‘अस्थमा’ची राजधानी

प्रदूषण नियंत्रणाबाबत आपल्याकडील धोरणांना वैज्ञानिक आधारच नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागत असून, त्याचे परिणाम देशातील सर्वसामान्य जनता आरोग्याच्या माध्यमातून भोगते आहे.
संपादकीय.
संपादकीय.

दरवर्षीच दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाचा विषय ऐरणीवर येतो. दिवाळीतील फटाक्यांची आतषबाजी, पंजाब-हरियाना-उत्तराखंड या राज्यांमध्ये जाळण्यात येत असलेले पिकांचे अवशेष, तसेच वाहने आणि कारखान्यांच्या धुराने दिल्लीत प्रदूषणाचा स्तर वाढतो. या वर्षी तर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाने मागील तीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. दिल्लीतील नागरिकांना मागील आठ-दहा दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होतोय. घसा खवखवतोय, डोळ्यांतून पाणी वाहतेय. वाढत्या प्रदूषणांमुळे काही दिवस शाळांना सुट्टी द्यावी लागली आहे. बाहेर पडणे तर सोडाच; दिल्लीकर घरातही सुरक्षित नाहीत. देशाच्या राजधानीचे हे शहर ‘अस्थमा’ची राजधानी म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. या शहरामध्ये धूम्रपान न करताही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. एवढी सगळी आरोग्य आणीबाणी ओढवली असताना, राज्ये सरकारे आणि केंद्र सरकार हे प्रदूषणाबाबत राजकारण करीत आहेत. दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती आवाक्याबाहेर गेली असून, अशा प्रकारचे जीवन आपण जगू शकत नाही, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सुनावले आहे. केंद्र सरकारलाही तत्काळ पर्यावरणतज्ज्ञांना पाचारण करून प्रदूषण कमी करण्याबाबतच्या उपायांवर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.  

हवा-पाणी प्रदूषणावर चर्चा सुरू झाली, की नेहमीच यांस जबाबदार घटकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा वेळी प्रदूषणामध्ये नेमका कोणाचा, किती सहभाग हे एकदाचे स्पष्टच व्हायला हवे. हवेच्या प्रदूषणामध्ये वाहने, कारखाने, शेती, बांधकाम विभाग आदींचा नेमका सहभाग निश्चित झाला म्हणजे त्यानुसार त्यांच्यावर ते कमी करण्यासाठी जबाबदारी टाकता येईल. दिल्ली प्रदूषणामध्ये शेजारील राज्यांतील शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले जात आहे. खरीप पिकांची काढणी झाल्यावर उर्वरित अवशेष जाळून शेत स्वच्छ करणे हा पर्याय शेतकऱ्यांना सर्वांत सोपा वाटतो. या भागातील शेतकऱ्यांनी तसे करू नये असे वाटत असेल, तर जाळण्याशिवाय पीक अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी होणारा खर्च त्यांना अनुदानाच्या रूपात मिळायला हवा. पिकांच्या अवशेषांचे लहान तुकडे करून जमिनीत मिसळणारे यंत्रेही उपलब्ध आहेत. अशी यंत्रे शेतकऱ्यांना पुरविण्यात येतील अशा घोषणाही झाल्या. परंतु, ती शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. पिकांचे अवशेष न जाळण्याच्या काळातही दिल्लीत प्रदूषण अधिकच राहते. अशा वेळी वाहने, कारखाने यांतील धुरामुळेच प्रदूषण वाढत असल्याचे स्पष्ट होते. दिल्ली असो की कुठलेही शहर, वाहनांची संख्या वाढू नये म्हणून कुठेच प्रयत्न होत नाहीत. उलट वाहने जास्त खपावीत हाच शासनाचा उद्देश राहिला आहे. काही अपवादात्मक शहरे सोडली, तर देशातील बहुतांश शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची घडी राज्यकर्त्यांनीच नीट बसू दिलेली नाही. 

दिल्लीतील प्रदूषणपातळी आज अतिगंभीर असली, तरी देशातील सर्वच शहरे त्याच वाटेवर आहेत. प्रदूषणाबाबत अधिक गंभीर बाब म्हणजे हे कमी करण्यासाठी शासन पातळीवर शाश्वत उपायांऐवजी थातूरमातूर प्रयत्न केले जातात. दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी सम-विषम वाहन योजना, मास्कचे वाटप हाच तेथील सरकारला रामबाण उपाय वाटतो. ही योजना आधीही आणली होती, त्यातून फारसे काही साध्य झाले नाही. युरोपमधील अनेक शहरांनी कर्ब उत्सर्जन शून्याकडे नेण्याचे दीर्घकालीन कार्यक्रम आखून ते प्रभावीपणे राबविले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळत आहेत. चीन, ऑस्ट्रेलिया या देशांनीसुद्धा हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी समोर नकाशे ठेवून कोणी, कुठे, काय करायचे याचा कार्यक्रम आखला आहे. प्रदूषण नियंत्रणाबाबत आपल्याकडील धोरणांना वैज्ञानिक आधारच नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागत असून, त्याचे परिणाम देशातील सर्वसामान्य जनता आरोग्याच्या माध्यमातून मोजते आहे. आपल्या पुढील पिढीला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि विषमुक्त अन्न ही आपल्याकडून सर्वांत मोठी भेट असेल, हे सर्वांनी एकदा लक्षात घ्यायला हवे.                               

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com