agriculture news in marathi agrowon agralekh on cattle feed rates | Agrowon

पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रण

विजय सुकळकर
बुधवार, 11 डिसेंबर 2019

पशुखाद्यनिर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांना कच्चा माल कधी, किती लागतो, त्यानुसार त्यांचा पुरवठा झाला पाहिजे. हे करीत असताना पशुखाद्यनिर्मिती कंपन्यांकडून गुणवत्तापूर्ण पशुखाद्य योग्य दरात आणि पुरेशा प्रमाणात पशुपालकांना मिळायला हवे.
 

महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आहे. २०१२ च्या महाभयंकर दुष्काळात चारा-पाण्याची तीव्र टंचाई होती. त्यात अनेक पशुपालकांना जनावरे सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी आपले गोठे खाली केले होते. त्यानंतरही दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती एकापाठोपाठ एक कोसळतच आहेत. त्यामुळे ओल्या-सुक्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नासधूस होऊन त्यांची तीव्र टंचाई जाणवत आहे. ओल्या-सुक्या चाऱ्याबरोबरच पशुखाद्यासाठी लागणाऱ्या घटकांचीदेखील टंचाई भासत असून, त्यांचे दरही सातत्याने वाढत आहेत. पशुखाद्य तयार करण्यासाठी तांदूळ चुनी, मका, गहू, बाजरी यांचे पीठ अथवा कोंडा लागतो. या अन्नधान्य पिकांचा पेरा कमी झाला आहे. मका हा पशुखाद्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यावरील अमेरिकन लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावाने या पिकांचेही क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे या शेतीमालाचे एकतर उत्पादन घटत आहे. त्यातच दलाल साठेबाजी अन् कृत्रिम टंचाई करून त्याची विक्री चढ्या दराने करताहेत.

राज्यात दुधाळ जनावरांच्या पशुखाद्यात विविध प्रकारच्या तेलपेंडींचा समावेश होतो. पशुखाद्यात तेलपेंडीचे प्रमाण ३० ते ४० टक्के असते. मागील वर्षभरात सगळ्याच प्रकारच्या तेलपेंडीचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. चाऱ्यासह सर्वच प्रकारच्या पशुखाद्याचे दर वाढलेले असताना दुधाच्या दरात मात्र वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे दुधाळ जनावरांना पेंड देणे पशुपालकांना परवडत नसल्याने त्यांच्या मागणीत ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. अर्थात जनावरांना योग्य वयात संतुलित आहार मिळत नसल्याने शारीरिक वाढ खुंटण्यापासून दुग्धोत्पादनात घट अशा अनेक समस्यांना पशुपालकांना सामोरे जावे लागत आहे. 

राज्यात शेतीपूरक म्हणून दुग्धोत्पादन व्यवसाय केला जातो. अनेक शेतकऱ्यांनी तर दुग्ध व्यवसायाला मुख्य व्यवसायाचे स्वरूप देऊन त्यात बरीच आर्थिक गुंतवणूकदेखील केली आहे. परंतु, शेतीबरोबरच हा व्यवसायही तोट्यात जात असल्याने शेतकऱ्यांना कुठला आधारच दिसत नाही. त्यामुळेच दुग्ध व्यवसायाचा गाडा रुळावर आणण्यासाठी पशुपालकांसह शासनानेसुद्धा पुढे यायला पाहिजे. जनावरांच्या संतुलित आहारामध्ये उत्तम दर्जाचे पुरेशा प्रमाणात पशुखाद्य, हिरवा-वाळलेला चारा, खनिज मिश्रणे, जीवनसत्त्वे आणि शुद्ध पाणी यांचा समावेश असायला हवा. आपल्या जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरव्या-वाळलेल्या चाऱ्याचे पशुपालकांचे नियोजन असतेच. परंतु, नैसर्गिक आपत्तींमुळे त्यात बाधा येत आहे. परंतु, शासन पातळीवर याबाबतचे काहीही नियोजन दिसत नाही. खरे तर हंगाम आणि विभागनिहाय ओला-वाळलेल्या चाऱ्याची गरज किती? आणि तो कुठून कसा पुरवायचा याचे नियोजन शासन पातळीवर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी लगेच सुरू करायला हवी.

पशुखाद्यनिर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांना कच्चा माल कधी, किती लागतो, त्यानुसार त्यांचा पुरवठा व्हायला पाहिजे. हे करीत असताना पशुखाद्यनिर्मिती कंपन्यांकडून गुणवत्तापूर्ण, भेसळमुक्त पशुखाद्य योग्य दरात आणि पुरेशा प्रमाणात पशुपालकांना मिळण्याबाबतही शासनाचे नियंत्रण हवे. पशुखाद्यासाठीचे घटक आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतील, तर प्रसंगी त्यांची आयात करून तसेच सोयापेंडसारख्या काही तेलपेंडींचे निर्यात अनुदान रद्द करण्याबाबतही निर्णय झाले पाहिजेत. अर्थात यामुळे पशुखाद्याचे दर नियंत्रणात राहून हा निर्णय दुग्ध व्यवसाय, कोंबडीपालन करणाऱ्यांच्या दृष्टीने हिताचा असेल. खरे तर पशुखाद्यनिर्मिती, गुणवत्ता, साठवणूक, पुरवठा आणि दर यावर नियंत्रणासाठी पंजाब सरकारने नवीन धोरण आणलेले आहे. असे धोरण महाराष्ट्रासारख्या पशुपालन, दुग्ध व्यवसायात आघाडीवरच्या राज्यात का नाही? हा खरा प्रश्न आहे.    


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...