भ्रष्ट आणि निगरगट्ट

कृषी आयुक्तालयातील ‘गुणी’जनांना भस्म्या जडल्याने कृषी निविष्ठा उद्योजक गेली काही वर्षे परेशान झाले आहेत. यापैकी अनेकांनी महाराष्ट्रातील उद्योग बंद करून शेजारील मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये काम सुरू केले आहे. आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही, असा विश्वास निर्माण झालेल्या भ्रष्ट आणि निगरगट्ट यंत्रणेला याचे कसलेच सोयरसुतक नव्हते.
संपादकीय
संपादकीय

कृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस चालणाऱ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी ‘गुण नियंत्रण विभागाचे अवगुण' ही ‘ॲग्रोवन’मधील वृत्तमालिका संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांची बदली केली. मागे सुरू होते ते तसेच पुढेही सुरू राहील (किंवा सुरू ठेवता येईल), असा आशावाद बाळगणाऱ्या कृषी खात्यातल्या काही शुक्राचार्यांना हा योगायोग असल्याचा भास होतो आहे. त्यांचा ‘भ्रम'निरास होणे तसे कठीणच! गेली काही वर्षे कृषी निविष्ठा उद्योगाला जेरीस आणणारा भ्रष्टाचार आयुक्तालयात राजरोसपणे सुरू होता. राज्यातील फडणवीस सरकार पारदर्शक कारभाराचा उदो उदो करीत असले तरी, नावापुरता आॅनलाइन कारभार करून कृषी निविष्ठा व्यावसायिकांना आपल्या टाचेखाली आणण्याचे कसब गुण नियंत्रण विभागाने साधले होते. त्यामुळे इथला खरा कारभार सूर्य मावळतीला जातानाच सुरू होतो. साध्यासाध्या बाबींवरून या उद्योजकांचा छळ करून खिसे भरण्याचे काम इथले ‘गुणी’जन करीत होते. या साऱ्याशी आयुक्तांचा थेट संबंध होता, असे म्हणता येत नसले तरी, या विभागाचे कार्यकारी प्रमुख म्हणून हे सारे रोखण्याची जबाबदारी त्यांचीच होती. ते झाले नाही. उलट गुण नियंत्रण विभागाचा कारभार उत्तम सुरू असल्याचा निर्वाळा त्यांनी या वृत्तमालिकेच्या सुरवातीच्या भागातच दिला होता. अर्थात तो काही कामी आला नाही.    कृषी आयुक्तालयातील भ्रष्टाचार ही काही नवी बाब नाही. हल्लीच तो सुरू झाला असेही नाही. आयुक्तपदी कोणीही असले तरी ‘बाबूं’ची वर्षानुवर्षे मुरलेली यंत्रणा येथे आहे. काही जण तर कित्येक वर्षे आयुक्तालयात तळ ठोकून आहेत. त्यांच्या बदल्या का होत नाहीत, या प्रश्नाला कोठेच उत्तर मिळत नाही. कोणाला कसे, कधी, केव्हा टप्प्यात घ्यायचे याचा पुरेपूर आवाका या यंत्रणेला आलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता तयार झाल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या या यंत्रणेतील सारे शुक्राचार्य शेतकऱ्याचीच पोरं आहेत. प्रशासनात शेतकऱ्याची मुले आली तर शेतकऱ्यांचे प्रश्न हलके होतील; कारण त्यांना शेतकऱ्यांची दुखं माहीत असतात, असा भाबडा आशावाद महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी तत्कालीन इंग्रज सरकारकडे व्यक्त केला होता. तो फोल ठरवण्याचे काम प्रशासनातील आणि राजकारणातीलही शेतकरी पुत्र अत्यंत निष्ठेने करीत आहेत. बहुजनांचा तोंडदेखला कैवार घेणारेही त्यात आले. भ्रष्टाचार हे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील उघड गुपित आहे. जोपर्यंत लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात सापडत नाही किंवा सरकार काही कारवाई करत नाही, तोपर्यंत सारेच साव असतात. अर्थात याला अपवादही अनेक आहेत. मनोभावे सेवा करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झटणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची या राज्यात वानवा नाही; पण त्यांचे प्रमाण कमी आहे आणि ते घटते आहे, ही चिंतेची बाब ठरावी. कृषी निविष्ठा उद्योगातही सारे आलबेल आहे असे नाही. येथेही शेतकऱ्याला बनवणारे महाभाग आहेत. पण सरसकट सगळे तसे आहेत असेही नाही. जिल्हा, तालुका पातळीवर काम करणारे अनेक निविष्ठा उद्योजक तर शेतकरी कुटुंबातील आहेत. कृषी आयुक्तालयातील ‘गुणी’जनांना भस्म्या जडल्याने हे सारे लोक गेली काही वर्षे परेशान झाले आहेत. यापैकी अनेकांनी महाराष्ट्रातील उद्योग बंद करून शेजारील मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये काम सुरू केले आहे. त्यातूनच आपल्या कृषी खात्याची काळवंडलेली प्रतिमा समोर येते. आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही, असा विश्वास निर्माण झालेल्या भ्रष्ट आणि निगरगट्ट यंत्रणेला याचे कसलेच सोयरसुतक नव्हते. त्यातून अंडे खाण्याऐवजी कोंबडीच कापून खायची धांदल गेली काही वर्षे आयुक्तालयात उडाली आहे. याला आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील केंद्रेकर यांच्यासारख्या प्रामाणिक आयुक्तांनाही तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागले. त्यातून आयुक्तालयातील साखळी किती मजबूत आहे याचा प्रत्यय कृषी क्षेत्राला आला. आयुक्तपदी आता कृषीची पदव्युत्तर पदवी असलेले सुहास दिवसे रुजू झाले आहेत. आयुक्तालयातील साफसफाईसाठी त्यांना समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने ‘ॲग्रोवन’च्या शुभेच्छा!      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com