agriculture news in marathi, agrowon agralekh on dates cultivation in state | Agrowon

खजुराची शेती खुणावतेय
विजय सुकळकर
मंगळवार, 23 जुलै 2019

खजुरावर प्रक्रिया करून अर्ध सुकलेले, पूर्ण सुकलेले तसेच खारकेची पावडर करूनही विकता येते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी लाभू शकतात.
 

विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी नाहीत. या भागातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनियमित पावसाने हंगामी पिकांपासून उत्पादनाची काहीही शाश्वती राहिलेली नाही. नैसर्गिक आपत्तींमध्ये फळपिकांचे तुलनात्मक नुकसान कमी होते. परंतु विदर्भातील संत्रा आणि मराठवाड्यात मोसंबी, आंबा, सीताफळ ही फळपिके सोडली तर इतर कोणतेही फळपीक येथे रुजताना दिसत नाही. त्यातच सातत्याच्या दुष्काळाने संत्रा, मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणात वाळत आहेत. संत्रा, मोसंबी, आंबा, सीताफळाचे जे काही उत्पादन होते त्यास प्रक्रिया उद्योगाची साथ लाभलेली नाही, बाजारपेठेची जोडही या फळपिकांना मिळाली नाही. त्यामुळे या फळपिकांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये खजूर या फळपिकाची लागवड विदर्भ, मराठवाड्यात हळूहळू वाढत आहे. अगोदर केवळ बांधावर घेतल्या जाणाऱ्या या फळपिकाची लागवड आता शेतात होऊ लागली आहे.

परभणी जिल्ह्यात अनंतराव जावळे यांनी सात एकरावर खजूर लागवड केली असून त्यापासून त्यांना चांगले उत्पादनही मिळत आहे. मराठवाड्यातील एका साखर कारखान्याने खजूर लागवडीचा प्रयोग केला. या प्रयोगाची पाहणी डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केली आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी खजुराचा समावेश अनुदानित फळबाग लागवड योजनेत करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  नुकतीच केली आहे. नागपूर येथे सावी थंगावेल यांनी दोन एकरात खजूर लागवड केली असून त्यापासून त्यांना चांगली आर्थिक मिळकत होतेय. बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने १०० एकरावर खजूर लागवडीचे नियोजन सुरू आहे.  

खजुराची लागवड प्रामुख्याने इजिप्त, अरब देशात होते. आपल्या देशात गुजरात, राजस्थानमध्ये खजूर लागवड आढळून येते. खजुराला उष्ण, कोरडी हवा लागते. पाऊस कमीच लागतो. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात खजूर चांगला येतो. खजुराला मध्यम ते हलकी, रेताड जमीन उत्तम मानली जाते. असे हवामान आणि माती मराठवाडा, विदर्भात लाभत असल्याने हे फळपीक तेथे रुजत आहे. खजुराला फळे लागल्यापासून ती पिकेपर्यंत नियमित पाणी द्यावे लागते. इतरवेळी पाणी कमी असले तरी चालते. खजूर लागवडीतील मुख्य अडसर म्हणजे चांगल्या वाणांची दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना वेळेवर, पुरेशा प्रमाणात आणि माफक दरात उपलब्ध होत नाहीत. खजुराची उती संवर्धित रोपे इंग्लंड, इस्राईलमधून गुजरात, राजस्थानमध्ये आयात केली जातात. या रोपांना तेथील प्रयोगशाळेत भारतीय वातावरणाशी अनुकूलन केल्यानंतर ती देशभर पाठविली जातात. अशी रोप महाग असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ती परवडत नाहीत. आपल्या राज्यात खजुरास प्रोत्साहन द्यायचे असेल तर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपं मिळायला हवीत. तसेच गुजरात, राजस्थानप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा खजूर लागवडीसाठी अनुदान मिळायला हवे.

फळबाग लागवड योजनेत खजुराचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या लागवडीतील बऱ्याच अडचणी दूर होतील. खजुराला ‘लोकल ते ग्लोबल’ असे व्यापक मार्केट आहे. राज्यातील शेतकरी सध्या तरी स्थानिक पातळीवरच पिकलेल्या नरम खजुराची विक्री करीत असून त्यांना दरही चांगला मिळतोय. खजुरावर प्रक्रिया करून अर्ध सुकलेले, पूर्ण सुकलेले तसेच खारकेची पावडर करूनही विकता येते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी लाभू शकतात. इजिप्तमधून मोठ्या प्रमाणावर खजुराची निर्यात होते. जागतिक स्तरावरील खजुराची वाढती मागणी लक्षात घेता इजिप्तने मागील वर्षापासून ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने खजूर लागवडीस सुरवात केली आहे. यावरून या फळपिकाचे महत्त्व आपल्या लक्षात यायला हवे.  

इतर संपादकीय
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
आर्थिक मंदीपेक्षा राष्ट्रवादाचा गोडवा! अर्थमंत्र्यांना नुकतेच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ...
अतिक्रमण अन् असमन्वयाचा ‘पूर’जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सुरू झालेला...
नीट समजून घेऊया ‘पाण्याचे गणित’आजमितीला अवर्षण, पाणीटंचाई या देशासमोरील अव्वल...
विकासाबरोबर विषमताही वाढतेयभारताच्या लोकसंख्यात्मक लाभाची जगभर चर्चा होतेय....
इशारे ठीक; आता हवी कृतीशेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळायला हव्यात,...