agriculture news in marathi agrowon agralekh on cheating of farmers by businessmen | Agrowon

फसवणूक थांबणार कधी?

विजय सुकळकर
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

शिवार सौद्यांच्या व्यवहारात शेतकऱ्यांनी घाई-गडबड करू नये. व्यापाऱ्यांची अधिकृत सर्व माहिती मिळाल्यानंतरच त्यांच्याशी सौदा करावा. महत्त्वाचे म्हणजे शिवार सौद्यातील व्यवहार रोखीनेच करावेत.

नाशिक जिल्ह्यात दोन व्यापाऱ्यांनी ४० टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फसविले असल्याचे नुकतेच पुढे आले आहे. या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ३५ लाख रुपयांनी गंडविले आहे. खरे तर द्राक्ष, डाळिंब, संत्रा, कांदा, टोमॅटो, कापूस, सोयाबीन आदी शेतीमालाच्या खरेदीत दरवर्षीच व्यापारी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पळून जातात. एका हंगामात एकाच विभागात अनेक वेळा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फसविले जाते. असे मागील अनेक वर्षांपासून सुरू असताना, हे प्रकार थांबणार कधी? हा खरा प्रश्न आहे.

निविष्ठांतील भेसळ, बनावटगिरी, त्यांचे वाढलेले दर, मजूरटंचाई आणि मजुरीचेही प्रचंड वाढलेले दर, यामुळे शेतीमाल उत्पादन घेणे हे काम खूपच कष्टदायक आणि खर्चीक झाले आहे. त्यातच नैसर्गिक आपत्तींच्या वाढत्या कहराने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. एवढ्या दिव्यातून थोडाबहुत शेतीमाल हाती लागला, तर तो विकून चार पैसे पदरी पडतील, या आशेवर शेतकरी असताना त्यांना नफेखोर व्यापारी राजरोसपणे लुटत असून, यंत्रणा काहीही करू शकत नाही, हे शेतकऱ्यांचे केवढे दुर्दैव! बहुतांश शेतकरी फसवणुकीच्या प्रकारात पोलिसात तक्रार दाखल करतात. तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनाच पुरावे मागितले जातात. परंतु, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत असे व्यापारी खोटे नाव, बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करीत असल्याने त्यांचा काही थांगपत्ता लागत नाही. 

आपल्या राज्यात बहुतांश फळे, तसेच टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकांचे शिवारसौदेच होतात. तर कापसासह मूग, उडीद, तूर, सोयाबीन आदी शेतीमालाचा न परवडणारा वाहतूक खर्च तसेच शासकीय खरेदी केंद्रे, बाजार समित्या यामध्ये योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी घरूनच व्यापाऱ्यांना विकणे पसंत करतात. पूर्वी अशा प्रकारच्या व्यवहारात विश्वासार्ह व्यापारी होते. मात्र, यातील नफा पाहता अनेक क्षेत्रातील व्यावसायिक यात घुसले आहेत.

सुरुवातीला हे व्यापारी उत्पादक शेतकऱ्यांना थोड्याफार शेतीमालाचे रोख पैसे देऊन त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर मात्र उधारीत, पुढच्या तारखेचे धनादेश याद्वारे व्यवहार करू लागतात. शेतकऱ्यांकडून रोख पैशांचा आग्रह होतो. मात्र नफेखोर व्यापारी नवनवीन क्लृप्त्या लढवून शेवटी शेतकऱ्यांची फसवणूक करतातच. हे व्यापारी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना लुटणारे चोर आहेत. अशा व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईचे शासनाचे धोरण पाहिजे.

शिवार सौद्यांच्या व्यवहारात शेतकऱ्यांनी घाई-गडबड करू नये. व्यापाऱ्यांची अधिकृत सर्व माहिती मिळाल्यानंतरच त्यांच्याशी सौदा करावा. महत्त्वाचे म्हणजे शिवार सौद्यातील व्यवहार रोखीनेच करावेत. व्यापारी जेवढा शेतमाल घेऊन गेला, त्याचे पूर्ण पैसे रोखीत घ्यावेत. डिजिटल पेमेंट असेल तर रक्कम ऑनलाइन खात्यात जमा झाली आहे, याची खात्री करून घ्यावी. विविध शेतीमाल उत्पादक संघांमार्फत शिवार सौद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या खबरदारीची जाणीवजागृती निर्माण केली पाहिजेत.

पणनसारख्या यंत्रणेच्या माध्यमातून शिवार सौदे करणारे चांगले व्यापारी शोधून त्यांची ऑनलाइन आधार नोंदणी करावी. अशा नोंदणीकृत व्यापाऱ्यांनाच शेतीमाल खरेदी-विक्रीचे रीतसर परवाने देण्यात यावेत. परवानाधारक व्यापाऱ्यांकडून ते करीत असलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात अमानत रक्कम पणन अथवा शेतीमाल उत्पादक संघाकडे ठेवण्यात यायला हवी. हे करीत असतानाच कृषी, पणन विभाग, स्थानिक पोलिस आणि शेतीमाल उत्पादक संघ यांच्यामार्फत परिसरातील बोगस व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकावे. अशा व्यापाऱ्यांकडून कुठलाही व्यवहार होणार नाही, हेही पाहावे लागेल. अशा सर्व स्तरावरील खबरदारीने शिवार सौद्यांतील शेतकऱ्यांची होणारी लूट, फसवणूक टाळता येऊ शकते. 


इतर अॅग्रो विशेष
बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...
बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
नीरेपासून साखरनिर्मितीचा रत्नागिरीत...रत्नागिरी ः नारळाच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या...
परवाना निलंबनातही बिनदिक्कत खतविक्रीपुणे : ‘नियमांची पायमल्ली करून विदेशातून...
शेतकरी प्रश्न सुटण्यासाठी...मुंबई : राज्यात तालुकास्तरावर उद्यापासून...
शनिवारपासून किमान तापमानात घट होण्याची...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
विमाभरपाई प्रक्रिया रिमोट सेन्सिंगशी...पुणे : पीककापणी प्रयोगाच्या आधारावर पंतप्रधान...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
अलिबागचा पांढरा कांदा ‘जीआय’च्या वाटेवरपुणे : औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या...
बेकायदा विदेशी खत आयातीचे परवाने रद्दपुणे : विद्राव्य खतांची बेकायदा आयात व विक्री...
‘सुधाकर सीडलेस’ द्राक्ष वाणाचे...नाशिक : शिवडी (ता. निफाड) येथील शेतकरी सुधाकर...