agriculture news in marathi agrowon agralekh on artificial insemination | Agrowon

कृत्रिम रेतन हवे नियंत्रितच

विजय सुकळकर
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

राज्यात दर पाच पशुधनामागे केवळ एकाच जनावरास कृत्रिम रेतन तंत्राचा लाभ मिळतो. त्यातील ५० टक्के कृत्रिम रेतने ही खासगी, अप्रशिक्षित, अल्प प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घेतली जातात.
 

कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्हशींची पैदास केली जाते. कृत्रिम रेतनामुळे दूध उत्पादन वाढीबरोबर ब्रुसेलोसिस, टीबी, ट्रायकोमियासीस यांसारख्या रोगांपासून जनावरांचा बचावही केला जाऊ शकतो. त्यामुळेच तर गायी-म्हशींमध्ये किफायतशीर दुग्ध व्यवसायाकरिता कृत्रिम रेतन वरदान मानले जाते. शेळ्यांमध्येसुद्धा दीड वर्षात दोन वेत मिळण्याबरोबर सशक्त करडे जन्माला येऊन, त्यांची झपाट्याने वजनवाढ होण्यासाठी कृत्रिम रेतन केले जाते. आपल्या देशात, राज्यात मुळात कृत्रिम रेतन करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातही होत असलेल्या कृत्रिम रेतनात यशस्वी होण्याचे प्रमाण अजून कमी आहे. कृत्रिम रेतन हे पूर्णपणे तांत्रिक बाब असून, पशुपालकांनी नोंदणीकृत पशुवैद्यकाकडूनच अथवा खासगी असेल तर तो नोंदणीकृत, तसेच प्रशिक्षित आहे, याची खात्री करूनच त्यांच्याकडून करून घेणे अपेक्षित आहे.

राज्यात दर पाच पशुधनामागे केवळ एकाच जनावरास कृत्रिम रेतन तंत्राचा लाभ मिळतो. त्यातील ५० टक्के कृत्रिम रेतने ही खासगी, अप्रशिक्षित, अल्प प्रशिक्षित व्यक्तींकडून करून घेतली जातात. त्यामुळे पाच कृत्रिम रेतनांनंतर जन्मलेले एकच वासरू दिसून येते. जनावरांचा माज ओळखण्यात होणारी चूक, निकृष्ट दर्जांच्या, आयुर्मान संपलेल्या रेतमात्रांचा वापर, अयोग्य पद्धतीने रेतमात्रांची हाताळणी, रेतमात्रा अयोग्य ठिकाणी सोडणे आदी कारणांमुळे आपल्याकडे कृत्रिम रेतन अयशस्वी होते. कृत्रिम रेतन अयशस्वी झाले, तर पशुधनाचे आरोग्य धोक्यात येते. पशुपालकांनाही नियमित वेत मिळत नसल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होते. कृत्रिम रेतनातील  गैरप्रकार टाळण्यासाठी हा व्यवसाय कायद्याच्या कक्षेत आणण्याचे राज्याने ठरविले आहे. 

केंद्र सरकारने कृत्रिम रेतन व्यवसाय कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली आठ वर्षांपूर्वी सुरू केल्या होत्या. त्यासाठी कायद्याचा मसुदाही सर्व राज्यांना पाठविण्यात आला आहे. मात्र दुग्ध व्यवसायात आघाडीवरचे आपले राज्य कृत्रिम रेतनावर कायदेशीर नियंत्रण आणण्याबाबत मागेच राहिले म्हणावे लागेल. खरे तर सुमारे दहा वर्षांपूर्वी राज्याने सुयोग्य पशुपैदास धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली. या पशुपैदास धोरणाचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अनुवंश सुधारणा धोरण देशात सर्वप्रथम राज्यात सुरू करण्यात आले. परंतु, शास्त्र आणि शिस्त सहज पटू शकत नसल्यामुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने कायदेशीर तरतुदी अवलंबिण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सुधारित कायद्यानुसार नोंदणी नसलेल्या संस्थांना रेतमात्रा निर्माण करणे, अप्रशिक्षित रेतकांना पशुपैदास धोरणाची हेळसांड करणे, खासगी व्यावसायिकांकडून कृत्रिम रेतनाद्वारे पशुपालकांची फसवणूक करणे, शक्य होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम रेतनासाठी अव्वाच्या सव्वा दर लावता येणार नाहीत. कृत्रिम रेतन केल्यानंतर ते काही कारणाने फलदायी ठरले नाही, तर त्याची जबाबदारीसुद्धा संबंधित संस्था, व्यक्तीवर येऊ शकते.

पशुधन विकासाचा पाया हा पशुपैदास धोरणात रचला जातो. त्यात आता कृत्रिम रेतन कायद्याने नियंत्रित झाल्यास त्याचा फायदा राज्यातील पशुपालकांना होऊ शकतो. याकरिता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी मात्र पशु संवर्धन विभागाला करावी लागेल. कृत्रिम रेतन कायद्याच्या कक्षेत आणताना मुळातच कमी असलेले राज्यातील रेतनाचे प्रमाण अजून कमी होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागेल. नोंदणीकृत, प्रशिक्षित, शासकीय पशुवैद्यकांपर्यंत सर्वच पशुपालक पोचू शकत नाहीत. अशा वेळी अनोंदणीकृत, खासगी, अप्रशिक्षितांच्या व्यापक प्रशिक्षणांचे कार्यक्रम घेऊन त्यांना प्रशिक्षित आणि नोंदणीकृत करून घ्यावे लागेल. कृत्रिम रेतन नियंत्रित करताना याबाबत पशुपालकांमध्येसुद्धा प्रबोधन झाले पाहिजे.


इतर संपादकीय
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
गोड बोलण्यासारखी स्थिती नाही!गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’...