बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थ

चीनने त्यांच्या दुय्यम दर्जाच्या उत्पादनांना केवळ बाजार म्हणून भारताचा उपयोग केला आहे. तर अमेरिका येथील शेती उद्योग-व्यापारात गुंतवणूक करताना पायाभूत सुविधांचा देखील विचार करतोय.
agrowon editorial
agrowon editorial

शेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या असून या क्षेत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यास हीच चांगली वेळ आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुंतवणूकदारांना केले होते. असे असले तरी अमेरिकेच्या उद्योग समुहाने भारतातील गुंतवणुकीसाठी विक्री साखळीत सुधारणांसह कर प्रणालीत बदलाचा अजेंडा आपल्या देशासमोर ठेवला आहे. शेतमालाची पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी काही उपक्रम, प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात निधीही खर्च होतोय. परंतू त्याचे अपेक्षित परिणाम काही दिसत नाहीत. कोरोना लॉकडाउनने तर देशातील शेतमाल पुरवठा साखळीचे वास्तवच उजागर केले आहे. त्याचप्रमाणे देशात मागील अनेक वर्षांपासून‘ई-नाम’चा नुसता गाजावाजा केला जातोय. काही मोजकी शहरे आणि तेथेही अत्यंत मर्यादित स्वरुपातील शेतमालाचे ऑनलाइन मार्केटिंग सोडता इतरत्र ही योजना ठप्पच आहे. त्यामुळे अमेरिकेने शेतमाल साठवणूक आणि विक्री साखळी संदर्भात सुचविलेल्या उपायांकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहावे लागेल.

चीन-अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्ध आणि आता भारत-चीनचे बिघडलेले संबंध यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा बदल होताना दिसतो. याचे कारण म्हणजे हे तिन्ही देश शेतमालासह इतरही कंपनी उत्पादनांत आघाडीवरचे देश आणि मोठ्या बाजारपेठा असल्याने त्यांचे एकमेकांवरचे व्यापार अवलंबित्व अधिक आहे. चीन-अमेरिका व्यापार युद्धात आपल्याला चीनशी व्यापार वाढविण्यात मोठी संधी असल्याचे तर्क बांधले गेले होते. परंतू लवकरच चीनशी आपले संबंध बिघडल्याने आपण अमेरिका, युरोपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय. अमेरिकाही व्यापारवृद्धीच्या दृष्टीने चीनपेक्षा अधिक विश्वासार्ह देश म्हणून भारताकडे पाहू लागला आहे.

दुसरा मुलभूत फरक म्हणजे चीनने त्यांच्या दुय्यम दर्जाच्या उत्पादनांना केवळ बाजार म्हणून भारताचा उपयोग केला आहे. तर अमेरिका येथील शेती उद्योग-व्यापारात गुंतवणूक करताना पायाभूत सुविधांचा देखील विचार करतोय. देशात शेतमाल विक्रीच्या पायाभूत सुविधा विकसित झाल्या तर त्याचा फायदा विदेशी गुंतवणुकदारांबरोबर आपल्या येथील शेतकऱ्यांपासून ते यासंबंधित सर्वच घटकांना होणार आहेत. देशात युरोप, अमेरिका या देशांची गुंतवणूक वाढली तर त्यांच्या कच्च्या-पक्क्या मालाच्या गुणवत्तेची खात्री मिळू शकते. अशी खात्री चीनकडून आपल्याला कधीच मिळाली नाही. 

कृषी उद्योगाच्या बाबतीत कीडनाशके, विद्राव्ये खते, कृषी यंत्रे, अवजारे, फवारणी यंत्रे यासाठीचा कच्चा माल अथवा थेट उत्पादने आपण चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात करतो. आता चीनशी आपले संबंध बिघडलेले असताना यासाठीचे पर्यायी देश आपल्याला शोधावे लागणार आहेत. दुसरीकडे बियाण्यातील (जनुकीय) प्रगत तंत्र, अत्याधुनिक-स्वयंचलित सिंचनप्रणाली, अद्ययावत कृषी हवामान शास्त्र आणि यंत्रणा, कृत्रिम बुद्धीमत्ता यांत अमेरिका, युरोपीयन देश आघाडीवर आहेत. अमेरिकेची गुंतवणूक आपल्या देशात वाढली तर यातील संशोधन, प्रगत तंत्राचा लाभ आपल्यालाही मिळू शकतो. जे चीनकडून आपल्याला कधीही शक्य झाले नाही. 

अर्थात अमेरिका, युरोपमधील गुंतवणूकदार आपल्या देशात काही ‘चॅरिटी’ म्हणून गुंतवणूक करणार नाहीत, ते त्यांचाही फायदा पाहणारच आहेत. परंतू त्याचे प्रतिकूल परिणाम आपल्या येथील शेतमाल उत्पादक आणि उद्योजकांवर होणार नाहीत, एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com