agrowon editorial
agrowon editorial

क्रियेवीण वाचाळता व्यर्थच

लांब पल्ल्याच्या तसेच अल्प आणि मध्यमकालीन हवामान अंदाजातच अधिक अचूकता, स्पष्टता आणण्यात हवामान विभागाला यश येत नसताना दशकासाठीच्या अंदाजाबाबत बोलणे म्हणजे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, असेच म्हणावे लागेल.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या माध्यमातून देशात दहा वर्षांचे हवामान पूर्वानुमान वर्तविण्यासाठी संशोधन सुरू असून, तसे अंदाज देणे पुढील वर्षभरात शक्य होईल, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी स्पष्ट केले आहे. राज्यकर्त्यांकडून पाच-सात वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, देशाची अर्थव्यवस्थाही दुपटीवर पोचवू, अशी आश्‍वासने देण्याची आजकाल फॅशनच सुरू झाली आहे. दशकासाठीचा हवामान अंदाज हे एका हवामान तज्ज्ञांचे वक्तव्यसुद्धा त्याच पठडीत बसणारे वाटते. शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच देशाची अर्थव्यवस्था दुप्पट करण्यासाठी जसा काही आधार नाही, तसाच दशकाचा हवामान अंदाज वर्तविण्यासाठी देखील सध्यातरी काहीही आधार नाही. महत्त्वाचे म्हणजे यावर नेमके काय संशोधन झाले अथवा चालू आहे, यासाठी काही मॉडेल वगैरे विकसित करण्यात आले का, याबाबत काहीही स्पष्टता नाही. तसे काम खरोखरच सुरू असेल तर ते अगोदर देशातील हवामान, कृषीसह याबाबत संबंधित सर्वच विभागांच्या शास्त्रज्ञांपुढे मांडायला हवे. या माध्यमातून त्यावर सविस्तर चर्चा होणेही गरजेचे आहे. तसे न करता एखाद्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी सरळ त्याची घोषणा होत असेल तर ही बाबही योग्य नाही. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील दशकभरात दरवर्षी वर्तविण्यात येणारा चार महिन्यांचा (जून ते सप्टेंबर) लांब पल्ल्याचा हवामान अंदाज एकाही वर्षी अचूक ठरला नाही. मागच्या वर्षी तर देशात ९६ टक्के पावसाबरोबर त्याच्या सर्वसमान वितरणाचे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तविले होते. परंतु जून ते सप्टेंबर या काळात पूर्वानुमानापेक्षा अधिक म्हणजे ११० टक्के पावसाची नोंद झाली. देशपातळीवर मागील २५ वर्षांत एवढा पाऊस झाला नाही. सुरुवातीचे दोन मोठे खंड आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील पावसाबाबत काहीही अनुमान देण्यात आले नव्हते. आणि पावसाचे खंड तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील अतिवृष्टीने महाराष्ट्रासह देशभरातील शेतीचे फार मोठे नुकसान केले. हवामान विभागाचे अल्पकालीन (२४ तास) आणि मध्यम कालीन (४८ ते ७२ तास) हवामान अंदाजही बरेच चुकतात. अधिक गंभीर बाब म्हणजे ते एवढे ढोबळ असतात, की त्यातून शेतकऱ्यांना काहीही अर्थ लावता येत नाही. त्यामुळे शेतीचे जे नुकसान व्हायचे ते होतेच. लांब पल्ल्याच्या, तसेच अल्प आणि मध्यमकालीन हवामान अंदाजातच अधिक अचूकता, स्पष्टता आणण्यात हवामान विभागाला यश येत नसताना दशकासाठीचा अंदाजाबाबत बोलणे म्हणजे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, असेच म्हणावे लागेल.  

सध्या वेगवेगळ्या महिन्यात समुद्राच्या पाण्याचे तापमान, समुद्रावरील हवेचा दाब, भूपृष्टावरील हवेचे तापमान तसेच प्रशांत महासागरावरील उष्ण पाण्याचे आकारमान, हवेचा दाब, वाहणारे वारे यासह काही स्थानिक घटकांवरून हवामान अंदाज वर्तविण्यात येतो. महत्त्वाचे म्हणजे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ने हवामान झपाट्याने बदलत आहे. पुढील दहा वर्षांत ग्लोबल वॉर्मिंग ग्राफ कसा असेल, त्याचा नेमका हवामान अंदाजासाठीच्या जागतिक तसेच स्थानिक घटकांवर काय परिणाम होणार आहे, याबाबत काहीही निश्‍चितता नाही. ‘एल निनो’बाबतची भाकितेही अनेक वेळा खरी ठरत नसताना, हे असे का होते, यावरही मंथन कधी झाले नाही. या सर्व बाबींचा रीतसर अभ्यासही देशात चालू नाही. अशा अनिश्‍चित वातावरणात दशकभराचा अंदाज वर्तविणार कसा, हा मोठा प्रश्‍नच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com