`सक्ती’चे होईल स्वागत

जमिनीत सेंद्रीय कर्ब कमी झाल्यामुळे जीवाणूंची संख्या कमी होतेय. अशावेळी पीकनिहाय जीवाणू खते वापरणे सध्या गरजेचेच झाले आहे. त्यामुळे सांगून नाही तर सक्तीने जीवाणू खतांचा वापर आता वाढवायलाच पाहिजे.
agrowon editorial
agrowon editorial

युरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते घेण्याचे बंधन टाकणाऱ्या निर्णयावर केंद्र सरकार पातळीवर विचार सुरु आहे. रासायनिक खतांच्या बाबतीत यापूर्वी घेतलेले निर्णय जसे की निमकोटेड युरिया, पॉश मशीनद्वारे खत विक्री आणि अनुदानासाठी डीबीटी प्रणाली हे अत्यंत चांगले आहेत. या निर्णयांमुळे खतांमधील भेसळ आणि भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. पिकांसाठी खतांचा वापर करायचा म्हटले तर आजही बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचाच विचार करतात. एकूण रासायनिक खतांच्या वापरात एकट्या युरियाचा वापर ६० टक्के आहे. देशात खत वापराचे शास्त्रीय प्रमाण कडधान्यांमध्ये १ः२ः१ तर तृणधान्यांसह इतर पिकांमध्ये २ः१ः१ नत्र, स्फूरद, पालाश असे अपेक्षित असताना सध्याचे प्रमाण हे ४ः२ः१ इतके असंतुलित आहे.

पीकवाढीबरोबर आकर्षक रंग येण्यासाठी युरिया हे खत गरजेचे असले तरी त्याच्या अतिवापराचे तोटेही आहेत. युरियाच्या अतिवापराने पिकांची कायिक वाढ अधिक होऊन फुले, कळ्या कमी लागतात, उत्पादन घटते, रसशोषक किडींचा प्रादुर्भावही वाढतो. जास्तीचे नत्र निचरा होऊन पाणीसाठे प्रदुषित होत आहेत. मातीचे आरोग्यही बिघडत आहे. अशावेळी नत्रासह इतरही स्फूरद, पालाश, गंधक, सिलिकॉन आदी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करुन देणारे जीवाणू खतांचे पर्याय उपलब्ध आहेत. अशा जीवाणू खतांच्या वापराबाबत मागील दोन दशकांपासून प्रबोधन केले जातेय. परंतू त्यांचा अपेक्षित प्रमाणात वापर शेतकऱ्यांकडून होत नसताना याबाबत सक्ती केली गेली तर ते स्वागतार्हच म्हणावे लागेल. 

अझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी आदी जैविक खते हे निसर्गात सापडणाऱ्या जीवाणूंपासून तयार केली जातात. बहुतांश जीवाणू खते ही कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, राष्‍ट्रीय-राज्य स्तरावरील कृषी संशोधन केंद्रे यांच्या माध्यमातून विकसित करून वितरीत केली जातात. जैविक खते हे स्वस्त तसेच पर्यावरणपूरक आहेत. पूर्वी भुकटी (पावडर) स्वरुपात मिळणारी जैविक खते आता पाण्यात विद्राव्ये स्वरुपात मिळत आहेत. त्यामुळे ही खते वापरास सोपी झाली आहेत. जैविक खते बीजप्रक्रिया, ठिबक तसेच आळवणीद्वारे देता येतात. दुधापासून दही करण्यासाठी गृहिणी त्यात विरजण (कल्चर) वापरतात. हे विरजण दुसरे तिसरे काही नसून जीवाणूच (बॅक्टेरीया) असतात. अशाच प्रकारे विरजणाचे काम जमिनीत जीवाणू खते करीत असतात. रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडत आहे. त्यातच सेंद्रीय खतांचा वापरही कमी झाला आहे. जमिनीत सेंद्रीय कर्ब कमी झाल्यामुळे जीवाणूंची संख्या कमी होतेय. अशावेळी पीकनिहाय जीवाणू खते वापरणे सध्या गरजेचेच झाले आहे. त्यामुळे सांगून नाही तर सक्तीने जीवाणू खतांचा वापर आता वाढवायलाच पाहिजे.

देशात युरियासोबत जैविक खते सक्तीचे करताना ते उत्तम गुणवत्तेची आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. जैविक खते सक्तीची केल्यावर त्यांचा वापर वाढणार म्हणून उठसूठ कोणीही, कशाही प्रकारे त्यांची निर्मिती, विक्री करुन स्वःतचा खिसा गरम करणार नाही, हेही पाहावे लागेल. सध्या फारसे कोणी वापरत नसल्याने जैविक खते स्वस्त आहेत. परंतू वापर वाढायला लागला म्हणजे ती महागणार नाहीत, ही काळजीही घ्यावी लागेल. जैविक खते निर्मिती, विक्री आणि वापर करणारे अर्थात उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकरी या तिघांनाही त्यांच्या कार्यानुसार प्रशिक्षण द्यायला हवे. असे झाले तरच निर्मिती आणि विक्रीत गुणवत्ता राखली जाईल तसेच शेतकऱ्यांकडून योग्य वेळी, योग्य प्रमाणात वापर होऊन पिकांचे उत्पादन वाढण्यास हातभार लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com