नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
संपादकीय
चळवळ चॉकीची!
रेशीम कीटकांचे सुरुवातीच्या दोन अवस्थांतील शास्त्रशुद्ध अन् किचकट संगोपन बहुतांश शेतकरी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी या व्यवसायापासून दूर राहतात.
मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भात देखील रेशीम शेतीमध्ये चॉकी सेंटर्स व्यवसायाला पसंती दिली जात आहे. मराठवाड्यात सध्या ३३ चॉकी सेंटर्स सुरू असून विदर्भातील अमरावती विभागात सहा चॉकी सेंटर्स कार्यान्वित झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाशीम, यवतमाळ सारख्या शेती क्षेत्रात मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांत चॉकी सेंटर्स उभे राहत आहेत. अर्थात चॉकी सेंटर्सच्या चळवळीला या भागातही वेग आला आहे. विदर्भातही रेशीम शेती वाढत असल्याचा हा चांगला संकेतच म्हणावा लागेल. फळे-भाजीपाल्यांच्या रोपवाटिकांमध्ये बियाण्याच्या उगवणीनंतर तसेच कलमीकरणानंतर लहान रोपांची विशेष काळजी घेतली जाते. अशा काळजीत कलमे, रोपे थोडे मोठे झाले की मग प्रत्यक्ष शेतात लागवडीसाठी शेतकऱ्यांना दिले जातात. याच संकल्पनेवर रेशीम शेतीत चॉकी सेंटर्स उभे राहत आहेत.
रेशीम शेतीत पहिल्या दोन अवस्थांतील कीटकांचे (चॉकी) आठ दिवसांपर्यंतच्या संगोपनात विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात लहान लहान रेशीम कंटकांना २६ ते २८ अंश सेल्सिअस तापमान, ८० टक्के आर्द्रता लागते. लहान कंटकांना सहन होईल असा आठ तास प्रकाश तर सोळा तास अंधार पुरवावा लागतो. त्यांना खाण्यास कोवळा सकस तुतीचा पाला द्यावा लागतो. शिवाय कीटक संगोपन गृहातील हवा खेळती ठेवावी लागते. कीटकांच्या वाढीसाठी पुरेशी जागाही उपलब्ध करून द्यावी लागते. रेशीम कीटकांचे असे शास्त्रशुद्ध अन् किचकट संगोपन बहुतांश शेतकरी करू शकत नाहीत. त्यामुळे देखील अनेक शेतकरी या व्यवसायापासून दूर राहतात. विदर्भ, मराठवाड्यात तर उष्णता फार असते. त्यातच हवामान बदलाच्या काळाच रेशीम शेतीत सक्षमतेने यशस्वी होण्यासाठी चॉकी सेंटर्सचे महत्त्व वाढले आहे. नेमक्या अशावेळी राज्यामध्ये आता काही तरुण शेतकरी विशेष प्रशिक्षण घेऊन चॉकी सेंटर्स टाकत आहेत. खरे तर राज्यातील तरुण शेतकऱ्यांना चॉकी सेंटर्सच्या माध्यमातून रोजगाराचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. तर रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट तिसऱ्या अवस्थांपासून कीटक संगोपन करणे सहज शक्य होत आहे. चॉकी कीटक पुरविणाऱ्या व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना पुढील अवस्थांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन होत आहे. त्यामुळे चॉकी कीटक घेऊन रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली नाही तर त्यांचे कोष उत्पादन देखील वाढले आहे.
शेतकऱ्यांनी एकदा चॉकी कीटक घेतले की पुढील १८ दिवसांचे (तीन अवस्थांचे) संगोपन हे सोपे काम आहे. त्यामुळे अधिकाधिक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी चॉकी कीटक आणूनच संगोपन करायला हवे. अंडीपूंज खरेदी ते चॉकी कीटक पुरविण्यापर्यंतचा व्यवसाय जलद पारदर्शी होण्यासाठी तो ऑनलाइन पद्धतीनेच करायला हवा. शेतकऱ्यांनी सुरुवातीला चॉकी सेंटर्स चालकांकडे तर चॉकी सेंटर्स चालकांनी अंडीपूंज निर्मितीवाल्यांकडे ऑनलाइन पैसे भरून नोंदणी करायला हवी. अशाप्रकारच्या डिजिटलायझेशनमुळे यातील अनुदान मिळण्याची प्रक्रिया देखील सुलभ होते. शेतकऱ्यांना वेळेत, गरजेनुसार आणि पाहिजे तेवढे चॉकी कीटक मिळून त्यांचा व्यवसाय देखील सुलभ होतो. हा व्यवसाय पूर्णपणे ऑनलाइन करण्यासाठीचे सॉफ्टवेअर औरंगाबाद येथील रेशीम कार्यालयात विकसित केले जात आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यात फारसे शेतीपूरक व्यवसाय वाढले नाहीत. या दोन्ही विभागांत रेशीम शेती विस्तारण्यासाठी चॉकी सेंटर्सची संख्या वाढविणे गरजेचे आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात तर मुळातच चॉकी सेंटर्स फार कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी पुढे येऊन चॉकी सेंटर्समध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. असे झाले तर राज्यातील रेशीम उद्योगाला वेगळी दिशा मिळेल.
- 1 of 82
- ››