ध व्यवसायाचा विकास, २५ नोव्हेंबरला ‘बांबू उत्पादन व संधी’ यावर एकदिवसीय परिषद होईल. २५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सुरेश भट सभागृहात ‘भारतीय शेतीचे भविष्य` यावर तज्ज्ञांचे चर्चासत्र होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्षा निशा सावरकर, गिरीश गांधी, डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, रमेश मानकर, अशोक धोटे, माजीमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com