agriculture news in marathi agrowon agralekh on apmc should be run during lock down | Agrowon

सहकार्य अन् समन्वयातून सुरू ठेवा बाजार समित्या

विजय सुकळकर
मंगळवार, 13 एप्रिल 2021

लॉकडाउनमध्ये केवळ बाजार समित्या चालू ठेवून उपयोग नाही, तर शेतीमालाची संपूर्ण पुरवठा साखळी सुरू राहिली पाहिजेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण लॉकडाउन की कडक निर्बंध यावर राज्य शासन विचार करतेय. लॉकडाउनमुळे प्रभावित होणारे घटक यांस विरोध करताहेत. परंतु दुसरीकडे परिस्थिती हाताबाहेर गेली तर करायचे काय? असाही पेच शासनासमोर आहे. राज्याच्या ‘टास्क फोर्स’ने लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध, अशीच शिफारस केलेली आहे. असे असले तरी सध्याच्या या कुठे अंशतः तर कुठे पूर्णतः लॉकडाउनच्या खेळात शेतीमाल विक्री व्यवस्था मात्र पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.

भाजीपाल्यासह इतरही शेतीमाल जीवनावश्यक असताना शिवाय बाजार समित्या अत्यावश्यक सेवेत असताना राज्यात बाजार समित्या बंद ठेवण्यात येत आहेत. जनावरांचे बाजार तसेच आठवडी बाजार तर मागील अनेक दिवसांपासून बंदच आहेत. त्यामुळे शेतीमाल विक्रीसह जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकऱ्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्यावर्षी सुद्धा एप्रिल-मेमध्ये देशभर कडक लॉकडाउन होते. अशावेळी सुरवातीचे काही दिवस वगळता पुण्यासह राज्यातील ३०७ पैकी २४० बाजार समित्या चालू होत्या. या अनुभवावर सद्य परिस्थितीत तर सर्व बाजार समित्या सुरळीतपणे चालू राहणे गरजेचे होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे पणन संचालकांनी पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून बाजार समित्या सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शेतीमाल जीवनावश्यक असल्याने त्याचा पुरवठा करणाऱ्या बाजार समित्या लॉकडाउनमध्ये सुद्धा चालू ठेवण्यात याव्यात, असे आदेश असले तरी पोलीस, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा स्थानिक प्रशासन पातळीवर त्यात ढवळाढवळ होते. कुठे गर्दीचे कारण सांगत पोलीस तर कुठे बाधितांची संख्या वाढत आहे म्हणून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने बाजार समित्या बंद ठेवल्या जातात. अशावेळी बाजार समित्या चालू ठेवण्याबाबत लॉकडाउनमध्ये पणन मंत्री, पणन संचालकांसह स्थानिक प्रशासनाशी योग्य समन्वय आवश्यक आहे. अशा समन्वयातून स्पष्ट आदेश सुद्धा अपेक्षित आहे.

केवळ बाजार समित्या चालू ठेवून उपयोग नाही, तर शेतीमालाची संपूर्ण पुरवठा साखळी सुरू पाहिजेत. मागच्या वर्षी लॉकडाउनमध्ये बाजार समित्या सुरू होत्या. परंतु घाऊक खरेदीदार, मोठे-मध्यम-लहान व्यापारी आणि स्टॉलधारक, हातगाडीवरून फळे-भाजीपाला विकणारे ही पुरवठा साखळी बंद होती. त्यामुळे ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोचण्यात अडचणी येत होत्या. ग्राहक थेट बाजार समित्यांमध्ये येऊन शेतीमाल खरेदीसाठी गर्दी करीत होते. यावेळी बाजार समित्या सुरू ठेवताना ही संपूर्ण पुरवठा साखळी देखील सुरू राहील, हे पहायला हवे. बाजार समित्यांत अनावश्यक गर्दी होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. मोठ्या शहरांतील बाजार समित्या ह्या फळे-भाजीपाल्यांचे गट करून त्यांच्या खरेदी-विक्रीसाठी आठवड्यातील विशिष्ट दिवस ठरवून द्यावेत. अशा चक्राकार पद्धतीने बाजार समित्या चालू ठेवताना लिलावाचे स्लॉट पाडून वेळा ठरवून द्यायला हव्यात.

बाजार समित्यांमध्ये परवानाधारक खरेदीदारांनाच प्रवेश देण्यात यायला हवा. असे केल्याने बाजार समित्यांमधील अनावश्यक गर्दी कमी होईल. त्यात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे सर्वांकडूनच कडक पालन बाजार समित्यांमध्ये व्हायला पाहिजेत. ज्या शेतकऱ्यांकडे धान्य, वाळवलेली मिरची, साठवणुकीचा कांदा असा बिगर नाशिवंत शेतीमाल आहे त्यांनी लॉकडाउन काळात बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी थोडे थांबायला हवे. असे सर्वांचे सहकार्य आणि समन्वयातूनच शेतीमाल बाजार व्यवस्था सुरळीत चालू राहील.


इतर संपादकीय
चंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या...महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या ...
पीकविम्यातील पापीगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून...
काम सुरळीतपणे पार पाडण्याचे धोरणराज्याच्या कोणत्याही भागात कधीही गेलो तरी तेथील...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लपवाछपवीची कमाल!पेगॅसस प्रकरण नवे नाही. नोव्हेंबर-२०१९ मध्ये हे...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
जल‘प्रलय’शेती हा पूर्वीपासूनच जोखीमयुक्त व्यवसाय आहे....
पृथ्वीवरील वातावरणाचा ढळतोय तोलसरकारकडून सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली...
युरोपच्या अग्निअस्त्रावर निसर्गाचं...गेल्या काही दिवसांत युरोपमधील पुराच्या बातम्या...
बैलांचा उठलेला बाजारमुळात शेतीच्या यांत्रिकीकरणाने शेतकऱ्यांकडील...
ग्राहक कल्याणात उत्पादकांचे मरण‘इंडिया पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशन’ आणि इंडिया...
मुदत वाढवा, सहभाग वाढेलवर्ष २०२१ च्या खरीप हंगामासाठी जुलैच्या...
स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे...आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, संगणक क्रांती, माहिती-...
अचूक नियोजन हाच निर्यातबंदीवर उपायकेंद्र सरकार नेहमीच कांद्याचे भाव वाढले, की ते...
संकट टळले, की वाढले?जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या...
ही तर ‘नादुरुस्ती’ विधेयके। शेतीमाल खरेदी करण्यात बाजार समित्यांची मक्तेदारी...
फळबाग लागवडीतील अडचणींचा डोंगर यावर्षी राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
हुकमाचे पत्ते तीनच!मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाबद्दल अनेक ...
भरवशाचा निर्यातदार हीच खरी ओळखडाळी, कांदा याबरोबरच इतरही शेतीमालाचे देशांतर्गत...
कृषी प्रक्रिया संचालनालय आव्हानात्मक...शेतीमाल प्रक्रियाक्षम आहे. म्हणजे त्याच्यावर...