संपादकीय.
संपादकीय.

पायाभरणी डिजिटल शेतीची

प्रगत कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत विद्यार्थी भारतीय शेतीतील सध्याच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम करतील. हे उपाय देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विद्यार्थी-प्राध्यापक- कृषी उद्योजक- शेतकरी यांची एकत्रित साखळी निर्माण करण्यात येणार आहे.
भारतीय शेती आजही बहुतांश पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. हरितक्रांतीमध्ये उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेले संशोधनानंतर प्रगत तंत्रज्ञानाच्या अवलंबाबाबत फारसे काही काम झालेच नाही. पिकांच्या संकरित जाती, रासायनिक खते कीडनाशके यांच्या वापरापलीकडे देशातील शेती गेली नाही. तेच ते बियाणे आणि अमर्याद रसायनांच्या वापराचे दुष्परिणाम शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही भोगावे लागत आहेत. देशातील शेतीत यांत्रिकीकरण आले. परंतु या यांत्रिकीकरणाचा खऱ्या अर्थाने फायदा यातील व्यावसायिक आणि मध्यस्थांनाच होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे दर्जेदार निविष्ठांपासून ते अद्ययावत तंत्रज्ञान आणि असे तंत्रज्ञान वापरण्यासाठीचे कौशल्ययुक्त मनुष्यबळ या साऱ्यांची वानवा भारतीय शेतीत दिसून येते. सध्याच्या हवामान बदलाच्या काळात शेतीचे नुकसान वाढले आहे. ते कमी करण्यासाठीसुद्धा आजपावेतो आपल्याला यश आलेले नाही. अनेक प्रगत देशांनी नवसंशोधन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बहुतांश पिकांची उत्पादकता वाढविली. त्याचबरोबर शेती डिजिटल करून कष्ट, जोखीम आणि खर्चही कमी केला आहे. त्यामुळे या देशांच्या तुलनेत आपली शेती अधिक खर्चिक आणि कमी उत्पादनक्षम आहे. अशा एकंदर परिस्थितीमध्ये राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात प्रगत कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र स्थापनेस नुकतीच मंजुरी मिळाली आहे. भारतीय शेतीचे डिजिटलायझेशन करण्याबाबतचा हा देशातील एकमेव प्रशिक्षण प्रकल्प म्हणावा लागेल. या प्रकल्पाद्वारे डिजिटल शेतीची देशात पायाभरणी करण्याचे काम होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञान भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीस अनुकूल बनविण्यासाठी लागणाऱ्या कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मितीचा हा प्रकल्प विद्यार्थिकेंद्रित आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी, अभियांत्रिकी तसेच इतर विज्ञान शाखेतील पदव्युत्तर आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांमधून  रोबोट, ड्रोन्स आणि स्वयंचलित यंत्र अशा तीन विभागांमध्ये प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना एक वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांबरोबर अमेरिका, स्पेन, युक्रेन, बेलारुस, रशिया आदी देशांतील तज्ज्ञांच्या (प्रत्येक विभागाकरिता तीन) मार्गदर्शनासाठी करार करण्यात आले आहेत. विदेशातील हे तज्ज्ञ त्यांच्या डिजिटल शेतीच्या वाटचालीबरोबर तेथील केस स्टडीज् (घटनांचा अभ्यास), यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगतील. याशिवाय देश-विदेशांतील २८ प्राध्यापक आणि शास्त्रज्ज्ञांनी या प्रकल्पात सहभाग घेऊ इच्छितात. महत्त्वाचे म्हणजे आयआयची पवई आणि खरगपूर या संस्थांचे ‘नॉलेज सेंटर्स’ म्हणून सहभाग लाभणार असल्याने प्रशिक्षण परिणामकारक ठरणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून पिकांवरील घातक कीड-रोगांवर तज्ज्ञांचे तत्काळ मार्गदर्शन मिळेल. नैसर्गिक आपत्तीत झालेले नुकसानही तत्काळ आणि अधिक अचूकतेने कळेल. शेतीत स्वयंचलित यंत्राद्वारे मनुष्यबळासह इतर यंत्रांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. शिवाय अशा यंत्राद्वारे शेतीची कामे जलद होतील अभ्यासक्रम पूर्ण करताना आणि त्यानंतर हे विद्यार्थी भारतीय शेतीतील सध्याच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम करतील. हे उपाय देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विद्यार्थी-प्राध्यापक- कृषी उद्योजक- शेतकरी यांची एकत्रित साखळी निर्माण करण्यात येणार आहे. या साखळीद्वारे शेतीच्या ज्वलंत समस्यांवर उपायांचा प्रसार झपाट्याने होईल. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विविध विषय-विभागांचे १० अॅप तयार आहेत. या प्रकल्पांतर्गत डिजिटल शेती तंत्रज्ञानाबाबत अजून ॲप तयार करून त्यांना शेतकरी जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान प्रसारात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. या प्रकल्पातंर्गत प्रशिक्षित तज्ज्ञ शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल शेतीची जोड देऊ शकतील. कृषी औद्योगिक क्षेत्रालाही प्रशिक्षित मनुष्यबळ लाभेल. एकंदरीत डिजिटल शेती तंत्रज्ञान या देशातील लहान मोठ्या अशा सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे असून, त्याचा उपयोग कृषी विकासात नक्कीच होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com