`अॅक्शन प्लॅन’ करेल काम! 

संत्र्याच्या बाबतीत नवीन वाणं, प्रगत लागवड अन् व्यवस्थापण तंत्र यासोबतच काढणी, विक्री, मूल्यवर्धन आणि निर्यात यावर संशोधन संस्था तसेच शासन पातळीवर अद्यापपर्यंत फारसे काही काम झाले नाही.
agrowon editorial
agrowon editorial

मागील महिनाभरापासून विदर्भातील संत्रा उत्पादक फळगळीच्या समस्येने त्रस्त आहेत. बहार कोणताही असो संत्रा फळांची नैसर्गिक आपत्ती, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, अयोग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा कारणांनी फळगळ होऊन शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. खरे तर नागपुरी संत्रा जगभर प्रसिद्ध आहे. फळाचा आकर्षक रंग, आंबटगोड अशा चविने देशी-विदेशी बाजारपेठांतून संत्र्याला चांगली मागणी आहे. या गुणवैशिष्टांमुळे संत्र्याला ‘जीआय’ देखील मिळाला आहे. परंतू संत्र्याच्या बाबतीत नवीन वाणं, प्रगत लागवड अन् व्यवस्थापण तंत्र यासोबतच काढणी, विक्री, मूल्यवर्धन आणि निर्यात यावर संशोधन संस्था तसेच शासन पातळीवर अद्यापपर्यंत फारसे काही काम झाले नाही. त्यामुळेच विदर्भातील संत्रा उत्पादक आज प्रचंड अडचणीत तर देश-विदेशातील ग्राहक या फळाच्या अवीट चविपासून वंचित आहेत. 

संत्रा पट्ट्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, त्याच्याच अंतर्गत काटोल येथील संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय पातळीवरील लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र (एनआरसीसी) या संस्था असून त्यांच्यावर संत्रा या फळपिकात काळसुसंगत संशोधन, तंत्रज्ञान विकासाची जबाबदारी आहे. परंतू पुरातन काळातील संत्रा वाणाची अजूनही पारंपरिक पद्धतीनेच लागवड केली जाते. राज्यात हंगामी पिकांमध्ये रुंद-सरी वरंबा पद्धत, सूक्ष्म सिंचन, फर्टिगेशन अशा नवतंत्रांचा वापर करुन शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढविली आहे. संत्रा बागेला पारंपरिक आळे पद्धतीने पाणी दिल्‍यामुळे तसेच बागेत आणि झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळत नसल्याने फायटोप्थोरासह अनेक रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढून बागा वाया जात आहेत. तरीही बागेची छाटणी तसेच ठिबक सिंचन अशा तंत्रांचा प्रसार संत्रा बागायतदारांमध्ये झाला नाही. या सर्व बाबी हेरून राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी संत्र्याची नवीन वाणं शेतकऱ्यांना देण्यापासून बाग व्यवस्थापनाच्या नव्या चारसुत्रीवर आधारीत ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. 

निवड पद्धतीने संत्र्याचे नवीन वाणं निर्माण करून ते शेतकऱ्यांना देण्याची संकल्पना चांगलीच आहे. हे आत्तापर्यंत संशोधन संस्थांना का सुचले नाही, याबाबत आश्चर्य वाटते. शिवाय चारसुत्री पद्धतीने संत्रा बागा कीड-रोगमुक्त ठेऊन तसेच त्यांच्या उत्तम पोषणातून उत्पादकता निश्चितच वाढू शकते. एकनाथ डवले हे कल्पक, अभ्यासू, प्रामाणिक आणि परिणामकारक कार्य करणारे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी शेतरस्ते मोकळे करणे, दुष्काळात तलाव गाळमुक्त करणे, देशी गोवंश विकास आदींमध्ये उल्लेखनिय असे काम केले आहे. शेतकऱ्यांसाठी ते तळमळीने काम करीत असतात. शेतकऱ्यांनी सुद्धा नवतंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे संत्र्याला उर्जितावस्था देण्यासाठीचा त्यांचा अॅक्शन प्लॅन प्रत्यक्षात उतरुन त्याचा फायदा उत्पादकांना होईल, अशी आशा बळावते. याकरीता संत्रा उत्पादकांसह यातील संशोधन संस्थांचे पण योग्य ते सहकार्य त्यांना मिळायला हवे. 

संत्र्याच्या काढणीपश्चात काहीही सोयीसुविधा परिसरात विकसित झालेल्या नसल्यामुळे व्यापारी मागतील त्या दरात बाग विकून उत्पादकांना मोकळे व्हावे लागते. संत्र्याचे ग्रेडीग, पॅकींग, व्हॅक्स कोटींग केले तर टिकाऊक्षमता वाढून देशांतर्गत दूरच्या बाजारपेठेत पाठविता येते, शिवाय निर्यातही होऊ शकते. संत्रा पट्ट्यात दोन-तीनच अशी केंद्रे असून ते बहुतांश काळ बंदच असतात.

पंजाबमध्ये लिंबुवर्गिय फळपीक किन्नोचा ‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून एकात्मिक विकास साधण्यात आला आहे. किन्नोचे कलम तयार करण्यापासून ते विक्री-मूल्यवर्धनाबाबतचे सर्व मार्गदर्शन तेथील शेतकऱ्यांना होते. राज्यात याच धर्तीवर संत्रा उत्पादकांच्या मागणीनुसार सिट्रस इस्टेटला मान्यता देण्यात आली, त्यासाठी थोडाबहूत निधीही मंजूर करण्यात आला. परंतू यात शेतकरी आणि शासन यांच्या सहभागाबाबत एकमत होत नसल्याने हा प्रकल्प राज्यात दीड-दोन वर्षांपासून धुळखात पडून आहे. या प्रकल्पालाही राज्यात चालना मिळाल्यास संत्र्याचा एकात्मिक विकास साधता येईल, हे लक्षात घ्यायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com