हवामान बदलाशी करूया दोन हात

या देशातील वातावरणाशी अनुकूल अशी शेती क्षेत्राची घडी शेतकऱ्यांनी बसविली होती. परंतु, हवामान बदलाने ही घडीच विस्कळित करून टाकली आहे.
agrowon editorial
agrowon editorial

सूर्य उगवणारा सर्वत्र सारखा, मात्र प्रकाशाचा अर्थ नवा...

नवीन वर्षाचा नवा सूर्योदय! आता कुणी म्हणेल सूर्य तर दररोज उगवतो, त्यात काय नवीन? मात्र प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य नवी आशेची किरणे घेऊन येत असतो. सूर्याचे दररोजचे उगवणे आपल्या जीवनातील अडचणी, अंधकारमय वातावरण दूर सारून आपण स्वयंप्रकाशित होऊ शकतो, याचीच आठवण करून देत असतो. 

सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी फारच अडचणीचे गेले आहे. सध्या जगभर चर्चेत असलेल्या हवामान बदलाचे दाहक दुष्परिणाम सारे जगच अनुभवत आहे. परंतु, याच्या सर्वाधिक झळा आपल्या देशातील शेतकऱ्यांना बसत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. शेतकऱ्यांचे व्यवसाय क्षेत्र हे उघड्यावरील शेत आहे आणि हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींत हे क्षेत्रच नष्ट होत आहे. या देशातील वातावरणाशी अनुकूल अशी शेती क्षेत्राची घडी शेतकऱ्यांनी बसविली होती. परंतु, हवामान बदलाने ही घडीच विस्कळित करून टाकली आहे. त्यामुळेच हवामान बदलाच्या काळातील शेती ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ या संत तुकोबारायाच्या उक्तीप्रमाणे झालेली आहे.  हवामान बदलाबाबत जगभर चर्चा होत असली, तरी यास कारणीभूत असलेले वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी कोणीही धजावत नसल्याचे दिसते. खरे तर कार्बन उत्सर्जनात श्रीमंत, प्रगत देश आघाडीवर आहेत. वाढत्या कार्बन उत्सर्जनाने पृथ्वीचे, समुद्रातील पाण्याचे तापमान वाढत आहे. त्यातूनच सुनामी, दुष्काळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती ओढवत आहेत. या नैसर्गिक आपत्तींचा जास्त फटका मात्र कार्बन उत्सर्जनात पिछाडीवर असलेल्या देशभरातील गरीब, अविकसित देशांना बसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदूषण कमी करून हवामान बदलाचा सामना करण्यासाठीच्या पॅरिस अॅग्रिमेंटमधून माघार घेतली आहे. त्यांच्या या कृतीवर अमेरिकेबरोबर जगभरातील बहुतांश देशांनी टीका केली आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे जगाचे भविष्य धोक्यात असल्याचे स्वीडनची १६ वर्षीय युवती ग्रेटा थनबर्ग हिने दाखवून दिले आहे. प्रदूषणामुळे माझ्यासह अनेक बालकांचे बालपण तुम्ही हिरावून घेतले आहे, लोक मरताहेत, पूर्ण ‘इको सिस्टिम’ (परिसंस्था) नष्ट होत आहे. असे असताना जगभरातील देश (खासकरून प्रगत देश) विकास अन् पैशाबाबतच विचार करीत आहेत. असे करण्यास तुमची हिंमत तरी कशी होते? असे खडे बोल या युवतीने जगभरातील नेत्यांना सुनावले आहेत. जगभरातील मोठे नेतृत्व हवामान बदलाबाबत विपरीत वागत असताना आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. परंतु, केवळ चिंता करत बसणे, हा कोणत्याही समस्येवरचा उपाय ठरत नाही. त्यामुळे हवामान बदलाद्वारे उद्भवत असलेल्या नैसर्गिक आपत्तींशी आपल्याला दोन हात करावेच लागतील. प्रदूषण कमी करण्यापासून ते पर्यावरणपूरक विकासाबाबतचे दबावगट आता खालूनच निर्माण करावे लागतील. गाव पातळीवर वृक्षारोपण, गायरान जमिनीचे संवर्धन, नदीनाला या परिसंस्थांचे जतन असे उपाय केले जाऊ शकतात. प्रत्येक शेतकऱ्याने आपले शेत ही एक परिसंस्था समजून संवर्धन करायला पाहिजेत.  जमीन सुपीकता वर्ष आणि जल व्यवस्थापन वर्षानंतर अॅग्रोवनने नवे २०२० हे वर्ष ‘हवामान बदल वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे हवामान बदलाची आव्हाने आणि त्यावरील उपायांसंदर्भात बातम्या, लेख यांतून शेतकऱ्यांसह सर्वांचेच वर्षभर ‘अॅग्रोवनमधून प्रबोधन होत राहील. या उपक्रमाला आपले पाठबळ मिळेल याची खात्री आहेच!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com