agriculture news in marathi agrowon agralekh on cow projeny (go vansh) development | Agrowon

गाय पाहावी विज्ञानात

विजय सुकळकर
बुधवार, 4 मार्च 2020

जगामध्ये दिवसाकाठी शंभरीपार दूध उत्पादन करणाऱ्या गायी उपलब्ध केल्या जात असताना आपल्या देशात भाकड गायींची चर्चा होते, हे मोठे दुर्दैव आहे.

गोवंश, गोसंवर्धन अशा प्रकारची योजना युती शासनाच्या काळात गाजावाजा करून सुरू करण्यात आली. गाय हा भावनिक विचार रुजविण्यासाठी गोशाळांचे माध्यम वापरणे आणि विज्ञानाला तिलांजली देणे, यासाठीच सगळा खटाटोप केला गेला. मुळात केंद्र शासनाने सुरू केलेले गोकूळ नावाचे जाळे देशात कुठेही अस्तित्वात आले नाही. एक हजार गायी, भाकड गायी पोषण, गो-उत्पादन यांचा शब्दच्छल करून काही विशिष्ट समाजासाठी गोंधळ घातला गेला. यात एक वर्ष राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देण्याचा सोहळा सोडला, तर गायीसाठी काहीच घडले नाही. विज्ञानात गाय पाहावी आणि या विषयाचा अभ्यास असणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या शिफारशी लक्षात घ्याव्यात, असे समजू न शकल्याने मंत्रालयातून योजना कागदावर उतरवली गेली. घोषणा एक कोटीची; मात्र पदरात २५ लाख, अशी तुरळक उदाहरणे काही जिल्ह्यांत दाखविण्यात आली. कहर म्हणजे, या पैशातला एकही दमडा गायींसाठी नव्हता, चाऱ्यासाठी नव्हता, पैदाशीसाठी नव्हता, आरोग्यसंवर्धनासाठी नव्हता; तर गोशाळांच्या गोठ्याचे बांधकाम, ते करणारे मिस्त्री, अभियंते आणि लोभी गोशाळा संचालक, यांच्या घशात घालण्यासाठीच पुरविण्यात आला. त्यानंतर तालुकास्तरावर ही योजना विस्तारित करून आणखी गोंधळ वाढविण्यात आला. परिणामी, तालुकास्तरावर योजनेचे दिवाळे वाजलेले दिसून येते.

राज्याच्या पशुसंवर्धन खात्यातील एकाही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास गोवंशसंवर्धन योजना मान्य नाही आणि तिची सफलता अपेक्षित नाही. राज्यात नुकत्याच विराजमान झालेल्या महाविकास आघाडी सरकारकडून योजनेचा आढावा, पुनर्विचार आणि वस्तुस्थिती गोळा करण्यासाठी सुरू झालेली मोहीम अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. मात्र, योजनेचा आढावा आणि पुनर्विचार दरवर्षी करणे, हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. चुका टाळण्यासाठी आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी गोवंशसंवर्धन योजनेमध्ये तज्ज्ञांचा विचार आणि शिफारशी घेता येणे शक्य आहे. गोशाळांच्या सक्षमीकरणात काही गोशाळांना आदर्श बनविण्यासाठी दिशा देण्याचे काम राज्य शासनाचे आहे. यातूनच राज्यातील हजाराकडे झुकलेल्या गोशाळा समृद्ध बनतील. अन्यथा, शासकीय अनुदानाची खिरापत पदरात पाडून घेण्यासाठी दररोज नवीन गोशाळा आणि दररोज नवीन मागणी अर्ज समोर येत राहतील.

जगामध्ये दिवसाकाठी शंभरीपार दूध उत्पादन करणाऱ्या गायी उपलब्ध केल्या जात असताना आपल्या देशात भाकड गायींची चर्चा होते, हे मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही प्रकारे गोसंवर्धन, स्थानिक पशुजातींचे संवर्धन आणि गोवंशविकास भावनेत अडकणार नाही, तर जनुकीय अभियांत्रिकीच्या साह्याने समृद्ध होतील आणि त्यास विज्ञानाची जोड उपयोगी ठरू शकेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ ‘जय गोमाता’ असा उद्‍घोष गायीसाठी अजिबात उपयोगाचा नाही. कारण, कृतीतून सद्भावना हा विचार महत्त्वाचा आहे. राज्यात खऱ्या अर्थाने गोकूळग्राम विकसित करावयाचे असल्यास पशुपालक सक्षम करणे, विस्तार शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे, विषयतज्ज्ञांची साथ वेळोवेळी पुरविणे आणि सतत जगातील समृद्धीच्या यशकथा गोपालकांपर्यंत पोचविणे अधिक महत्त्वाचे आहे. तेव्हा योजनेचा पुनर्विचार म्हणजे गोहत्या, असा अपप्रचार पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही. चांगल्या शिफारशींसाठी सर्वांचा आग्रही पुढाकार महत्त्वाचा असून, शासनाने यात दखल दिली असल्याबद्दल निश्चितच कौतुक करावे लागेल.


इतर संपादकीय
वनक्षेत्रात वाढ ः खेळ आकड्यांचा३० डिसेंबर २०१९ रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय...
मधाचा गोडवागे ल्या पाच वर्षांत देशात मधाच्या उत्पादनात ५८...
निर्यातीला धक्का ‘कौन्‍सिल’चादेशात पिकत असलेल्या फळांच्या निर्यातीला...
पाण्याची उपलब्धता आणि पीकपद्धतीस्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाच्या लोकसंख्येत...
महाराष्ट्राची चिंताजनक पिछाडीएका इंग्रजी साप्ताहिकाने अलीकडेच राज्यांच्या...
व्यवहार्य धोरणघरगुती ग्राहकांना विनाखंडित वीजपुरवठा करून...
दुप्पट उत्पन्नाच्या भूलथापाकेंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी २०२२...
जलसंकट दूर करण्यासाठी...भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. केवळ...
सर्वसमावेशक विकास हाच ध्यासभारताच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये यशवंतराव...
आता थांबवा संसर्ग!मागील डिसेंबरपासून जगभर (प्रामुख्याने चीनमध्ये)...
दावा अन् वास्तवदेशातील शेतकऱ्यांनी मृदा आरोग्यपत्रिकेनुसार...
शास्त्रशुद्ध पाणलोट विकासच शाश्वत पर्यायमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलयुक्त शिवार योजना...
प्रस्तावाला हवे प्रोत्साहनन वीन वर्षाची पहाट मराठवाड्याच्या विकासासाठी...