धरणे भरली, आता सिंचनाचे बघा!

कालवे, चाऱ्या, पाटचाऱ्या यांची डागडुजी-दुरुस्ती दरवर्षी पावसाळ्यानंतर होते. परंतु त्यातून अनेक जण स्वतःचेच ‘अर्थ’पूर्ण सिंचन करून घेतात. त्यामुळे पाण्याची गळती काही ते थांबवू शकले नाहीत.
agrowon editorial
agrowon editorial

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन दिवसांपूर्वीच देशातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मॉन्सून या वर्षी देशभर मनसोक्त (९९ टक्के) बरसला. ऑगस्ट महिन्यातील कमी पावसामुळे टंचाईचे संकेत मिळत होते. परंतु सप्टेंबरमधील सर्वाधिक पावसाने (१२३ टक्के) ऑगस्टमधील उणीव भरून काढली. यंदा १ जून ते ३० सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा १९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु याच पावसाने महाराष्ट्रातील लहान-मोठी धरणे भरली आहेत. कोयना, उजनी, जायकवाडी भरल्याने राज्यातील पाणीटंचाईचे संकट तूर्त तरी टळल्यासारखे वाटतेय, ही एक जमेचीच बाजू म्हणावे लागेल. धरणे भरली म्हणजे रब्बी, उन्हाळी हंगाम शाश्‍वत झाला, असे वरवर दिसत असले, तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे दिसते. धरणांच्या संख्येत आपण देशात अग्रस्थानी असलो तरी पाणी वापराबाबत मात्र तेवढेच पिछाडीवर आहोत. मुळात धरणे बांधतानाच भौगोलिक परिस्थिती, सिंचनाची गरज या बाबींचा विचार केला गेला नाही. तांत्रिक बाबीसुद्धा लक्षात घेतल्या नाहीत. कुठे धरणे असू नयेत, यासाठीच्या आदर्शवत जागेत राज्यात काही धरणे उभी आहेत. मोठ्या प्रकल्पांना झालेला विलंब, त्यातून वाढलेला खर्च, त्यातील गैरप्रकार यांनीच राज्यातील अनेक प्रकल्प चर्चेत राहिले आहेत. त्याद्वारे होत असलेल्या सिंचन क्षेत्राची चर्चा फारशी होताना दिसत नाही. आजही राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरताहेत.

राज्यातील अनेक धरणे गाळाने भरलेली आहेत. त्यामुळे आता ती पाण्याने भरलेली दिसत असली, तरी त्यातील पाणीसाठा अपेक्षितपेक्षा कमीच आहे. अनेक धरणांतून धोकादायक पद्धतीने गळती सुरू असते, हा पाण्याचा केवळ अपव्यय आहे. धरणातील पाण्याची वाफ होऊन बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी हाही एक चिंतेचा विषय आहे. अनेक नवनिर्मित धरणांना कालवे, चाऱ्या, पाटचाऱ्या अजूनही नाहीत. त्यामुळे त्यातून सिंचन होत नाही. ज्या प्रकल्पांना कालवे, चाऱ्या, पाटचाऱ्या आहेत, त्यातून जवळपास ५० टक्के पाण्याची गळती होत असल्याचे सिद्ध झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे कालवे, चाऱ्या, पाटचाऱ्या यांची डागडुजी-दुरुस्ती दरवर्षी पावसाळ्यानंतर होते. परंतु त्यातून अनेक जण स्वतःचेच ‘अर्थ’पूर्ण सिंचन करून घेतात. त्यामुळे पाण्याची गळती काही ते थांबवू शकले नाहीत. खरे तर धरणांतील पाणीसाठा स्पष्ट झाल्यावर रब्बी, उन्हाळी हंगामासाठी धरणनिहाय किती आवर्तने सोडणार? त्याच्या नेमक्या तारखा कोणत्या? हे बहुतांश धरणांच्या बाबतीत सिंचन अथवा पाटबंधारे खाते जाहीर करीत नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी रब्बी तसेच उन्हाळी पिकांचे नियोजन करू शकत नाहीत. या सर्व बाबी गंभीर असून, त्यावर शासन-प्रशासनाने विचार करायला हवा.

राज्यात या वर्षी चांगल्या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढली आहे, भूपृष्ठावरील पाणीसाठेही भरले आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी कंबर कसली आहेच. मागील दोन-तीन वर्षांपासून रब्बी हंगामातील पेरा वाढत असून त्यातून शाश्‍वत उत्पादन पण शेतकऱ्यांना मिळतेय. या पार्श्‍वभूमीवर विहीर, कूपनलिकांवरील सिंचनाबरोबर धरणातील पाण्यावरही अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल हे पाहावे. धरण लाभक्षेत्रातही पाण्याची गळती कमी होऊन अधिकाधिक पाण्याचा वापर शेती सिंचनासाठी होण्याबाबत शासन-प्रशासनानेही कंबर कसायला पाहिजे !

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com