कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाटेवर...

शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तंत्रक्रांतीमुळे भारतीय शेतीला नवी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
संपादकीय.
संपादकीय.
केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर पंतप्रधान पीकविमा योजनेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पीक कापणी प्रयोग आणि उत्पादनाचा अंदाज काढण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरले जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तशी घोषणा केली. कृषिमंत्र्यांनी याआधीही राज्यसभेत बोलताना डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले होते. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हीच भविष्याची दिशा असेल, असे मत त्यांनी मांडले होते. देशात अनेक शेतकरी पिकांच्या लागवडीपासून ते योग्य कीटकनाशके आणि खतांची निवड करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी डिजिटल तंत्राचा वापर करत आहेत. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी देशात अनेक स्टार्ट अप कंपन्या काम करत आहेत. यापुढील काळात शेती क्षेत्रात आर्टफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. हॉँगकॉँग स्थित हिनरिच फाउंडेशन, अल्फा-बीटा अॅडव्हायजर्स आणि ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन यांनी केलेल्या अभ्यासात देशात डिजिटल उद्योगाचा विकास होण्याच्या दृष्टीने शेती क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सूतोवाच केले आहे. देशात सध्या डिजिटल व्यापाराची उलाढाल ३५ बिलियन डॉलर इतकी आहे, ती २०३० पर्यंत ५०० बिलियन डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. आणि त्या कामी आर्थिक सेवा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांखेरीज शेती क्षेत्राचा वाटा महत्त्वपूर्ण असणार आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्राने मानवी मनासारखे विश्लेषण करणे, तर्क करणे, शिकणे, परिस्थितीनुरूप वर्तन करणे, समस्या सोडविणे, निर्मिती करणे. जगभरात शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यावर विविध प्रयोग सुरू आहेत. शेतीमधील विविध कामे मजुरांऐवजी यंत्रांकडून किंवा स्वयंचलित यंत्रणेकडून कशी करून घेता येतील, यावर भर आहे. माणसांपेक्षाही वेगाने व उत्तम कामे करणारे शेतीमधील यंत्रमानव तयार करणे, ड्रोन्स व सॉफ्टवेअरचा उपयोग करून पीकसंरक्षण, आंतरमशागत, मातीचे आरोग्य सांभाळणे, पिकाच्या उत्पादन व उत्पादकतेचा अचूक अंदाज व विश्लेषण या बाबींवर काम सुरू आहे. भविष्यात ड्रोन्स आणि सेन्सर या दोन घटकांना कमालीचे महत्त्व येणार आहे. त्यातून मिळणाऱ्या अफाट माहितीच्या जोरावर शेतीचे नियोजन होणार आहे. हवामानाचे अंदाज वर्तवण्याच्या प्रणालीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे क्रांतिकारक बदल होतील, असे मानले जात आहे. तसेच शेतीमालाच्या मूल्यसाखळीतही मोठे फेरबदल होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा स्वीकार करावा की करू नये, यावर आता चवितचर्वण करण्यात काहीच अर्थ नाही. कारण ते आता आपल्यावर येऊन आदळलेले आहे. त्याला सामोरे जाण्याची व्यूहरचना कशी आखायची आणि आपल्या देशातील शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजांनुरूप त्याचा कसा वापर करून घ्यायचा याच दिशेने आता आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. शेतकऱ्यांची मोठी संख्या, तुटपुंज्या जमीनधारणेमुळे शेतीच्या तुकडीकरणाची समस्या आणि शेतकऱ्यांमधील दारिद्र्य हे भारतीय शेतीचे वास्तव आहे. भारत हा खंडप्राय विस्तार असलेला देश आहे. इथल्या शेती प्रश्नांतील गुंतागुंत जटिल आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य शेतकऱ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने तंत्रज्ञानाची अलीबाबाची गुहाच खुली होणार आहे. एकंदर शेतीवरील अरिष्टाचा सामना करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शस्त्र म्हणून उपकारक ठरू शकते. त्या दृष्टीने संकट नव्हे तर संधी म्हणून त्याकडे पाहायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com