कात टाकून कामाला लागा

‘एनआरसीसी’ने संत्रा उत्पादकांना अधिक उत्पादनक्षम, कीड-रोगांना प्रतिकारक, टिकवणक्षमता अधिक असलेले वाण उपलब्ध करून द्यायला हवे.
agrowon editorial
agrowon editorial

नागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने गेल्या ३५ वर्षांत संत्रा, मोसंबी उत्पादकांसाठी फारसे काही काम केले नाही. त्यामुळे परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी या संस्थेच्या अपयशाला जबाबदार संबंधितांवर कारवाईची मागणी केंद्रीय समितीकडे केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देखील संत्र्याबरोबर इतर लिंबूवर्गीय फळपिकांबाबत फारसे काही काम केले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लिंबूवर्गीय फळपिकांबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्राची (एनआरसीसी) स्थापना मार्च १९८६ ला झाली. संत्रा परिसरात कोळशी रोगाच्या उद्रेकानंतर झालेले व्यापक सर्वेक्षण आणि शेतकरी-शास्त्रज्ञांच्या अनेक शिफारशींतून हे केंद्र उभे राहिले आहे.  या केंद्राची स्थापना होऊन ३५ वर्षे उलटले आहेत. सुरुवातीची पाच वर्षे या केंद्राच्या पायाभूत विकासासाठी लागली असली तरी मागील ३० वर्षांत नव संशोधन, प्रगत तंत्रज्ञान यातून संत्रा उत्पादकांच्या समस्या सोडविण्यात या केंद्राला अपयश आले आहे. ‘नागपुरी संत्रा’ हे राजे रघुजी भोसले यांनी या भागात आणलेले वाण सोडले, तर शेतकऱ्यांना संत्र्याचे दुसरे वाण आजतागायत उपलब्ध होऊ शकले नाही. आकर्षक रंग आणि अवीट गोडीचे हे वाण चांगले आहे. परंतु नागपुरी संत्र्यावर मूळकूज आणि डिंक्या या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. संत्रा उत्पादकांना या रोगांवर प्रभावी उपाय मिळालेला नाही. नागपुरी संत्र्याची साल मऊ असून, त्यात बियांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याची टिकाऊक्षमता कमी आहे. प्रक्रियेसाठीसुद्धा हा वाण चांगला समजला जात नाही. 

संत्रा फळपिकाला दर्जेदार, रोग-कीड प्रतिकारक खुंट आजही मिळत नाही. भेसळयुक्त खुंटावर कलमीकरणातून उभ्या असलेल्या बागा रोग-किडींना बळी पडतात. त्यावर प्रभावी उपाय नाही. अनेक वेळा प्रादुर्भावग्रस्त बागाच काढून टाकायची वेळ शेतकऱ्यांवर येते. संत्रा या पिकाला १९९० पासून हादरे बसायला सुरुवात झाली. १९९० ते २००० हे दशक ‘कोळसी’ रोगाने गाजविले. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या बागा कमजोर झाल्या. त्यानंतर २००५ दरम्यान काटोल, नरखेड, वरुड परिसरात पाणीटंचाईने संत्रा बागा वाळल्या. त्यातून संत्रा उत्पादक सावरतो न सावरतो तोच २००५ ते २०१० ही पाच-सहा वर्षे फायटोप्थोरा, डिंक्या या रोगांमुळे वाळलेल्या बागा अनेक शेतकऱ्यांना काढून टाकाव्या लागल्या. आता मागील चार-पाच वर्षांपासून पूर्वीच्या या समस्यांबरोबर फळगळीने संत्रा उत्पादकांना ग्रासले आहे. बदलत्या हवामान काळात लिंबूवर्गीय फळपिकांच्या बहर व्यवस्थापनात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी येत आहेत. मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भाबरोबर मराठवाड्यात विस्तारले असताना या फळपिकाची दैनाही संत्रासारखीच आहे.

एनआरसीसीने संत्रा उत्पादकांना अधिक उत्पादन देणारे, कीड-रोग प्रतिकारक, टिकवणक्षमता अधिक असलेले, बिनबियांचे किंवा बियांचे प्रमाण अत्यंत कमी असलेले वाण उपलब्ध करून द्यायला हवे. आजही संत्रा-मोसंबीच्या बागा पारंपरिक पद्धतीनेच उभ्या राहत असताना त्यांना प्रगत तंत्रज्ञान कधी मिळणार? मुळात संत्र्यासह इतरही लिंबूवर्गीय फळपिकांवर ‘एनआरसीसी’त संशोधन कमीच होते. त्यात त्यांचे संशोधन, नवीन शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. नवसंशोधन संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केले म्हणजे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, असे होत नसते. कृषी विभागाच्या मदतीने ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे लागते. कृषी विद्यापीठाबरोबर एनआरसीसीचा संशोधनाच्या बाबतीत समन्वय दिसून येत नाही. या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून एनआरसीसीला कात टाकून कामाला लागावे लागेल, संशोधनासह नवतंत्रज्ञान विस्ताराची दिशा नव्याने ठरवावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com