‘कोरोना’ची काळजी

कोरोना विषाणूचा देशात प्रवेश न होऊ देणे आणि झाल्यास त्याचा प्रसार थांबविणे, यासाठी आपल्याला युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.
agrowon editorial
agrowon editorial

चीनमध्ये अल्पावधीतच ‘कोरोना’ विषाणूची लागण होऊन मृत्यू पावलेल्यांचा आकडा शंभरवर गेला आहे. तिबेट वगळता चीनच्या सर्वंच प्रांतात या विषाणूने थैमान घातले आहे. चीनमधील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर पोचली आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे अत्यंत घातक असा हा विषाणू झपाट्याने जगभर पसरत आहे. चीनव्यतिरिक्त हाँगकाँग, मलेशिया, जपान, थायलंड, नेपाळ, श्रीलंका आदी १५ देशांत ‘कोरोना’ची लागण झाल्याने लवकरच जागतिक आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता आहे. चीनची सीमा भारतालादेखील लागून आहे. त्यामुळे हा विषाणू आपल्या देशात पोचण्याचा धोकादेखील अधिक आहे; परंतु आपल्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे देशात ‘कोरोना’ विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नाही; परंतु केरळपासून ते पंजाबपर्यंत ‘कोरोना’चे अनेक संशयित रुग्ण मात्र आहेत. संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील काही दिवस देखरेखेखाली ठेवण्यात येत आहे. 

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग प्राण्यांपासून मनुष्याला होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या विषाणू सी-फूड अर्थात समुद्रीखाद्यपदार्थांशी निगडित असून, या संस्थेनेदेखील हा विषाणू एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे सहज पसरू शकतो, असे स्पष्ट केले आहे. त्याहूनही घातक बाब म्हणजे या विषाणूची एकदा लागण झाल्यावर त्यावर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही अथवा हमखास नियंत्रणासाठी उपचारदेखील नाहीत. त्यामुळे या विषाणूचा देशात प्रवेश न होऊ देणे आणि झाल्यास त्याचा प्रसार थांबविणे, यासाठीच आपल्याला युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.   

सर्दी, नाक वाहणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि ताप अशी अगदी सर्वसामान्य ‘कोरोना’ची लक्षणे आहेत. थोड्याशा वातावरणातील बदलानेसुद्धा ही लक्षणे आपल्याकडे अनेकांत दिसून येतात. पुढील काही दिवस अशी लक्षणे दिसून आल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव टाळण्यासाठी अनेक देशांनी चीनशी संपर्क कमी केला आहे. चीनमधील नागरिकांना व्हिसा नाकारला जातोय. चीनशेजारील देशांनी सीमा बंद केल्या आहेत. आपल्या देशातही चीनमधून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. क्वारंटाईन विभागाला पुढील काही दिवस या विषाणूची लागण ज्याद्वारे देशात होऊ शकते, अशा सर्वांची अगदी कसून तपासणी करावी लागेल. चीनमध्ये असणाऱ्या भारतीयांना देशात परत आणण्याचे शासन पातळीवरच नियोजन केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना रुग्णांसाठी पुणे आणि मुंबई येथील रुग्णालयांत विलगीकरण कक्षही उभारण्यात आले आहेत.

‘कोरोना’चे संशयित रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणीही आढळत असल्याने ग्रामीण भागात याबाबत अफवा पसरणार नाहीत, ही खबरदारी घ्यावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे शिंकताना, खोकताना रुमाल नाका-तोंडावर धरणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, काहीही खाताना हात स्वच्छ धुणे, नाक-तोंड-डोळ्याला सारखा हात न लावणे, पूर्ण शिजविलेलेच अन्न खाणे अशा साध्या सोप्या खबरदारीच्या उपायांद्वारेसुद्धा या विषाणूला आपण दूर ठेऊ शकतो. तेव्हा पुढील काही दिवस तरी आपण सर्वजण काळजी घेऊया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com