agriculture news in marathi agrowon agralekh on bogus insecticides sale in country | Agrowon

जीवघेणा बाजार

विजय सुकळकर
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

बियाणे, खते, कीडनाशके या निविष्ठा उत्तम दर्जाच्याच मिळाव्यात, अशी देशभरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, नेमके याच्या उलट घडताना दिसते. बोगस निविष्ठांचा सुळसुळाट देशभर झाला असून, त्याचे अतिगंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.
 

देशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तीन वर्षांपूवी देशात तीन हजार २०० कोटी रुपयांची कीडनाशके बोगस असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सर्व स्तरांवरील नियंत्रणातून यावर आळा बसणे गरजेचे होते. परंतु, तसे काही झाले नाही. उलट २०१७ च्या खरीप हंगामात राज्यात बोगस कीडनाशकांनी ५० शेतकरी शेतमजुरांचा बळी घेतला. खरे तर या घटनेनंतर बोगस कीडनाशके बाजारातून हद्दपार करण्याबाबतच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या. आता तरी अनधिकृत कीडनाशकांची निर्मिती, विक्री आणि वापरावर नियंत्रण येईल, असे वाटत होते. परंतु, त्यानंतरच्या हंगामातही (खरीप २०१८) राज्यात बनावट कीडनाशकांमुळे चार शेतकरी शेतमजुरांना प्राण गमवावा लागला, तर अनेकांना विषबाधेमुळे कायमचे अपंगत्व आले. हे सत्र मागील म्हणजे २०१९ च्या खरीप हंगामातही सुरूच होते. आता तर बोगस, बनावट कीडनाशकांचा देशातील बाजार चार हजार कोटींच्या पुढे गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बियाणे, रासायनिक खते यानंतर उत्पादन वाढीसाठीची तिसरी महत्त्वाची निविष्ठा म्हणजे कीडनाशके. त्यामुळे या निविष्ठा उत्तम दर्जाच्याच मिळाव्यात, अशी देशभरातील शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, नेमके याच्या उलट घडताना दिसते. देशभर बोगस निविष्ठांचा सुळसुळाट झाला असून, त्याचे अतिगंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. बोगस कीडनाशकांमुळे अपेक्षित परिणाम (उत्पादनवाढ) मिळत नसल्याने त्यावरील खर्च वाया जातो. निर्यातक्षम शेतीमालास कीडनाशकांच्या अवशेषांची समस्या निर्माण होते. माती-पाणी-पर्यावरण प्रदूषण वाढते. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी-शेतमजुरांच्या थेट आरोग्याशीच हा खेळ खेळला जात आहे.

देशात कीडनाशकांवर नियंत्रणासाठी ‘कीडनाशके कायदा-१९६८’ आहे. परंतु, हा कायदा खूप जुना झाला असून, त्यात कालसुसंगत असे बदल करण्यात आलेले नाहीत. आत्ताही यात सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकाचा मसुदा गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकार दरबारी पडून असल्याची कबुली भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालकच देतात. यावरून कीडनाशकांच्या दर्जाबाबत केंद्र सरकार किती गंभीर आहे, हे आपल्याला कळलेच असेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कीडनाशकांच्या सनियंत्रणाबाबत देशात ज्या संस्था आहेत, त्यांच्याकडे बोगस कीडनाशकांचा शोध घेऊन तपासणीअंती कारवाईचे अधिकार नाहीत. अशा प्रकारचे अधिकार राज्य शासनाच्या कृषी विभागाला (गुणवत्ता नियंत्रण) देण्यात आले आहेत. त्यामुळे बनावट कीडनाशके निर्माण करणाऱ्या कंपन्या, त्यांचे विक्रेते आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने हा जीवघेणा बाजार देशात राजरोषपणे सुरू आहे. देशातील बोगस कीडनाशकांच्या बाजारावर नियंत्रणाची जबाबदारी केवळ राज्य शासनांवर टाकून चालणार नाही. याकरिता केंद्र तसेच राज्य शासन अशा दोन्ही पातळ्यांवर सक्षम, कायदेशीर नियंत्रण यंत्रणा उभी करावी लागेल.

कीडनाशकांचे नियंत्रण केवळ कठोर कायद्याच्या नियंत्रणातच आणून भागणार नाही. त्याची देशभर प्रभावी अंमलबजावणी होईल, हेही पाहावे लागेल. देशभरातील कृषी सेवा केंद्रांनी कीडनाशकांच्या विक्रीत आपल्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कीडनाशकांच्या खरेदीपासून ते वापरापर्यंत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधनाची गरज आहे. आपण खरेदी करीत असलेली कीडनाशके नोंदणीकृत आहेत, त्यास लेबल क्लेम आहे, त्यांची शिफारस संशोधन संस्था अथवा कृषी विद्यापीठांनी केलेली आहे, त्यातील महत्त्वाचे घटक, या सर्वांची खातरजमा करूनच खरेदी करायला हवेत. अशा सर्व स्तरांवरील प्रयत्नांतूनच बोगस कीडनाशकांचा जीवघेणा बाजार संपुष्टात येईल.



इतर संपादकीय
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
गोड बोलण्यासारखी स्थिती नाही!गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’...
ना रहेगा बास...दोन वर्षांपूर्वी (२०१७ मध्ये) भारतात कीडनाशकांचा...
बदलती जीवनशैली अन् वाढते आजारजगात एकच गोष्ट शाश्वत आहे अन् तो म्हणजे बदल. हा...
खाद्यतेल स्वयंपूर्णतेची दिशादेशाची वार्षिक खाद्यतेलाची गरज २३.५ दशलक्ष टन आहे...
निसर्गाचा सहवास अन् गोमातेचा आशीर्वादमागील आठवड्यात उत्तर केरळमधील ‘पेय्यानूर’ या...