‘कट’ कारस्थान थांबवा

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम उभा केला असता, कनेक्शन कटमुळे तोही हातचा जातो की काय? अशा चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
agrowon editorial
agrowon editorial

सध्या राज्यात रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. गहू, हरभरा, करडई, ज्वारी ही पिके ओंब्या, घाटे, बोंडे, कणसे धरून आहेत. या अवस्थेत घाटे-ओंब्यातील दाणे भरण्यासाठी त्यास पाण्याची आवश्यकता असते. काही भागात ऊस, उन्हाळ कांद्याची देखील लागवड सुरू आहे. नेमक्या अशावेळी महावितरणकडून शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत बिले असलेल्या शेतीपंपाचे कनेक्शन कट करण्याचे कारस्थान सुरू आहे. ऐन हंगामात कृषीपंपाचे कनेक्शन कट केले जात असल्याने शेतकरी प्रचंड तणावात आहेत. घरगुती वीज ग्राहकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिलामध्ये सवलत देतो म्हणून राज्य शासनासह महावितरणने नऊ महिने घोळविले. ही सवलत मिळण्याची वाट बघत अनेक ग्राहकांनी घरचे बिल एप्रिलपासून भरलेले नव्हते. अशा ग्राहकांना काही सवलत न देता घरची वीज कट करण्याचा सपाटा महावितरणने लावला. ग्राहकांकडे काही पर्याय नसल्याने लॉकडाउन काळात चुकीची, वाढून आलेली बिले त्यांनी भरून वीज जोडणी करून घेतली. कारण सध्याच्या काळात अंधारात कोणी राहू शकत नाही. याचा (गैर)फायदा महावितरणने घेतला. तोच फंडा आता कृषीपंपाच्या विजेसाठी अवलंबिला जात आहे. हाती आलेली पिके शेतकरी वाळू देणार नाहीत, याची महावितरणला चांगली जाणीव आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अतिवृष्टीने हातचा गेला. त्यातच लॉकडाउनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. प्रतिकूल अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम उभा केला असता, कनेक्शन कटमुळे तोही हातचा जातो की काय? या चिंतेने शेतकऱ्यांना आता ग्रासले आहे. राज्य सरकारने नवीन वीज जोडणी धोरणांतर्गत वीज बिल सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषीपंपाची वीज बिले दुरुस्त करून मिळावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. राज्यातील ८० टक्केहून अधिक शेतकऱ्यांची बिले सरासरीने दुप्पट व त्याहूनही अधिक झालेली आहेत. हे मान्य करीत सर्व कृषीपंपाची बिले दुरुस्त करून दिली जातील, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. शासनाच्या अशा घोषणेनंतर महावितरणने स्वतःहून कृषीपंप ग्राहकांकडे जाऊन त्यांची बिले दुरुस्त करणे गरजेचे होते. परंतु सध्या तरी जे शेतकरी तक्रार नोंदवून, महावितरणकडे बिल दुरूस्तीचा वारंवार आग्रह करीत आहेत, त्यांची बिले दुरुस्त केली जात आहेत. कृषीपंपाची बिले दुरुस्त होऊन खरी थकबाकी शेतकऱ्यांना कळणार नाही, तोपर्यंत शेतकरी वीज बिल सवलत योजनेत सहभागी होऊ शकत नाही. हे लक्षात न घेताच शेतीचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत.

 बिल सवलत योजनेत सहभागी होण्यासाठीची मुदत मार्च २०२२ अखेरपर्यंतची आहे. त्यानुसार पहिला हप्ता मार्च २०२२, दुसरा हप्ता मार्च २०२३ आणि तिसरा हप्ता मार्च २०२४ अखेर भरावयाचे आहेत. यामध्ये चालू बिल नियमित भरले पाहिजेत, अशी अट घालण्यात आली आहे. जाहीर केलेल्या योजनेनुसार सप्टेंबर २०२० अखेरपर्यंतची थकबाकी महावितरण कंपनीच्या वतीने निश्चित करण्यात आली आहे. अर्थात सप्टेंबर २०२० पर्यंतची सर्व थकबाकी हिशेबात घेतली आहे. अशावेळी चालू बिलाचा अर्थ डिसेंबर २०२० पासून पुढे येणारी बिले असा होतो. डिसेंबर २०२० चे बिल जानेवारी २०२१ मध्ये आलेले असेल. अर्थात मागच्या महिन्यात हे बिल ज्या शेतकऱ्यांनी भरले ते सर्व शेतकरी सवलत योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. आणि सवलत योजनेनुसार थकबाकीचा पहिला हप्ता मार्च २०२२ अखेरपर्यंत भरावयाचा आहे. अशावेळी शेतीपंपाचे कनेक्शन कट करून महावितरण आपल्याच योजनेला हरताळ फासण्याचे काम करीत आहे. महावितरण तसेच राज्य शासनाने शेतीपंपाची वीज तोडणी त्वरित थांबवून त्यांनीच जाहीर केलेल्या योजनेची प्रभावी आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी करायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com