नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
संपादकीय
‘बर्ड फ्लू’चा बागुलबुवा नको
बर्ड फ्लूबाबत अफवा नाही, तर तांत्रिक माहितीसह केंद्र-राज्य शासनाने वेळोवेळी काढलेले सल्ले-मार्गदर्शक सूचना यांचा प्रसार सर्वांपर्यंत झाला पाहिजे, ही काळजी घ्यायला हवी.
मागील आठ-दहा दिवसांपासून देशात बर्ड फ्लू हा रोग कावळे, बदके, स्थलांतरित पक्षी आणि देशी कोंबड्यांमध्ये हळूहळू पाय पसरत आहे. सुरुवातीला चार राज्यांत आढळून आलेला हा आजार आता महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये पोचला आहे. असे असले तरी अगदी सुरुवातीपासूनच सर्वसामान्य कोंबडीपालक शेतकऱ्यांपासून ते राज्य-केंद्र शासन आणि प्रशासनापर्यंत सर्वच जागरूक असल्याने बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोल्ट्री शेडच्या स्वच्छतेपासून ते अचानक मरतुक झालेल्या पक्ष्यांच्या तत्काळ तपासणीपर्यंत शेतकरी आणि पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यापासून ते अंडी-चिकन खाणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने सल्ला जाहीर केला आहे. प्रादुर्भावग्रस्त राज्यांतून पक्षी येणार नाहीत, याची काळजी इतर राज्ये घेत आहेत. दिल्ली शहरात तर चिकन आणि पक्ष्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.
बर्ड फ्लू हा आजार कोंबडीपालक शेतकरी-उद्योजक, मांसाहार करणारे ग्राहक, तसेच पशुसंवर्धन विभागाला काही नवीन नाही. २००६ मध्ये गुजरातसह महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. त्यानंतरही या रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनेक घटना देशात घडल्या. त्यामुळे या रोगाशी संबंधित सर्वच जण त्यास आवर घालण्यापासून ते चिकन, अंड्यांचा खाद्यात वापराबाबतच्या दक्षतेपर्यंत चांगलेच जाणून आहेत. असे असताना देखील सोशल मीडियावर बर्ड फ्लूबाबत अफवा पसरविण्याचे काम चालू आहे. त्याचा फटका कोंबडीपालकांसह ग्राहकांनाही बसत आहे, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.
आधी चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशा अफवेने पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरपासून हा व्यवसाय सावरत होता. मागील दीड-दोन महिन्यांपासून अंडी-चिकनला मागणी वाढून बऱ्यापैकी दर मिळत होते. त्यात आता बर्ड फ्लूने डोके वर काढल्याने कोंबडी तसेच अंड्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. राज्यात महिनाभरात पोल्ट्री उद्योगाला दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता यातील जाणकारांकडून वर्तविली जात आहे. कोंबड्याच्या खाद्यात मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या सोयाबीन-मक्याचे दर कोसळून या शेतीमाल उत्पादकांचेही नुकसान होऊ शकते. या सर्व पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूबाबत अफवा नाही, तर तांत्रिक माहितीसह केंद्र-राज्य शासनाने वेळोवेळी काढलेले सल्ले-मार्गदर्शक सूचना यांचा प्रसार सर्वांपर्यंत झाला पाहिजे, ही काळजी घ्यायला हवी.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रॉयलर कोंबडीपालन सर्वत्र अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केले जाते. कोंबड्याचा आहार-आजारात विशिष्ट काळजी घेतली जाते. महत्त्वाचे म्हणजे बर्ड फ्लूचा मानवी संसर्गाचा शास्त्रीय पुरावा अद्याप कोठेही आढळलेला नाही. त्याही पुढील बाब म्हणजे मांस चांगले शिजवून खाल्ले (७० अंश तापमान) तर त्यात कोणताही विषाणू जिवंत राहत नाही. अशावेळी मांसाहार करणाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता योग्य ती खबरदारी घेत तो चालू ठेवायला हवा. पोल्ट्री व्यवसायात सुरवातीची गुंतवणूक तसेच व्यवस्थापन खर्च अधिक असतो. त्यात मागील वर्षभरापासून काही ना काही कारणांनी हा व्यवसाय तोट्यातच आहे. अशावेळी २००६ च्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर या वर्षी देखील केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासन मदत करेल, असे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले आहे. ही मदत तत्काळ कोंबडीपालकांपर्यंत पोहोचवून त्यांना दिलासा देण्याचे काम राज्य शासनाने करायला हवे.
- 1 of 80
- ››