अन्नद्रव्यशोषण क्षमतेचा संत्रापट्ट्यात होतोय अभ्यास

संत्रा
संत्रा

नागपूर : संत्रापट्ट्यात रोगग्रस्त झाडांना सशक्‍त झाडाच्या तुलनेत जादा अन्नद्रव्ये आणि पाणी या बाबी दिल्या जातात. परंतु, यामुळे त्या झाडांची अवस्था सुधारणा तर दूरच उलट बागेतील इतर झाडांमध्ये फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. आयआयटी मुंबई, हैदराबाद आणि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथील तज्ज्ञ संयुक्‍तपणे हा अभ्यास करीत आहेत.

विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड  आहे. त्यातील ८० ते ९० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील झाडांपासून फळधारणा मिळते तर उर्वरित बागा या उत्पादनक्षम नाहीत. विदर्भाची वार्षिक संत्रा उत्पादकता आठ ते नऊ लाख टन आहे. विदर्भाची उत्पादकता कमी असल्यामागे रोगग्रस्त खुंटावर कलम बांधणे व त्याच्या परिणामी बागा रोगग्रस्त होणे, अशी कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. परिणामी विदर्भाचा संत्र्यासाठीचा कॅलिफोर्नीया अशी ओळख असलेल्या वरुड, मोर्शी परिसरात संत्रा बागा काढून टाकण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.  

रोगग्रस्त आणि सशक्‍त झाडांचा अभ्यास या भागातील संत्रा बागांमध्ये फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. त्यासोबतच संत्रा उत्पादकता घटण्यामागील इतर कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न गेल्या चार महिन्यांपासून आय. आय. टी. हैदराबाद, मुंबई व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांच्याद्वारे होत आहे. वरुड तालुक्‍यातील नागझरी व इतर गावांमध्ये तज्ज्ञ ठाण मांडून आहेत. रोगग्रस्त आणि सशक्‍त झाडांचा अभ्यास हे तज्ज्ञ करीत आहेत. त्यानुसार रोगग्रस्त झाडांना जादा अन्नद्रव्ये व पाणी शेतकरी देतात. परंतु, अशा झाडांची मुळेच खराब असल्याने ती जादा अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाहीत. परिणामी उर्त्सजनच अधिक होते.

सोबतच झाडांना पाणी जास्त दिल्याने या रोगग्रस्त झाडांच्या बुध्यांशी ते साचून राहते आणि बागेतील इतर झाडांमध्ये देखील फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता निर्माण होते, असे निष्कर्ष प्राथमिक टप्प्यात नोंदविण्यात आले आहेत. रोगग्रस्त आणि सशक्‍त झाडे किती अन्नद्रव्य आणि पाणी घेतात, हे मोजण्याकरिता सॅप फ्लो मीटरची मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकल्पाचे निष्कर्ष येत्या काही महिन्यांतच जाहीर करण्यात येणार आहेत. जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सह्योगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे हे या प्रकल्पावर काम करीत आहेत.

यापूर्वीदेखील झाले प्रयोग

यापूर्वीदेखील या भागातील काही संत्रा बागायतदारांच्या बागांमध्ये सेन्सर लावण्यात आले होते. मातीशी संपर्क असलेल्या या सेन्सरसोबतच सिमकार्ड जोडून त्यानंतर ती माहिती सर्व्हरला घेतली जात होती. पाणी दिल्यानंतर, बाग ताणावर सोडल्यानंतर मातीमध्ये होणाऱ्या स्थित्यंतरांची नोंद करून त्याआधारे निष्कर्ष दिले जायचे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com