ऋतुचक्र बदल

मागील काही वर्षांपासूनचे ऋतुचक्र बदल आणि या वर्षीच्या वैशिष्ट्यपूर्ण मॉन्सूनकडून हवामान; तसेच कृषी शास्त्रज्ञांना बरेच काही शिकण्याची, त्यावर संशोधन करण्याची संधी आहे.
संपादकीय.
संपादकीय.

या वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. मॉन्सूनच्या आगमनापासूनच सुरू झालेले वेगळेपण तो माघारी फिरत असताना चालूच आहे. या वर्षी जून ते सप्टेंबरच्या काळात देशभरासह महाराष्ट्रातसुद्धा जवळपास २५ वर्षांनंतर दमदार पाऊस पडला. यादरम्यान राज्याने पावसाचे मोठे खंड, अतिवृष्टी, ढगफुटी अशी मॉन्सूनची विविध रूपे देखील अनुभवली आहेत. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सर्वसामान्यपणे सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होतो. या वर्षी देशात अडखळत दाखल झालेल्या मॉन्सूनने आत्तापर्यंतचा सर्वांत उशिराने म्हणजे ९ ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू केला आहे. हेदेखील या वर्षीच्या मॉन्सूनचे आणखी एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

मॉन्सूनने राज्यातून माघार घेतली असतानाच पावसास पोषक हवामान तयार होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसासह राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतादेखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या उघडिपीनंतर राज्यभर उन्हाचा चटकाही (ऑक्टोबर हीट) चांगलाच वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत तापमानाचा पारा ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. आपल्याकडे मार्च ते मे महिन्यांत उन्हाळा, जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा; तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी हिवाळा असे तीन ऋतू आहेत. वर्षभरात ऑक्टोबर महिना हा संक्रमणाचा मानला जातो. शेतीच्या दृष्टीनेही हा संक्रमणाचाच काळ असतो. याकाळात खरीप हंगामातील पिकांची काढणी; तसेच रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीच्या नियोजनात शेतकरी व्यग्र असतो. मॉन्सून महाराष्ट्रात रेंगाळला तर ऑक्टोबरचे हवामान आल्हाददायक असते; पण मॉन्सून लवकर परतला तर ऑक्टोबरमध्ये तापमान बरेच वाढते. या वर्षी ऑक्टोबर हीट आता जाणवू लागली तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात वादळी पाऊस झाल्यास तापमानात पुन्हा घट होऊ शकते. 

खरे तर सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या सुरवातीस राज्यात परतीचा पाऊस पडतोच. हा पाऊस राज्यातील सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अधिक असतो. या वेळचा पाऊस रब्बी हंगामासाठी चांगला असतो. त्यामुळेच सोलापूर परिसरात रब्बी हाच मुख्य हंगाम मानला जातो. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने राज्याकडे पाठ फिरविली होती; तर या वर्षी परतीचा पाऊस लांबला आहे. त्यातच वादळी पाऊस झाला तर काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान वाढू शकते. आधीच अतिवृष्टी, महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले; त्यात अजून भर पडू शकते. ज्वारी, बाजरी, करडई अशा काही पारंपरिक रब्बी पिकांत त्यांच्या वाढीच्या अवस्थेत वादळी अथवा अवकाळी पावसाचा प्रतिकार करण्याची क्षमता असते; परंतु अलीकडे फळे-फुले-भाजीपाला या वर्गातील अपारंपरिक पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ही पिके अवकाळी पावसास संवेदनशील असतात. पारंपरिक पिकांच्याजागी अपारंपरिक पिके जेव्हा घेतली जातात, तेव्हाच त्यांचे हवामानविषयक धोके शेतकऱ्यांना सांगून अवगत करायला पाहिजे. ते होत नसेल तर अशा पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केल्यावर त्यांचा बचाव करण्यासाठीचे उपाय त्यांना मिळायला हवेत.

महत्त्वाचे म्हणजे मागील काही वर्षांपासूनचे ऋतुचक्र बदल आणि या वर्षीच्या वैशिष्ट्यपूर्ण मॉन्सूनकडून हवामान; तसेच कृषी शास्त्रज्ञांना बरेच काही शिकण्याची, त्यावर संशोधन करण्याची संधी आहे. हवामानतज्ज्ञ दरवर्षीच्या मॉन्सूनच्या वेगळेपणावर लक्ष ठेवून असतात. त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांपासूनच्या याबाबतच्या नोंदीही आहेत; परंतु पुढे सखोल अभ्यासाच्या दृष्टीने त्यांच्याकडून फारसे प्रयत्न होत नाहीत. कृषी शास्त्रज्ञांचेही तसेच आहे. या वर्षी बदलत्या ऋतुचक्रानुसार पिकांच्या हंगामात काही बदल करता येतील का, असा केवळ प्रश्न उपस्थित केला गेलाय. यास सुरवात होऊन शेतकऱ्यांना तशा शिफारशी मिळाल्या तोच सुदिन म्हणावा लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com