agriculture news in marathi agrowon agralekh on agril resarch and extention work | Agrowon

इशारे ठीक; आता हवी कृती

विजय सुकळकर
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा हा उत्पादनवाढीसाठी तर शेतीमाल विक्री आणि निर्यात या शेतकऱ्यांच्या थेट उत्पन्नवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळाला, तर हे त्यांच्यासाठी मोठे दिलासादायक काम होईल.

शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळायला हव्यात, यासाठी कृषी विभाग 
 प्रयत्नशील असून, यात शेतकऱ्यांची फसवणूक आता सहन केली जाणार नाही, असा इशारा कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या अधिवेशनात दिला, ते बरेच झाले. परंतु, निविष्ठांचा फोफावलेला काळा बाजार पाहता याबाबत केवळ इशारा देऊन भागणार नाही. बी-बियाणे, रासायनिक-सेंद्रिय-जैविक खते, वाढवृद्धीकारके, तणनाशके आणि कीडनाशके यातील बोगसगिरी आणि भेसळ, यात राज्यात मोठे रॅकेट काम करते. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे हे काम निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण विभागातील काही भ्रष्ट लोकांना हाताशी धरून चालते. यातील अनेक गैरप्रकार अॅग्रोवनने वेळोवेळी उघड केले आहेत. काही नफेखोर कंपन्या, अशा कंपन्यांच्या उत्पादनांचे वितरक आणि कृषी विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी-अधिकारी यांच्या संगनमताने हा सर्व काळा बाजार चालतो. ही पूर्ण साखळी उद्‍ध्वस्त केल्याखेरीज दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना होणार नाही.

निविष्ठांच्या खरेदीतील फसवणुकीबरोबर शेतीमाल विक्री आणि निर्यात यातही होणाऱ्या लुटीवर आयुक्तांनी बोट ठेवले. शेतकऱ्यांच्या पातळीवर होणारी खरेदी-विक्री आणि निर्यात या पूर्ण प्रक्रियेवर स्वतंत्र नियंत्रण गरजेचे असल्याबाबतही त्यांनी मान्य केले आहे. दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा हा उत्पादनवाढीसाठी तर शेतीमाल विक्री आणि निर्यात या शेतकऱ्यांच्या थेट उत्पन्नवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळाला तर हे त्यांच्यासाठी मोठे दिलासादायक काम होईल, हे लक्षात घेऊन यावरील प्रभावी नियंत्रणासाठी आयुक्तांनी पाठपुरावा करायलाच हवा.

शेती संशोधन हे पीएच.डी.सारख्या पदव्या मिळविण्यासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या समस्यांच्या समाधानासाठी व्हावे, तसेच कृषी विभागाने केवळ योजना राबविण्याचे काम करू नये, अशा शब्दांत आयुक्तांनी कृषी विद्यापीठांबरोबर आपल्या विभागाचाही समाचार घेतला. बदलत्या हवामान काळातील आव्हाने पेलण्यात शेतकरी असमर्थ ठरतोय. याचे प्रमुख कारण म्हणजे काळाबरोबर चालणाऱ्या संशोधनाचे पाठबळ शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. राज्यातील कृषी संशोधनातील ही मोठी उणीव म्हणावी लागेल. चारही कृषी विद्यापीठांच्या जॉइट अॅग्रेस्को दरवर्षी शेकडो शिफारशींना मान्यता मिळते. परंतु त्यांचा वापर कोण, कधी, कसा करतात, हाच संशोधनाचा विषय ठरू शकतो. यातील बहुतांश शिफारशींचा शेतकऱ्यांकडून वापर होत नाही. कारण एक तर त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. पोचल्या तर त्या त्यांच्या गरजेवर आधारित नसल्याने त्यांना उपयुक्त ठरत नाहीत.

अनेक प्रगत देशांत शेतकऱ्यांच्या समस्यांची सांगड कृषीचे पदवीधर तसेच पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांशी घातली गेली आहे. कृषी क्षेत्रातील कंपन्या (निविष्ठा, अवजारे उत्पादक, प्रक्रिया उद्योग आदी) त्यांना हवे असलेले संशोधन कृषीच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतात. अशा प्रकारचे संशोधन शेतकरी तसेच कृषी उद्योगाला तत्काळ उपयुक्त ठरते. कृषी संशोधनात अशा प्रकारचा बदल आपल्याकडे कधी पाहावयास मिळेल, हा खरा प्रश्न आहे. कृषी विभागाच्या विस्तार कार्याबद्दल बोलायचे झाल्यास आजही अनेक योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाहीत. पोचल्या तर पुरेपूर माहितीअभावी त्यांचा लाभ अनेक शेतकरी घेऊ शकत नाहीत, हे वास्तव लक्षात घेऊन आयुक्तांनी कृषी विभागातील सुधारणा हाती घ्यायला हव्यात. दर्जेदार निविष्ठांच्या पुरवठ्यापासून ते शेतकऱ्यांना बाजारभिमुख मार्गदर्शनाकरिताचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू करायला हवी. विशेष म्हणजे यात चालढकलपणा, दफ्तर दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारायला हवा. असे केल्याशिवाय कृषी विभागात सुधारणा शक्य नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. 


इतर अॅग्रो विशेष
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...