agriculture news in marathi agrowon agralekh on agriculture produce storage facilities on samrudhi highway | Agrowon

कृषी ‘समृद्धी’चा मार्ग

विजय सुकळकर
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

समृद्धी महामार्गावर शेतमाल साठवणुकीबरोबरच प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभारल्यास खऱ्या अर्थाने मूल्यसाखळी पूर्ण होणार आहे. यावरही केंद्र-राज्य शासनाने विचार करायला हवा.
 

बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत भव्य, 
अत्याधुनिक धान्ये साठवणुकीची गोदामे आणि शीतगृहे उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य वखार महामंडळाने रस्ते विकास महामंडळाकडे विविध ठिकाणी १०० एकर जागेची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत. रस्त्यांना विकास वाहिन्या म्हटले जाते. मुंबई-पुणे-नाशिक या ‘गोल्डन ट्रॅंगल’चा विकास हा या भागातील चांगल्या रस्त्यांच्या जाळे निर्मितीतून झाला आहे. या उलट विदर्भ, मराठवाडा विकासात मागे राहण्याचे एक कारण या भागातील खराब रस्ते हे आहे. परंतू आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची निर्मिती तसेच नागपूर-तुळजापूर मार्गाच्या होत असलेल्या कायापालटातून मराठवाडा, विदर्भातील वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार या सर्वांनाच चालना मिळेल.

समृद्धी महामार्गाद्वारे सध्या मुंबई ते नागपूर हे अंतर कापावयास लागणारा १४ तासांचा कालावधी ८ तासांवर येणार आहे. मुंबई येथील भारतातील सर्वात व्यस्त जवाहरलाल नेहरु बंदर ते नागपूर येथील मिहान विमानतळ यांना देखील हा महामार्ग जोडणारा आहे. इतरही अनेक राष्ट्रीय-राज्य महामार्ग यांस जोडले जाणार आहेत. त्यामुळे शेतमालासह इतरही उद्योग उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल. आयातीचा माल जलद भारतभर पोचण्यास हातभार लागणार आहे. अशा महामार्गावर पहिल्या टप्प्यात खासकरुन विदर्भ-मराठवाड्यातील वर्धा, बुलडाणा, औरंगाबाद येथे शेतमाल साठवणुकीसाठी गोदामे-शीतगृहे उभारली जाणार असतील तर त्याचे स्वागतच करायला हवे.

शेतकऱ्यांच्या घरात एकतर शेतमाल साठवणुकीस जागा नसते. बाहेर शेतमाल साठवून ठेवायचा म्हटलं तर राज्यात सर्वत्रच अशा सुविधांची वानवा आहे. शिवाय आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना तत्काळ शेतमाल विकून उधारी-उसणवारी, कर्ज परतफेड करायची असते. घरखर्चासाठी पण पैसा हवा असतो. सुगीच्या दिवसात तत्काळ शेतमाल बाजारात नेण्यावाचून शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो. त्यामुळे शेतमाल काढणी हंगामात बाजारात एकदमच आवक वाढून दर कोसळतात. हा मागील अनेक वर्षांपासूनचा हंगाम-दर-हंगाम प्रत्येक शेतमालाबाबतचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अशावेळी समृद्धी महामार्गावर शेतमाल साठवणूक गोदामे तसेच शीतगृहे निर्माण झाल्यास त्यात शेतकरी, व्यापारी, निर्यातदार आपला शेतमाल साठवू शकतील. याद्वारे साठवणुकीत शेतमालाच्या होणाऱ्या नासाडीस आळा बसेल. गोदामे आणि शीतगृहांमध्ये शेतमाल साठविल्यानंतर तारण कर्ज योजना त्यास जोडली जाणार असल्याने शेतकऱ्यांची पैशाची नड भागेल. राज्यात शेतमाल साठवणुकीच्या सेवासुविधा वाढल्यास बाजारातील दरही स्थीर राहतील. साठवणूक केलेल्या शेतमालाचा ऑनलाइन लिलाव करता येणार असल्याने त्यास रास्त दरही मिळू शकतो.

कृषी पणनबाबतच्या पायाभूत सुविधा असो की सुधारणा त्यामध्ये नवनव्या योजना, प्रकल्पांच्या माध्यमातून सातत्याने कामे होत असतात. परंतू त्यांचे दृश्य परिणाम मात्र दिसून येत नाहीत. तसे समृद्धी महामार्गावरील गोदामे-शीतगृहे योजनेचे होता कामा नये. हा प्रकल्प विनाविलंब, पारदर्शीपणे पूर्ण करुन त्याचे लाभ संबंधित घटकांपर्यंत पोचायला हवेत. याच महामार्गावर शेतमाल साठवणुकीबरोबर विदर्भ-मराठवाड्यात प्रामुख्याने पिकणाऱ्या कापूस, सोयाबीन, तूर, हळद, संत्रा, मोसंबी, केळी यावरील प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभे राहिल्यास खऱ्या अर्थाने मूल्यसाखळी पूर्ण होणार आहे. यावरही केंद्र-राज्य शासनाने विचार करायला हवा. असे झाले तरच जिरायती पट्ट्यातील कायमच आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्धी लाभेल.


इतर संपादकीय
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
भार व्यवस्थापनाचे बळीजालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे येथील तिघे...
सहकारी अंकेक्षण कालबाह्य ठरतेय काय? ‘हिशेबांच्या पुस्तकाचे बुद्धिकौशल्याने सखोल...
ऊस उत्पादकांनो, समजून घ्या ‘एफआरपी‘चे...राज्यातील साखर उद्योगातील सर्व घटक ‘एफआरपी‘भोवती...
देर आए दुरुस्त आएजीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) अर्थात ‘भौगोलिक...
शाश्‍वत सेंद्रिय शेतीविश्‍वजगभरातील १८६ देशांतून एकूण ७१.५ दशलक्ष हेक्टर...
‘विजे’खालचा अंधारकृषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
विजेखालचा अंधारषिदराने वीजपुरवठ्याची मागणी करणाऱ्या जालना...
मेळघाटातील आदिवासी बांधवांची दिवाळीनुकताच १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजन या...
शेतीला आधार हवा सर्वंकष विम्याचाराज्यातील अनेक भागांत परतीच्या तुफान...
‘दान समृद्धीचे पडो कष्टाच्या पदरी’दिवाळी सणास सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहेत. अजून...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
रब्बी पीकविमादेखील असतो ना भाऊ!रब्बी हंगामासाठी पीककर्ज असते, हे जसे राज्यातील...
शास्त्रशुद्ध अभ्यासातून वाढवूया देशी...देशी गाईंमध्ये दुष्काळी आणि टंचाईच्या काळात तग...
शेतकरी हित सर्वप्रथमराज्यात मागील दोन दशकांपासून कापसाचे संकरित बीटी...