प्रतिकूल हवामानाचे ‘ग्रहण’

चंद्र आणि सूर्याला लागणारे ग्रहण काही वेळानंतर सुटत असते. मात्र, राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानाचे लागणारे ग्रहण सुटायचे नावच घेत नाही.
agrowon editorial
agrowon editorial

आ ज कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. पृथ्वी सूर्याभोवती; तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. त्यांच्या या भ्रमणात कधी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येऊन चंद्रग्रहण लागते; तर कधी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन सूर्यग्रहण लागते. चंद्र आणि सूर्याला लागणारे ग्रहण काही वेळानंतर सुटत असते. मात्र, राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानाचे लागणारे ग्रहण सुटायचे नावच घेत नाही.  

डिसेंबर महिना संपत आला आहे. अर्थात, जवळपास निम्म्याहून अधिक हिवाळा संपला आहे; परंतु हिवाळ्यातील बोचऱ्या थंडीचा अनुभव राज्यात तरी अजून कुणाला आलेला नाही. या वर्षी पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला. त्यामुळे राज्यातील खरीप बहुतांश शेतकऱ्यांच्या हातचा गेला. सरासरीपेक्षा अधिक पावसानंतर हिवाळ्यातील पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणात रब्बी बहरेल; तसेच फळपिके आणि फुलपिकांची चांगली काळजी घेऊन हंगाम साधता येईल, या आशेवर शेतकरी असताना प्रतिकूल हवामानाने त्यावरही पाणी फेरण्याचे काम केले. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीस नेमकी सुरुवात झाली असताना पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले; तसेच तिसऱ्या आठवड्यात थोडीफार थंडीची चाहूल लागून धुके पडू लागले की पुन्हा ढगांनी आकाश व्यापले आहे. सातत्याचे ढगाळ वातावरण अन् थंडीचे कमी प्रमाण यामुळे रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, करडई, हिवाळी भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. अशा प्रकारच्या प्रतिकूल हवामानाने अनेक ठिकाणी रब्बी पिकांची उगवण नीट झालेली नाही, उगवलेली पिके जोमाने वाढत नाहीत; तसेच जवळपास सर्वच रब्बी पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. 

सातत्याने बदलत्या हवामानाचा खऱ्याअर्थाने फटका बसला तो द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी आदी निर्यातक्षम फळपिकांना. लांबलेल्या पावसाने फळपिकांचा ताण; तसेच बहर नियोजन कोसळले. आता फुलोरा अवस्थेपासून फळधरणी आणि वाढीच्या अवस्थेत ढगाळ वातावरणाने अनेक कीड-रोगांच्या विळख्यात ही पिके सापडली आहेत. निर्यातक्षम फळे रसायन अवशेषमुक्त असायला हवीत. आता तर कीड-रोगमुक्त भौगोलिक क्षेत्रातून उत्पादित शेतमालाची मागणी अनेक देश करू लागले आहेत. त्यामुळे वाढत्या कीड-रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रण अधिकच कठीण होत आहे. या वर्षीच्या अत्यंत प्रतिकूल अशा हवामानातून नियंत्रित शेतीमध्ये (पॉलीहाउस) घेतली जाणारी फुलपिकेही वाचू शकली नाहीत. राज्यातील शेतकरी नाताळ आणि त्यानंतर येणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठी गुलाबाच्या निर्यातीचे नियोजन करतो; परंतु या वर्षी निर्यातक्षम गुलाब फुलांचा दर्जा आणि उत्पादनपण घटले आहे. त्याचा फटका नाताळ सणात फुल उत्पादकांना बसला असून, हवामानात असाच चढ-उतार राहिल्यास व्हॅलेंटाइन डेलापण फटका बसू शकतो. 

मागील दशकभरात शेतीवर नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. हवामानबदलाचाच हा परिणाम आहे. असे असताना आपल्याकडे हवामानाचा अंदाज, त्यानुसार कृषी विद्यापीठे अथवा संशोधन संस्थांकडून (द्राक्ष वगळता) दिले जात असलेले मोघम सल्ले शेतकऱ्यांना फारसे उपयुक्त ठरताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. अशावेळी हवामान विभाग- कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि कृषी विभाग यांच्यातील समन्वय वाढवून त्यांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज आहे.

हवामान विभागाला अल्प आणि दीर्घकालिन तालुकानिहाय अधिक अचूक अंदाज द्यावे लागतील. त्या अंदाजानुसार कृषी विद्यापीठांनी पीकनिहाय, त्यांच्या वाढीच्या अवस्थांनुसार सल्ले-सूचना द्यायला हव्यात. हे सल्ले-सूचना तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोचविण्याची यंत्रणा उभी केली, तरच प्रतिकूल हवामानाचे शेतकऱ्यांना लागलेले ग्रहण सुटू शकेल. यांसह नैसर्गिक आपत्तीत शेतातील उभी पिके; तसेच काढणी-मळणी केलेला शेतमाल वाचविण्याच्या सेवा-सुविधा प्रत्येक शेतकऱ्यांची गरज ठरल्या आहेत. ह्या सेवा-सुविधा काही अनुदान देऊन कशा उभ्या करायच्या, यावरही शासनाने विचार करायला हवा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com