माघार नको, पुढाकार घ्या

बाजार समितीतील गर्दी कमी करुन व्यवहार सुरळीत आणि सुरक्षित चालू ठेवण्याचे अनेक पर्याय आहेत. अडचणीच्या, आणीबाणीच्या काळात या पर्यायांचा अवलंब करायचा सोडून व्यापारी-आडते आडमुठेपणाच्या भुमिकेतून बाजार समित्या बंद पाडत आहेत.
agrowon editorial
agrowon editorial

राज्यात कोरोना बाधितांची संख्या १४०० च्या जवळ जाऊन पोचली आहे. बाधितांची संख्या मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक आहे. या दोन शहरांत मिळून हजारवर कोरोनाग्रस्त असून मृत्यूचे प्रमाणही या दोन शहरांत अधिक आहे. कोरोबा बाधितांचे वाढते प्रमाण आणि मृत्यूसंख्या पाहता या दोन्ही शहरांतील दाट लोकवस्तीचे भाग सील करण्यात आले आहेत. या दोन्ही शहरांच्या बाजार समित्यांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे तसेच त्यांना लागून असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना प्रसाराचा धोका टाळण्यासाठी १० एप्रिल पासून पुणे तर ११ एप्रिलपासून मुंबई अशा दोन्ही बाजार समित्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

खरे तर हे दोन्ही निर्णय आडते आणि व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावाने बाजार समिती प्रशासनाने घेतले आहेत. लॉकडाउननंतर बाजार समित्या चालू राहतील, असे प्रशासनाने बजाऊनही त्यावेळी व्यापारी, आडत्यांनी पुणे तसेच मुंबईच्या बाजार समित्या एक-दोन दिवस बंद ठेवल्या होत्या. बाजारबंदच्या काळात शेतकऱ्यांनी थेट व्यापाऱ्यांना किवा ग्राहकांना फळे-भाजीपाला उपलब्ध करुन द्यावा, असे मुंबई बाजार समितीचे सेक्रेटरी स्पष्ट करतात. तर राज्य सरकारचे सहकार विकास महामंडळ गृहनिर्माण संस्थांमध्ये थेट धान्य, फळे-भाजीपाल उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल आहे. कोरोना लाकडाउनच्या काळात मुंबई-पुणे अशा शहरांबरोबर अनेक गावांतही शेतकरी, त्यांचे गट फळे-भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री करीत आहेत. परंतू याला खूपच मर्यादा आहेत. अशा प्रकारच्या थेट विक्रीद्वारे केवळ ५ ते १० टक्के ग्राहकांपर्यंत फळ-भाजीपाला पोचत असून उर्वरित ९० ते ९५ टक्के ग्राहक यापासून वंचित राहताहेत, हे लक्षात घ्यायला हवे.

खरे तर लॉकडाउमध्ये लोकांना फळे-भाजीपाला ही अत्यावश्यक उत्पादने उपलब्ध झाले पाहिजेत, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत. कोरोनाची लागण आणि प्रसार थांबविण्यासाठी लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. फळे-भाजीपाल्याचा आहारातील वापरातूनच ती वाढू शकते. अशावेळी आडते आणि व्यापाऱ्यांनी आडमुठेपणाची भुमिका घेऊन बाजार समित्या बंद ठेऊ नयेत. लॉकडाऊनमख्ये डॉक्टर्स, पोलीस, महानगर पालिका प्रशासन स्वःतच्या जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा जनतेला पुरवित आहेत. शेतकरी सुद्धा कष्टाने फळे-भाजीपाल्यासह इतरही शेतमाल पिकवित आहेत. मोठी जोखीम पत्करुन हा शेतमाल बाजार समित्यांपर्यंत पोचवित आहेत. अशावेळी व्यापारी आणि आडत्यांनी माघार घेऊन चालणार नाही. कोरोनाची बाधा होण्याची भीती सर्वांनाच आहे. परंतू फळे-भाजीपाल्याची खरेदी-विक्री करताना आवश्यक ती खबरदारी घेतली तर याची लागण आणि प्रसार रोखला जाऊ शकतो.

बाजार समितीतील गर्दी कमी करुन व्यवहार सुरळीत आणि सुरक्षित चालू ठेवण्याचे अनेक पर्याय आहेत. व्यापारी-आडत्यांनी कल्पतेने अशा पर्यायातून सुरक्षित फळे-भाजीपाला विक्रीचे वेगवेगळे मॉडेल आणणे गरजेचे होते. फळे-भाजीपाल्यांची वर्गवारी करुन एका दिवशी एका वर्गाच्या तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्गाचा फळे-भाजीपाला शेतकऱ्यांना बाजारात आणण्याचे सांगितल्यास गर्दी कमी केली जाऊ शकते. अशा प्रकारचे व्यवहार पण सुरक्षित अंतरावरुन (सोशल डिस्टंसिंग) पार पाडले जाऊ शकतात. बाजार समितीत शहरी कुटुंबाचा आकार लक्षात घेऊन त्यांना दैनदिन लागणारा फळ-भाजीपाला कमीत कमी हाताळणीद्वारे पॅक करुन तो थेट सोसायट्यापर्यंत पोचवला जाऊ शकतो. या कामी शहर प्रशासनाबरोबर पोलिस यंत्रणेची सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. त्यामुळे बाजार समित्या बंदच्या निर्णयाचा व्यापारी, आडते तसेच बाजार समिती प्रशासनाने पुनर्विचार करायला हवा. मुंबई-पुण्याच्या बाजार समित्या तात्काळ सुरु करुन शेतकरी तसेच ग्राहकांना दिलासा देण्याचे काम करावे. ..........

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com