कसा टिकेल हापूसचा गोडवा?

कोकणातील हापूससाठी मुंबई, पुणे, अहमदाबाद या महत्त्वाच्या बाजारपेठा मानल्या जातात. या बाजार समित्या ऐन हंगामात सुरळीत चालू राहायला हव्यात.
agrowon editorial
agrowon editorial

गेल्या हंगामातील लांबलेला पावसाळा, थंडीचे अत्यंत कमी प्रमाण यामुळे कोकणातील हापूस आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबली. मोहोर कमीच लागला. त्यातच फेब्रुवारीमध्ये झालेल्या पावसाने बहुतांश हापूस डागाळला. त्यामुळे चालू हंगामात एकूण लागवड क्षेत्राच्या ७० टक्के तर उत्पादनक्षम क्षेत्राच्या ५० टक्के हापूस आंबा उत्पादन घटणार आहे. त्याचा परिणामही बाजारपेठेवर दिसतोय. दरवर्षी मार्चमध्ये २५ हजार ते ३० हजार पेट्या बाजारात जातात. यावर्षी हे प्रमाण १० ते १२ हजार पेटी असे मर्यादित आहे. १० ते १५ एप्रिल दरम्यान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक लाख हापूसच्या पेट्या बाजारात जातात. यावर्षी मात्र ३० ते ३५ हजार पेट्याच बाजारात गेल्या आहेत. हापूसचे उत्पादन कमी म्हणजे बाजारातील आवकही कमी, मागणी जास्त त्यामुळे दरही वधारून आहेत. एप्रिलमध्ये हापूस आंब्याला १५०० ते ३५०० रुपये पेटी (एक पेटी म्हणजे ५ ते ६ डझन आंबे) असा दर असतो. यावर्षी २००० ते ५००० रुपये प्रतिपेटी दर मिळतोय. हापूसला अधिक दर मिळण्याचे अजून एक कारण म्हणजे काही आंबा बागायतदारांनी मुंबई, पुणे येथील ग्राहकांना थेट आंबा विक्री सुरू केली आहे. गेल्यावर्षी कोरोना लॉकडाउनमध्ये आंबा हंगाम सापडला होता. त्यावेळी हापूस उत्पादकांनी थेट ग्राहकांशी संपर्क साधला. यातून बऱ्यापैकी विक्री सुद्धा झाली. यावर्षी देखील कोरोना लॉकडाउनच्या सावटाने हापूसची थेट विक्री वाढत आहे.

हापूसच्या थेट विक्रीमुळे वाशी मार्केटमध्ये १० ते १२ टक्के आवक घटली आहे. थेट विक्रीचा पुणे बाजार समितीच्या आवकेवरही परिणाम झाला आहे. लॉकाडाउनच्या पार्श्वभूमीवर हापूसची थेट विक्री वाढत असताना वाहतूक, विक्रीमध्ये काही निकषांच्या आड उत्पादक, विक्रेत्यांची अडवणूक होते आहे. त्यामुळे काही बागायतदारांनी आंबा काढणी थांबविली आहे. १५ एप्रिल ते १५ मे हा खरे तर हापूस आंबा काढणी, विक्रीचा महत्त्वाचा हंगाम! या काळात लॉकडाउनमुळे काढणी, विक्रीला अडचणी आल्यास त्याचा थेट फटका उत्पादकांना बसणार आहे.

कोकणातील हापूससाठी मुंबई, पुणे, अहमदाबाद या महत्त्वाच्या बाजारपेठा मानल्या जातात. या बाजार समित्या ऐन हंगामात सुरळीत चालू राहायला हव्यात. असे झाले नाही तर बाजारात आंबा येऊन त्याची योग्य विक्री होणार नाही. बाजारातील आंबा शिल्लक राहून मागणी घटेल, दरही पडतील. बागेतील आंब्याची काढणीही वेळेवर झाली नाही तर आंबा झाडावरच मोठ्या प्रमाणात खराब होईल. सध्याच्या लॉकडाउनमध्ये आंबा काढणी, वाहतूक, विक्री यात कोणताही अडसर येणार नाही, ही काळजी शासन-प्रशासनाने घ्यायला हवी. गेल्या हंगामात लॉकडाउनमुळे हापूसची ३० टक्के निर्यात प्रभावित झाली होती. यावर्षी मुळातच देशांतर्गत मागणी अधिक असल्याने निर्यातीला वाव कमीच आहे. राज्यात दुसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत हापूस जाणार नाही, असेच चित्र आहे. युरोप, आखाती देशांत हापूस निर्यात होऊ शकतो. परंतु विमान वाहतुकीचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत.

अशावेळी उत्पादक, निर्यातदार यांना निर्यातीसाठी अनुदान दिले तरच हापूस बाहेर जाऊ शकतो. उत्पादन घटणार असल्याने प्रक्रियेसाठी कमीच आंबा उपलब्ध होऊन त्यासही मोठा फटका बसू शकतो. एकंदरीत नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना महामारी यामुळे मागील वर्षभरापासून आंबा उत्पादक प्रचंड अडचणीत आहेत. बहुतांश आंबा उत्पादक कर्जबाजारी झाले आहेत. अशावेळी आंबा उत्पादकांचे कर्ज पुनर्गठन प्रक्रिया तत्काळ सुरू करावी. थकीत कर्ज माफ देखील करायला हवे. असे झाले तरच अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत हापूसच्या बागा आणि उत्पादकही टिकतील, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com