agriculture news in marathi agrowon agralekh on donation of farmer in mukhyamantri sahayata nidhi | Agrowon

दातृत्वाचा झरा

विजय सुकळकर
शुक्रवार, 1 मे 2020

रावण यांनी केलेल्या मदतीचा आकडा लहान असला तरी त्यामागील त्यांचा दातृत्वाचा भाव मोठा आहे. अन् म्हणतात ना, ‘थेंबे थेंबे तळे साचे,’ या उक्तीप्रमाणे दातृत्वाच्या अशा छोट्या छोट्या पण असंख्य झऱ्याने मदतीचा घडा भरणार आहे.

मागील पावसाळ्यामध्ये राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये महापूराने चांगलेच थैमान घातले होते. जवळपास महिनाभराच्या पूरपरिस्थितीने या भागातील अनेकांची घरे, जनावरांची गोठे, जनावरे तसेच शेतातील पिके वाहून गेली. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. पूरग्रस्त कुटुंबांना शासनासह अनेक संस्थांकडून आर्थिक मदतीबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. निसर्गाच्या या तडाख्यातून आता कुठे पूरग्रस्त कुटुंबे सावरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बाळासाहेब रावण या शेतकरी कुटुंबाचे देखील महापूरात घर आणि शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी त्यांनी स्वखर्चाने घराची डागडुजी केली. त्यावेळी त्यांनी पाहिले की शासनासह इतर संस्था, व्यक्तींकडून मिळालेल्या मदतीचा पूरबाधितांना चांगलाच आधार मिळाला होता. आता कोरोना लॉकडाउनमुळे शेती, उद्योग, सेवा अशा सर्वच क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या शेतकरी, शेतमजूर यांच्यासह कंपन्यातील कामगार वर्ग, छोटे व्यावसायिक, फेरीवाले यांचे दैनंदिन उत्पन्न बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भीषण अशा परिस्थितीमध्ये रावण यांना शासनाकडून मिळालेली नुकसान भरपाई घेणे उचित वाटले नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाईपोटी मिळालेले ९४ हजार रुपये त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउनचा निर्णय घेतला असला तरी राज्यात खासकरुन ग्रामीण भागात या रोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन अजून किती दिवस चालेल, याबाबत काहीही स्पष्टता नाही. लॉकडाउन उठले तरी परिस्थिती लगेच पूर्वपदावर येईल, असेही नाही. त्यामुळे या संकटाचे अधिकाधिक भीषण परिणाम पुढे जाणवू लागतील. अशावेळी केंद्र-राज्य शासन कोरोनाला रोखण्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करीत आहेत. परंतू या महाकाय संकटाचा सामना सर्वांनी मिळून करावा लागेल, ही जबाबदारी एकट्या सरकारवर टाकून चालणार नाही. राज्यात आरोग्याच्या बाबतीत मुळातच पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने कोरोनाचा मुकाबला करणे शासनालाही अडचणीचे ठरत आहे. लॉकडाउनमध्ये जनतेची अन्नसुरक्षा अबाधिक राखण्याचे आव्हान पण आहे. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असताना उद्योग, व्यवसाय, वाहतूक, व्यापार सर्वच बंद असल्याने केंद्र-राज्य शासनाला मिळणाऱ्या कराच्या स्वरुपातील उत्पन्न कमी झाले आहे. अशावेळी केंद्र-राज्य शासनाला मदतीचा हात हवा असून तसे आवाहन पण त्यांनी केले आहे. शासनाला सहाय्यता निधी गोळा करुन देण्यासाठी काही खासगी संस्था सरसावल्या आहेत. काही व्यक्ती, संस्था, उद्योजक त्यांना झेपेल तशी शासनाला आर्थिक मदत करीत आहेत.

रावण यांनी केलेल्या मदतीचा आकडा लहान असला तरी त्यामागील त्यांचा दातृत्वाचा भाव मोठा आहे. अन् म्हणतात ना, ‘थेंबे थेंबे तळे साचे,’ या उक्तीप्रमाणे दातृत्वाच्या अशा छोट्या छोट्या पण असंख्य झऱ्याने मदतीचा घडा भरणार आहे. रावण यांचे कुटुंब स्वःत अडचणीत असूनही ते मदतीसाठी सरसावले आहे. हा आदर्श घेऊन इतरांनी सुद्धा आपल्याला जमेल तशी आर्थिक मदत शासनाला करावी. आत्तापर्यंत मोठ्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील सर्वांनी मिळून एकजुटीने केला असून हेच पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे


इतर संपादकीय
आता संकल्प फेरमांडणीचा : मोहम्मद युनूस"कोरोना'ने आपल्याला नव्याने सर्व काही सुरू...